आज श्री राम नवमी

आज श्री राम नवमी.
अयोध्येत श्री राम मंदिर निर्माणच ऐतिहासिक निर्णय मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.

जवळपास ६४ वर्षापूर्वी ग. दि. माडगुळकर व बाबूजी म्हणजेच आपले सुधीर फडके यांनी गीत रामायण हा विलक्षण कलाविष्कार केला.
ते गीत रामायण आपल्या सर्वांच्या श्रवणा करिता.

वेळेचा सदुपयोग ध्यान साधनेने करूयात, चला काही वेळ स्वतःसोबत घालवूया.. !

वेळेचा सदुपयोग ध्यान साधनेने करूयात, चला काही वेळ स्वतःसोबत घालवूया.. !
आज मनुष्याच्या जिवनात सर्व सुख-सोयी, गाडी-बंगला, बँक बॅलन्स सर्व काही असतांना सर्वांची एक सारखीच तक्रार असते ती म्हणजे “वेळ”. वेळेअभावी आज आपण परिवाराकडेच काय तर स्वतःकडे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा आवश्यक तेवढे लक्ष देऊ शकत नाही. एकवेळ शारीरिक आरोग्यासाठी तरी काही वेळ काढू पण मानसिक आरोग्याच काय? भय,चिंता,राग, चिडचिड, अनिद्रा ह्यासारख्या मानसिक व्याधी पुढे वेगवेगळ्या आजारास जन्म देतात व आपल्या पारिवारिक, व्यावसायिक, सामाजिक सोबतच आर्थिक जीवनावर परिणाम करतात. 
आज कोरोना विषाणूमुळे का होईना पण ना भूतो ना भविष्यती असा मोठा ब्रेक ह्या धकाधकीच्या जीवनात लोकांना मिळाला. गेले दहा दिवस आपण आपला संपूर्ण वेळ हा आपापल्या परिवारा सोबत, TV पाहण्यात तसेच सोशल मीडिया वर तर काही लोक आपला आवडता छंद जोपासण्यात खर्च करत आहेत. ह्याच दिवसांमधून काही दिवस किंबहुना काही तास आपण आपल्या स्वतःसोबत आणि फक्त स्वतःसोबत घालवलेत तर, आणि ते स्वतःवर घालवायचे तर नेमकं करायचं तरी काय हा मोठा प्रश्न. तर अर्थातच ह्याच उत्तर असेल “ध्यान साधना” सोप्या भाषेत ध्यान लावण्याचा सराव करायचा.
ध्यान (Meditation) चा अर्थ म्हणजे श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करणे असा काही अंशी बरोबर असला तरी तो पूर्ण नाही. ध्यानाची व्याख्या आणि अर्थ वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या अनुभवानूरुप केले आहेत. ध्यान म्हणजे स्वतःशी एकरूप होणे, ध्यान हे मानवी शरीर आणि त्याचे चंचल मन ह्यांच्यात सुबध्दता (Alignment) करणे होय. ध्यान हे मनुष्याने स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःला दिलेले अमूल्य बक्षीस आहे.
आजच्या ह्या आधुनिक युगात जिथे शारीरिक स्वास्थ( Physical Fitness) व मानसिक स्वास्थ्य ( Mental Fitness) चे क्रेझ आहे तिथे योग आणि ध्यान ( Yoga & Meditation) ह्याचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे. आज योग आणि ध्यान ह्याला  ग्लोबल मार्केट मिळालं आहे ह्यांचा व्यवसाय आज करोडो डॉलर वर पोचला आहे, पाश्चात्य लोक आज योग आणि ध्यान ह्याला त्यांच्या दैनंदिन जीवनशैली चा भाग बनवत असतांना ज्या भूमीतुन हि देन जगाला मिळाली तेथील लोकांमध्ये मात्र योग आणि ध्यान ह्याबद्दल उदासीनता दिसून येते. 
भारतीय सनातन संस्कृती मध्ये कित्येक धर्मग्रंथात ध्यानाचे महत्व विशद केले आहे. श्रीमद भगवत गीता मध्ये भगवान श्रीकृष्ण ध्यानयोग चा उल्लेख करतात. स्वामी विवेकानंद ह्यांनी सुद्धा त्यांच्या “राजयोग” ह्या पुस्तकामध्ये ध्यानाचे महत्त्व व पद्धती खूप विस्तीर्ण स्वरूपात मांडली आहे. भगवान बुद्धानी दिलेली “विपश्यना” असो की जैन मुनींनी दिलेली “प्रेक्षाध्यान” असो, ओशो रजनीश ह्यांनी सांगितलेली “सक्रिय ध्यान” असो की परमहंस योगानंद ह्यांनी जगात प्रसार केलेली क्रिया योग असो. तसेच आजच्या काळातील श्री. श्री. ह्यांनी पुरस्कृत केलेली “सुदर्शन क्रिया” असो जग्गी वासुदेव ह्यांची “ईशा क्रिया” तसेच ब्रह्मकुमारी पुरस्कृत “राजयोग” असोत की निर्मला देवी ह्यांची सहजयोग पद्धती असो ह्या सर्व ध्यान योगा च्या पद्धती ह्या सर्व आध्यात्मिक लोकांनी अभ्यासून पुरस्कृत केलेल्या आहेत. 
ध्यान केल्याचे भरपूर फायदे सांगितल्या जातात जसे की नियमित ध्यान सराव करणाऱ्याचे मन आनंदी राहते, नियमित ध्यान मूळे कार्यक्षता वाढण्यास मदत होते, विचार शक्ती तसेच स्मरण शक्ती वाढते, एकाग्रता वाढवून आत्मविश्वास वाढतो इत्यादी एक अनेक फायदे ध्यान सरावाने होतात असे सांगण्यात येते.
ध्यान करतांना हे त्यांतील जाणत्या व्यक्तीच्या मार्गदर्शनात करायला पाहिजे म्हणजे पद्धती सोबत कोणती सावधगिरी घ्यायला पाहिजे हे सुद्धा कळेल. आजच्या ह्या इंटरनेट च्या आणि स्मार्ट फोन च्या युगात सर्व माहिती मार्गदर्शन हे विडिओ च्या स्वरूपात आपल्या मोबाईल वरच मिळते. असे असंख्य विडीओ You Tube वर उपलब्ध आहेत त्यातील एखादी सरळ सोपी पद्धत आपल्या आवडीनुसार आपण निवडून त्याचा सराव घर बसल्या कुठेही न जाता कोणतीही शुल्क न देता करू शकतो. लक्षात ठेवा ध्यानाचे फायदे फक्त आणि फक्त नित्य सरावानेच आणि योग्य पद्धतीने केले तरच मिळू शकता पण एकदा का तुम्ही त्या अवस्थेपर्यंत पोचले की तुमच्या जीवनात खूप सकारात्मक परिणाम होतात असे अनेक महापुरुष्याचे अनुभव आहेत.
चला तर मग कोरोना मुळे झालेल्या लॉक डाऊन चा उपयोग ह्या अस्थिर मनाला लॉक करून त्याची चावी आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करूयात, रोग, भय, चिंता ह्यांपासून मुक्त होऊन आनंदी होण्याचा प्रयत्न करूया, चला ध्यान साधनेचा सराव करूया.
(photo – google)
– सचिन शेगोकार 

कोरोनाच्या निमित्ताने जगणं सुंदर करणाऱ्या टीप्स.

कोरोनाच्या निमित्ताने जगणं सुंदर करणाऱ्या टीप्स..
माणसाला संवादाची गरज असते….! का…? कशासाठी…? समजा कुकरमध्ये खूप वाफ कोंडली आहे. तिला बाहेर पडायला वाव मिळाला नाही. तर काय होईल…? कुकरचा स्फोट होईल. समजा एखाद्या डबक्यात पाणी साठलं आहे. आत येणारा झरा नाही. बाहेर जाणारा मार्ग नाही. तर काय होईल. आतलं पाणी आतल्या आत कुजून जाईल. वास येऊ लागेल. दुर्गंधी येऊ लागेल. 
मनाचंही असंच असतं. विचारांची देवाणघेवाण झाली नाही. भावनांना वाट मिळाली नाही. की मनात विकृती निर्माण होते. अन यासाठी गरज असते संवादाची! अन्न, वस्त्र आणि निवारा या शरीराच्या मूलभूत गरजा असतील तर संवाद ही मनाची मूलभूत गरज आहे. 
संवादाचा अभाव हे माणसांमाणसांत दुरावा निर्माण होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. एकाच घरात रहाणारे भाऊबहीण, पतीपत्नी, पितापुत्र यांच्यात संवाद नसतो. आपली सुखदु:ख, भावना, विचार यांची देवाणघेवाण करायला वाव नसतो.  काय गंमत आहे बघा, संवादाच्या खिडक्या बंद करुन माणसं ‘सहजीवन’ जगत असतात. मग काय होतं, मनाच्या बंद तळघरात गैरसमजाचा राक्षस जन्माला येतो आणि बघता बघता तो अक्राळविक्राळ रुप धारण करतो. संवादच संपला की उरतो तो वाद…
संवाद म्हणजे नुसतं बोलणं नव्हे. संवाद म्हणजे विचारांची देवाणघेवाण. दुसऱ्याकडे विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी गरज असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्या विचारांना नवा आयाम मिळतो. आपल्या स्रुजनशीलतेला नवे पैलू पडतात. आपल्या द्न्यानात भर पडते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचं, आपल्या उणिवांचं आपल्याला मूल्यांकन करता येतं. आपलं मानसिक आरोग्य सुद्र्ढ रहातं. थॊडक्यात काय तर संपन्न व्यक्तिमत्वासाठी निरोगी मन आवश्यक आहे आणि निरोगी मनासाठी संवादाची गरज आहे. 
तेव्हा बोलू लागा… ऐकू लागा… समजू लागा… संवाद साधू लागा…! कोरोनाच्या निमित्ताने माणसांमाणसांमधला कुंठित झालेला संवाद जर पुन्हा सुरू झाला, गैरसमज दूर झाले, नाती जोडली गेली, असलेली नाती वृद्धिंगत झाली तर जगावर आलेल्या काळ्या सावटाची ती रुपेरी किनार ठरू शकेल. चला, नात्यांमधला संवाद पुन्हा सुरू करूया.
(Photo Google and pngwave वरुण साभार )

 

  • प्रसाद कुलकर्णी, मुंबई

श्रीशारदास्तवन

श्रीशारदास्तवन |

जयोस्तुते जयोस्तुते श्रीशारदे
वंदे त्वां वंदे त्वां वाग्मि वरदे !

आदिमाया, तू सरस्वती
सकलजनांची ज्ञानस्फुर्ती
बुद्धी दे, तू तेज दे
शक्ती दे, तू भक्ती दे
सत्यशिव सुंदरचा ध्यास दे ।।१।।

कलारसिकता, चेतना, सत्संग दे
कोवळ्या मनास या इंद्रधनूचे रंग दे
तेजोमयी तू शब्दसुन्दरी, तारी
मज अज्ञानतेच्या अंधारातुनी ।।२।।

पाटी, पुस्तक, लेखणी, चितशुद्ध
आणिक ही बोबडी वाणी
घेऊनि उभा तव मंदिरी
ज्ञानवृक्ष हा नव अंकुराचा
होऊनी भिडू दे गगनावरी ।।३।।

अक्षरयज्ञ आरंभितो
तुज नमन करुनि ज्ञानदे
आशीष दे भगवती
देहि मे जयम् ।
देहि मे जयम् ।
माते मी तव अंकूरम् ।
माते मी तव अंकूरम् ।।४।।

 

©आश्विनी तेरेदेसाई-पाटील

लॉकडाऊन सुद्धा पोलिसांचीच जबाबदारी आहे का ?

लॉकडाऊन सुद्धा पोलिसांचीच जबाबदारी आहे का ?
जगभरात करोना विषाणू आपले मृत्यू तांडव करत असताना ते थांबवण्याचा एकमेव उपाय म्हणून भारत सरकारने देशभरात लॉक डाऊन करण्याचा खुप कठीण तेवढाच धाडसी निर्णय घेतला आणि समस्त देशवासियांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन वजा विनंती हात जोडून देश्याच्या प्रधानमत्र्यानी केली.
देशाची आरोग्य यंत्रणा तसेच बाकी यंत्रणा आपआपली कर्तव्ये खूप चांगल्या प्रकारे निभावत असतांना बाहेरील कायदा, सुव्यवस्था व सुरक्षेची जबाबदारी अर्थातच माझ्या पोलीस बांधवांवर आली आहे.
“सदराक्षणाय खलनिग्रनाय” हे पोलिसांचे ब्रीद. सद् म्हणजे चांगले आणि राक्षणाय म्हणजे रक्षण तसेच खल म्हणजे देशविघातक समाज विघातक प्रिवुत्तीला आळा घालणे होय. आज करोना सारखा हजारो जीव घेणारा हजारो कुटुंब उध्वस्त करणारा आजार आपल्याला होऊ नये म्हणून आपण आपल्या घरातच रहायला पाहिजे ही सुद्धा पोलिसांची च जबादारी आहे का? हा आज पडलेला खुप छोटा तितकाच किचकट प्रश्न. देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये काही जबाबदाऱ्या आहेत की नाही?
दिवाळी, दसरा, पोळा, रमजान, ईद, ख्रिस्तमस, गणपती उत्सव असो की नवरात्र, मिरवणूक असो की मोर्च्या, उठसूट होणाऱ्या निवडणुका असो की व्ही.आय.पी. सुरक्षा, रात्रीची गस्त असो की समाजिक गुन्हे रोखण्यासाठी आपले पोलीस बांधव दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत असतात. शेवटी पोलीस सुद्धा एक माणूस आहे. त्यालाही घरदार, मुलेबाळे आहेत त्याच्या ही त्याच्या परिवारा प्रति काही जबाबदाऱ्या आहेत. वरशाती8 365 दिवसांपैकी पोलीस 306 दिवस प्रत्यक्ष कर्तव्यावर हजर असतो. 12 तास प्रत्यक्ष आणि 12 तास अप्रत्यक्ष. शिवाय लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्याने वाढलेला कामाचा व्याप त्यामुळे वाढलेला थकवा, चिडचिड, रागावणे ह्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे तसेच सततच्या ताणतणावामुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयरोगा सारख्या शारीरिक व्याधी नी सुद्धा ग्रासले आहेत. गंमत म्हणजे पोलिसांची कोणतीच संघटना नसल्यामुळे ते त्यांचे दुःख शासन दरबारी सुद्धा मांडू शकत नाहीत.
आधीच एवढ्या समस्यांना तोंड देणाऱ्या माझ्या पोलीस बांधवांसमोर हे नवीन संकट करोना नावाने येऊन ठेपले आहे ज्यापासून ह्यांना सर्व नागरिकांची तसेच स्वतःची रक्षा करायची आहे. ज्यांना ह्या विषाणू ची लागण झाली आहे त्यांना वाचविण्याचे सर्व उपाय आपले वैद्यकीय सेवा देणारे लोक करतच आहेत परंतु इतर कोणाला ह्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून हा 21 दिवसांचा लॉकडॉवन संपूर्ण देश्यात लावण्यात आल्या पासून वृत्तवाहिन्या मधून रोज नवनवीन संताप आणणारे गोष्टी पाहण्यात येत आहेत काही ठिकाणी पोलीस लोकांना हात जोडून घरात बसण्याची विनंती करत आहेत तर कुठे गुलाबाची फुले देऊन कुठे मोठे पोलीस अधिकारी कविता म्हणून तर कुठे हिंदी चित्रपटातील काही गाणी म्हणून घरात राहण्याचे आवाहन करत आहेत तर कुठे एका फोन कॉल वर घरपोच औषध, दूध, भाजीपाला जेवणाची पाकिटे पोचवत आहेत. ह्याउलट जेव्हा रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करणाऱ्या माझ्या पोलीस बांधवांची अवहेलना वा अपमान होतांना दिसला की संताप येतो आणि असल्या असवेदनशील समाजाची लाज सुध्दा वाटते. 
असेच मुंबई मधल्या एका उच्चभ्रू वसाहतीतील एक महिला पोलिसांवर अतिशय चुकीच्या शब्दांत ओरडते, काही ठिकाणी काही महिला पोलिसांनी बांबू चा एक फटका मुलाला मारला म्हणून पोलिसांवर हात उचलते, इचलकरंजी मध्ये पोलिसांवर दगडफेक होते, काही गरजू लोकांना पोलीस काही वस्तु घरपोच देतात म्हणून काही बेशरम मूर्खांधीपती चला ट्राय करून पाहू म्हणून पोलिसांना फोन करून त्रास देत आहेत कुठली ही मानसिकता.
आज मुख्य सामाश्या म्हणजे ह्या वैश्विक संकाटातून बाहेर निघणे आणि ते आपण आपल्या घरात बसून च निघू शकतो. म्हणुन आज देश्याच्या एक सुजाण आणि जबाबदार नागरिक असल्याने हे आपले कर्तव्य आहे की आपण आपल्या पोलिस बांधवाचा ताण काही अंशी कमी करूयात.
घरात राहून आपली आपल्या परिवाराची सोबत देश्याची काळजी घेऊ या।
ईश्वर लवकर ह्या संकटातून देशाला बाहेर काढो हीच प्रार्थना.
(फोटो सौजन्य – गुगल व theprint)

हप्त्यांना दिलेली ३ महिन्याची मुभा म्हणजे नक्की काय?

काल भारताच्या रिझर्व्ह बँकेनं मध्यमवर्गीयांसाठी खुशखबर दिली. कर्जाचे तीन महिने हप्ते नाही भरले तरी त्याचा सिबिल स्कोरवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे दास यांनी सांगितले. केंद्र सरकारने काल 1.70 लाख कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा केली होती. त्यानंतर आज आरबीआयने घोषणा करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकांता दास यांनी केली. याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे. गृह, वाहन, उद्योग, या साठीच्या कर्जदारांना याचा उपयोग होईल.

तुमचा एखादा जरी EMI चुकला तरी ज्या बँकेतून EMI वजा होतो ती बँक आणि ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे ती बँक दोघेही दंड आकारतात. तसेच सिबिल स्कोअरही झटकन खाली येतो. हप्ता एकदा जरी चुकला तरीही याचा मोठा फटका बसतो. मात्र, तीन महिने बँकांनी EMI कापू नये, असं रिझर्व्ह बँकेनं सुचवलं आहे. त्यावर निर्णयाचा सर्वाधिकार बँकांना दिला आहे. मग याचा काय परिणाम होईल? असा प्रश्न पडतो.

सदर निर्णय दि. ३१ मार्च पासून लागू होतो त्यामुळे खरंतर एप्रिल महिन्यापासून याचा लाभ मिळेल. एप्रिल महिन्यापासून पुढचे तीन महिने EMI द्यावा लागणार नाही. अर्थात यासाठी तुमच्या बँकेने तुमच्या कर्जाचे मूल्यांकन करून तुम्हाला हि सवलत दिली पाहिजे.

सवलत कशी घ्याल?
जर तुम्हाला तुमच्या बॅंकेने हि सवलत दिली तर त्या साठी आपल्याला वेगळा अर्ज जमा करावा लागणार आहे आणि त्या अर्जानुसार आपल्याला सवलत मिळेल. आगामी तीन महिन्याच्या कालावधीत आपल्याला जर पूर्ण पगार मिळत असेल तर बँक हि सवलत नाकारू सुद्धा शकते. काही आस्थापने आपल्या कर्मचाऱ्यांना पुढील तीन महिने अधिक पगार देण्याचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला सदर सवलत बँक नाकारू शकते.

सिबिल स्कोअरवर काय फरक पडेल ?
या तीन महिन्यांत एकही हप्ता न गेल्याने याचा परिणाम सिबिल स्कोअरवर होणार नाही. तसे आदेश आरबीआयने दिले आहेत. त्यामुळे आपण सिबिल स्कोर ची चिंता या तीन म हिन्याकरता सोडून द्या. जर आपल्याला बँकेने सवलत नाकारली आणि आपण जर आपण हप्ते भरले नाहीत तर मात्र आपल्या सिबिल स्कोरवर नक्की परिणाम जाणवेल

हप्ता कधी द्यावा लागणार?
एक लक्षात घ्या, आपले तीन हप्ते सरकारने माफ केलेले नाहीत तर ते हप्ते तीन महिने न भरण्याची मुभा दिलेली आहे. तीन महिन्यानंतर आपले राहिलेले सर्व हप्ते आपल्याला भरावेत लागणार आहेत. त्यामुळे जर आपण घेतलेल्या कर्जाची मुदत जर अजून १५ महिन्याने संपत असेल (जून २०२१) तर आता आपले कर्ज १८ महिन्याने (सप्टें. २०२१) संपेल. आपण जर कर्जमुक्त रहावे असे आपणास पटत असेल तर हि माफी आपण न घेतलेलीच बरी हा पण जर तुमच्या कडे हप्त्याची रक्कम भरायची सोय नसेल तरंच!

कर्जाच्या व्याजाचे काय?
कर्जाचे हप्ते भरणे तीन महिन्याने लांबले आहे तसेच कर्जाची मुदत पण तीन महिने पुढे गेलेली आहे तर मग व्याजाचे काय? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
आपण कर्ज परतफेडीची मुदत वाढवल्याने त्या वाढलेल्या तीन महिन्यासाठीचे व्याज आपल्याला भरावे लागणारच आहे. त्याबाबत सरकारने कुठलीही माफी दिलेली नाहीये. त्यामुळे अजून तीन महिन्याचे व्याज आपल्याला भरावे लागणार आहे. जर आपल्याकडे १० लाखाचे कर्ज असेल ज्याची मुदत १५ वर्षाने संपत आहेत आणि ते कर्ज आपण ८% ने घेतले असेल तर १५ वर्षाकरीता आपण ७,२०,००० व्याज आधी भरत असू तर आता १५ वर्षे तीन महिन्याकरता आपल्याला ७,३४,००० व्याज भरावे लागणार आहे म्हणजे आपल्याला एकूण १४,००० व्याजापोटी अधिक द्यावे लागतील.

नक्की काय करावे?
जर आपल्याला पूर्ण पगार मिळत असेल अथवा आपल्याला हप्ता भरणे शक्य असेल तर आपण हि सवलत घेऊन आपलाच १४,००० चा तोटा करून घेऊ नये तसेच कर्जफेडीची मुदत वाढवण्यात सुद्धा काहीच अर्थ नाही. जर काही कारणाने आपणांस पूर्ण पगार मिळत नसेल तर आणि इतर ठिकाणाहूनही हप्त्याची काहीच सोय होत नसेल तरच आपण शेवटचा पर्याय म्हणून हि सवलत घ्यावी. आगामी काळात आर्थिक मंदी येणार हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. कालच IMF कडून त्यासंदर्भात तसे व्यक्तव्य पण आले आहे त्यामुळे आपण आपले कर्ज अधिक लवकर संपवलेले अधिक फायद्याचेच राहील.

मनाची काजळी दूर करणारी दिवे लागण !

तिन्हीसांजा झाल्या , दिवा लावला की हात-पाय धुवून घरातील मोठ्यांबरोबर लहानांनीसुद्धा देवासमोर बसावे.दिव्याला नमस्कार करून शुभंम करोति ,रामरक्षा ,भीमरुपी,मनाचे श्लोक म्हणायचे हे घरोघरी पूर्वी नित्यनेमाने दिसणारे चित्र आता पुसट झालयं.
हे सगळ आठवण्याचे कारण म्हणजे करोनामुळे सगळं ठप्प झालयं….तेव्हा एकूणच कामाची धावपळ कमी झाल्याने नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ वाचनाला देता येतोय.नुकतचं प्रा.प्रवीण दवणे यांचे ‘मुक्तछंद ‘वाचून संपवले, त्या मधील ‘प्रार्थनेतलं महन्मधुर काव्य !’हा लेख करोनाच्या या संकटकाळात मनाला अगदी स्पर्शून गेला..काहीतरी मागे सुटतयं, हरवतयं ते काय याची लख्ख जाणीव झाली आणि मनात रेंगाळली ती बालपणीची ‘मनातली काजळी दूर करणारी तिन्हीसांजेची दिवेलागण !’
त्या अजाण वयात त्या श्लोकांचा अर्थ कळत नसला तरी त्यामधून अपूर्व मनःशांती मिळत असे.आता मात्र कळते पण वळत नाही अशी स्थिती आहे. आजकाल आजी-आजोबा घरात नसतात,आई-वडील दोघेही working असल्याने वेळेचा अभाव ,एकूणच रोजची धांदल या सबबींमुळे बहुतेक घरांमधे नित्यपाठाला रजा दिलीय.त्याचे महत्त्व पटत असलं तरी त्यात सातत्य उरले नाही.रोज म्हणण्याने सातत्य येते आणि या सातत्यातूनच परंपरा,संस्कृती व संस्कार रुजत असतात.

सध्या करोनामुळे मुंबई-पुणे ही माणसांनी भरलेली शहरं ओस पडलीत,गेल्या काही दिवसांपासून आपण घरी आहोत T.V. ,mobile, पुस्तकं आणि जवळची माणसे सोबतीला असुनही कंटाळा आलाय…खबरदारी म्हणून अजून बरेच दिवस घरात बसावे लागणारचं…’काही होत नाही बाहेर फिरल्याने ‘
हा अतिशहाणपणाच युरोपिय देशांना नडलायं….करोनाविषयी updates बघायला हवेत पण दिवसभर चर्चासत्राचा अतिरेकही नकोच.शेवटी कायतर.. अति सर्वत्र वर्जयेत | असो. पण घरात अजून किती दिवस अडकून बसणार,कधी संपणार हे सगळं, रूग्णांची वाढती संख्या व होणारे मृत्यू ,युरोपिय देशांची दुरावस्था व त्यातुन सतत वाटणारी भीती व धास्ती या सगळयातून सारखा येतोय एक प्रकारचा ‘mental sickness ‘आणि ‘negativity’..
नेमक्या ह्याच वेळी
प्रार्थनेचं सामर्थ्य अधिक गहीरे होऊन जाणवतय कारण हा ‘mental sickness’ येऊच नये म्हणून प्रार्थना counseling चे काम पूर्वीपासूनच करत आहेत.जीवनातला काळ कधी सुकर असेल तर कधी कठीणही असेल.दुष्काळ ,महापूर,महामारी इ.संकटे येतातआणि जातात… ही जगरहाटी चालतं राहणार .
पण कठीण काळात मनात आशा,आत्मविश्वास,धैर्य , सामर्थ्य टिकवून ठेवतं ते हेच -प्रार्थानेचं सुंदर रसायन! आणि (प्रा .दवणेंचा लेख वाचल्यावर) तीव्रपणे वाटून गेले आजपासून फक्त देवघरातच नाही तर मनातही दिवेलागण व्हावी.

(चित्र आंतरजालावरून साभार)