चला तुळशीला पाणी घालूया..

0
2

आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनाच्या कल्याणासाठी अभ्यासपूर्ण अनेक छोटे मोठे नियम आपल्या दैनंदिन जीवनात घालून दिले आहेत.

त्यापैकी एक म्हणजे रोज सकाळी तुळशीला पाणी घालणे.
चला मग या छोट्याश्या नियमांचे मोठे महत्व पाहू..

*१) अध्यात्मिक महत्व*

याबाबत पुराणामध्ये एक रंजक कथा सांगितली जाते. जालिंदर नावाचा एक पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना त्राहीत्राही केले होते. त्याला कसे रोखायचे आणि सर्वत्र शांती कशी प्रस्थापित करायची असा प्रश्न सर्व देवांना पडतो. मग देव भगवान विष्णू कडे जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात.
विष्णूनी जालिंदराबाबत माहिती काढतात तेव्हा त्यांना असेकळते की, त्याची पत्नी वृंदा ही सतीपतीव्रता आहे आणि तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यांने जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजित करायचे असेल, तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग केला पाहिजे असे लक्षात येते.
परंतु असे करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वतः स्वीकारतात.जालिंदराचे रूपधारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात तेव्हा आपले पती आले असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते.तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच, देवांनी मारलेल्या बाणाने जालिंदराचे शीर तुटून ते वृंदेच्या दारात पडते आणि जालिंदराचा मृत्यू होतो.
नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकीत होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावरविष्णू आपले ख-या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते.

भगवान विष्णू तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्विकारील? तेव्हा भगवंत म्हणतात, ‘मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.’ त्यानंतर वृंदा सती जाते.
पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारा मध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच ‘शालिग्राम’ म्हणतात. ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे एक रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते, त्याला ‘वृंदावन’ म्हणतात.

तीच तुळस भगवान कृष्णाने, पांडुरंगानेही धारण केली. तीच परंपरा पुढे तुळशीची माळ करून लाखो वारकरी धारण करतात म्हणून भगवंत त्यांचेवर प्रेम करतो. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘शालिग्राम’ हा जो दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. अशी श्रद्धा आहे. याच विचाराने वारक-यांनीही तुळशीला आजतागायत पूजनीय मानले आहे.

*२) वैज्ञानीक महत्व*

निसर्गातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन- O2 व रात्री कार्बन डाय ऑक्साईड-CO2 सोडते. अपवाद फक्त पिंपळ, कारण पिंपळवृक्ष रात्रीही ऑक्सिजन सोडतो. म्हणुनच भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे महत्व सांगताना म्हटले आहे की, सर्व वृक्षात मी अश्वथ-पिंपळ आहे.
मात्र तुळस ही निसर्गातील एकमेव अशी वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डाय ऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन-O3वा़यु सोडते. जो की सर्व ब्रह्मांडासाठी महत्वाचा आहे. या वायुच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदुत 5HTPn- सेरॉटोनीन नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते. ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न,आनंदी,उत्साही व मानसिक शांत राहतो.

तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्ती बळकट होते. आयुर्वेदानुसार तुळशी पानाच्या सेवनाने सर्दी, खोकला, ताप, मधुमेह, रक्तदाब ,त्वचारोग, पोटाचे व किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत व मेंदूला उपयोगी जीवनसत्वे मिळतात.
तुळशीच्या बिया, पाने, फांद्या, खोड,फुले (मंजिरी) हे सर्वच औषधी आहेत. तसेच तुळशीतुन निघणाऱ्या शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते. या सर्व बाबींचा गहन विचार करुनच आपल्या पूर्वजांनी पहाटे तुळशीला पाणी घालने आणि सायंकाळी तुळशिजवळ दिवा लावणे असे सांगीतले आहे. जेणेकरून आपण रोज सकाळी तुळशीच्या समपर्कात येऊन तुळशीतून मिळणारी आध्यत्मिक व वैज्ञानिक सर्व शक्ती धारण करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here