शक्ती आणि भक्ती ची साधना.

0
2

शक्ती आणि भक्ती ची साधना.

नवरात्री हा महिषासुरमर्दिनी दुर्गेच्या आराधनेचा काळ आहे. याच नऊ दिवस नऊ रात्रींमध्ये शक्तीस्वरूपिणी दुर्गेचे महिषासुराच्या प्रचंड सैन्याशी व त्याच्या बलाढ्य राक्षसवीरांशी तुंबळ युद्ध झाले आणि सरतेशेवटी देवीने महिषासुराचा पराभव केला. देवांना पराभूत करणारा महिषासुर शेवटी एका स्त्रीच्या हातून मारला गेला.महिषासुराने जेव्हा अमरत्वाचे वरदान मागितले त्यावेळी त्याला हे सांगण्यात आले की अमरत्व देता येऊ शकत नाही, परंतु तुला जास्तीत जास्त जी काही शक्ती मागायची असेल ती मागून घे. त्यावेळी महिषासुराने सांगितले की माझा वध हा स्त्रीखेरीज इतर कोणाच्याही हातून होऊ नये,. महिषासुराला वाटले की देव, दानव, गंधर्व, यक्ष, किन्नर हे कोणीच जर माझा पराभव करू शकणार नाहीत तर एखादी स्त्री माझा पराभव कसा करेल? त्यामुळे त्याने त्या वरदानामध्ये स्त्रीचा उल्लेख टाळला.जेव्हा महिषासुराच्या स्वाऱ्यांनी त्रस्त झालेल्या देवतांनी विचार केला की या दानवी शक्तीचा पराभव कसा होऊ शकतो, तेव्हा उत्तर होते “ स्त्रीरूपिणी दुर्गा. देवतांच्या आवाहना नंतर दुर्गेची तेजपुंज मूर्ती प्रकट झाली. त्या मूर्तीला भगवान शंकरांनी आपला त्रिशूल दिला, विष्णूंनी आपले सुदर्शनचक्र दिले, इंद्रानी आपले वज्र दिले. सर्व देवतांनी आपापली शस्त्रे दिली, आणि या सर्व अस्त्र शस्त्रांनी जी सुसज्जित झाली तीच महिषासुरमर्दिनी दुर्गा होय.महिषासुरमर्दिनीचे रूप अत्यंत सुंदर होते. या त्रिलोकसुंदरीच्या सौंदर्याची ख्याती जेव्हा महिषासुरापर्यंत पोहोचली, त्यावेळी त्याने आपल्या राक्षसदूताला तिच्याकडे पाठवले व म्हटले की, “मी तुझ्यासोबत युद्ध करू इच्छित नाही, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे.” त्यावर देवी त्याला म्हणाली, “मी तुझी मृत्यूदेवता आहे. जर तुला आपल्या जीवनाचे भय असेल तर तू तुझ्या सैन्यासह पाताळात पळून जा. अथवा युद्धाला तयार हो. मी तुला विवाह देऊ शकत नाही, मी तुला मृत्यू द्यायलाच निर्माण झालेली आहे. अखेर महिषासुर देवीच्या हातून मारला गेला.
“आज संपूर्ण देशामध्ये ठिकठिकाणी गरबा नृत्याचे आयोजन होते. त्या गरब्यानृत्यांमध्ये अनेक ठिकाणी असे दिसून आले आहे की काही मुस्लिम तरुण हिंदू नावांनी प्रवेश करतात व गरब्यात मुलींसोबत नृत्य करतात. नऊ दिवसांच्या ओळखीचे रूपांतर हळूहळू लव्ह जिहादमध्ये होते. हे टाळण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने सर्व गरबा आयोजकांना आवाहन केले आहे, की प्रवेश देण्यापूर्वी व्यक्तीचा धर्म आधारकार्ड पाहून तपासावा.काही विरोधक विचारतात की समजा दोन-चार मुस्लिम तरुण तिथे नृत्याला गेले तर काय बिघडते? परंतु सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की गरबा हा नृत्यप्रकार देवीच्या आराधनेचा प्रकार आहे. कोणी उपवास करून, कोणी मंत्रजप करून, कोणी फल-फुले वाहून देवीची आराधना करतो. तसेच काहीजण गरबा खेळून देवीची उपासना करतात. ज्यांचा विश्वास हिंदू धर्मावर नाही, देवी-देवतांवर नाही, त्यांनी गरब्याद्वारे देवीची उपासना करण्याचे कारणच काय? याही पुढे जर कुणाला गरबा हा एक इव्हेंट वाटत असेल, एक समारंभ वाटत असेल, तर असे समारंभ त्यांनी आपल्या वस्तीमध्ये आयोजित करावेत आणि आपल्या धर्मातील मुलींसोबत असे नृत्य करावे.हिंदू माणूस कधीही इतर धर्माच्या मशिदीत किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हायला जात नाही, आणि गेला तरी त्याचा उद्देश लव्ह जिहादचा नसतो. नवरात्रीचा उत्सव शांततेत पार पडावा, दोन धर्मांमध्ये सामाजिक विद्वेष निर्माण होऊ नये, हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे आवाहन हे भक्तिभाव आणि सामाजिक पवित्रता टिकवण्याच्या उद्देशाने केले गेले आहे. गरब्याचे हे पावित्र्य केवळ आयोजक, सहभागी मुलामुलींची जबाबदारी नाही, तर त्यांना पाठवणाऱ्या परिवारांचीही तितकीच जबाबदारी आहे.
देवीच्या या नवरात्रात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते.पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते. शैलपुत्री ही हिमालयाची कन्या होती. मागील जन्मात हीच सती होती जिने यज्ञकुंडामध्ये स्वतःचे शरीर समर्पित केले. त्यानंतर तिने शैलपुत्री म्हणून जन्म घेतला.दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. तपश्चर्येची देवी म्हणून ही ओळखली जाते. शंकरांच्या प्राप्तीसाठी तिने अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली.तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा स्वरूपाची पूजा होते. कपाळावर अर्धचंद्र धारण केलेली ही देवी आपल्या घंटांच्या प्रचंड आवाजाने असुरांना भयभीत करते.चौथ्या दिवशी कुष्मांडा स्वरूपाची पूजा केली जाते. ब्रह्मांड निर्मिती करण्याची क्षमता असणारी ही देवी म्हणून पूजली जाते.पाचवे रूप स्कंदमातेचे आहे. कार्तिकेयाची माता असलेल्या या देवीने भक्तांना मातेप्रमाणे प्रेम दिले.सहावे रूप कात्यायनी चे आहे. कात्यायन ऋषींवर कृपा करणारी ही देवी महिषासुरमर्दिनी म्हणूनही ओळखली जाते.सातवे रूप कालरात्रीचे आहे. हे देवीचे सर्वात भयंकर रूप आहे. जिच्या श्वासातून अग्नी निघतो आणि असुर भयभीत होतात. अशी ही देवी आहे.आठवे रूप महागौरी चे आहे. पार्वतीने शंकरांची आराधना केल्यानंतर तिचे शरीर कृष्णवर्णीय झाले.पवित्र गंगाजलाने स्नान केल्यानंतर ती पुन्हा श्वेतवर्णी व सुंदर बनली. म्हणून तिला महागौरी म्हटले जाते.नववे रूप सिद्धीदात्रीचे आहे. ही देवी भक्तांना सिद्धी व शक्ती प्रदान करते. हे नवरात्र ही शक्ती आणि भक्तीची साधना आहे.
आपला देश देवीची पूजा करणारा देश आहे. नवरात्रीच्या निमित्ताने आपण कन्या पूजन करतो. परंतु याच देशात कोलकात्यासारखी लाजिरवाणी घटना व निर्भयासारख्या घटना घडतात. ही आपल्यासाठी खरोखरच दुःखाची गोष्ट आहे. आजही आपल्या देशामध्ये कन्या भ्रूण हत्या अजूनही सुरूच आहे हे आपल्यासाठी अजिबात भूषणावह नाही.त्यामुळे धर्मग्रंथांमध्ये असलेले तत्त्वज्ञान आपल्या आचरणात आले तर आपला समाज अधिक प्रगत होईल आणि संपूर्ण जगासाठी आदर्श ठरेल.नवरात्रीचे हे दिवस हे शक्तीच्या आराधनेचे दिवस आहेत. समाज शक्तिसंपन्न असेल तर त्याच्या मनात आत्मविश्वास सुद्धा टिकून राहतो. आणि शक्तिसंपन्न, आत्मविश्वासी समाज नेहमीच विजयशाली होतो. देवीने जसा महिषासुरावर विजय मिळवला, तसाच आपणही आपल्या समाजातील विविध दुष्टशक्तींवर विजय मिळवूया आणि शक्तीची ही आराधना खऱ्या अर्थाने सफल करूया.

 

अमोल पुसदकर

सुप्रसिद्ध वक्ता व लेखक
9552535813

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here