सुजाण पालकत्व – जबाबदारी, संस्कार आणि समतोल.

सुजाण पालकत्व – जबाबदारी, संस्कार आणि समतोल.

खरंतर पालक, कुटुंब, शिक्षक आणि समाज या सगळ्यांचीच भूमिका मुलांच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाची असते. पण जन्मापासून मूल सर्वाधिक वेळ आई-वडिलांच्या सान्निध्यात वाढत असल्याने, मुलाच्या विचार-वर्तनावर सर्वाधिक परिणाम हा पालकांचाच होत असतो. म्हणूनच “पालकत्व” ही केवळ नात्याची नव्हे तर जबाबदारीची, संवेदनशीलतेची आणि सजगतेची कसोटी असते.

पालक – मुलांचे पहिले शिक्षक

लहान मूल म्हणजे कोरी पाटी. त्या पाटीवर काय रेखाटायचे हे पूर्णपणे पालकांवर अवलंबून असते. जसे कुंभार मातीचे भांडे घडवताना अगदी काळजीपूर्वक प्रमाण ठेवतो, तसेच पालकांनी आपल्या वर्तनात, बोलण्यात आणि कृतीत जागरूकता ठेवली पाहिजे. कारण मातीचं भांडं एकदा घडून तयार झाल तर पुन्हा घडवणं कठीण; तसंच बालमनावर उमटलेले संस्कारही कायमचे ठासतात.

लहानपणी केलेल्या प्रत्येक कृतीचा परिणाम मोठेपणीच्या वर्तनात दिसतो. उदाहरणार्थ, घरची मंडळी प्रेमाने म्हणतात, “आईला जीभ दाखव, बाबाला ढिशूम दे.” हे जरी निरागस वाटले तरी मूल नकळत आक्रमकतेची सवय शिकते. नंतर जेव्हा तेच मूल मारामारी करते, तेव्हा आपणच विचारतो, “हे असं का वागतंय?” म्हणूनच बालपणातच योग्य-अयोग्य याची स्पष्ट जाणीव करून देणे अत्यावश्यक आहे.

प्रेम आणि शिस्त – दोन पायांवर उभं असलेलं पालकत्व

पालकत्व म्हणजे केवळ लाड करणे नाही. प्रेमाबरोबर शिस्तही तितकीच आवश्यक आहे. शिस्त म्हणजे दडपशाही नव्हे, तर जबाबदारीची जाणीव. बरेच पालक मुलांना शिस्त लावताना अति कठोर होतात जसे की ओरडणे, कोंडून ठेवणे, जेवण न देणे, मारणे. तर काही पालक बक्षिसाच्या नावाखाली चॉकलेट, पैसे किंवा महागड्या वस्तू देऊन मुलांना लोभ शिकवतात. या दोन्ही टोकांपासून दूर राहणे गरजेचे आहे. शिस्त आणि प्रेम यांचा सुवर्णमध्य मुलांमध्ये आत्मविश्वास आणि जबाबदारी निर्माण करतो.

संवादाचे सामर्थ्य

मुलांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी संवाद हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. मुलांना कुतूहल असतं, प्रश्न पडतात. “किती ते  प्रश्न?”, “थांब आता जरा”  असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नांना संयमाने, सोप्या भाषेत उत्तर द्यावं. कारण अनुत्तरित प्रश्नांच्या शोधात मूल चुकीच्या मार्गाला लागू शकतं.

घरात संवाद केवळ पालक-मूलांमध्ये नव्हे, तर सर्व सदस्यांमध्ये असावा. बरेचदा आई-वडील काहीतरी सांगतात आणि प्रेमापोटी आजी-आजोबा त्याच्या विरुद्ध वागतात  जसे आईने चॉकलेट नाकारल्यावर आजीने लगेच दिले. अशा वेळी मुलांच्या मनात ‘आई नाही म्हणाली तरी कुणीतरी देईलच’ असा समज तयार होतो. म्हणून मुलं नसताना सर्व घरच्यांनी एकत्र बसून ठरवावं शिस्तीचे नियम सर्वांनी पाळायचे, एकमेकांना तोडायचं नाही. हे छोटंसं पण प्रभावी पाऊल मुलांच्या संस्कारात मोठं स्थान मिळवतं.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पालकत्व

२०१२ मध्ये जे. एल. लुबी यांनी केलेल्या संशोधनानुसार, लहानपणी पालकांनी दाखवलेली जबाबदारी आणि प्रेम मुलांच्या मेंदूतील “हिप्पोकॅम्पस” भागावर थेट परिणाम करते. हा भाग स्मृती, भावनांवर नियंत्रण आणि शिकण्याशी संबंधित आहे. सुजाण आणि प्रेमळ पालकत्वामुळे हिप्पोकॅम्पसचा विकास अधिक चांगला होतो, ज्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास आणि सामाजिक कौशल्ये वाढतात. उलट, सतत टोमणे, अपमानास्पद बोलणे किंवा दुर्लक्ष केल्यास बालक हताश होतात.
म्हणून “मूर्ख आहेस”, “तुला काहीच समजत नाही” अशी वाक्यं टाळा. त्याऐवजी “तू प्रयत्न केलास हे चांगलं आहे, पुढच्यावेळी अजून नीट होईल” असं प्रोत्साहन द्या.

पालकांचे विविध प्रकार – आणि आत्मपरीक्षणाची गरज

पालकत्वाची अनेक रूपं असतात. काही पालक अपराधी भावनेत जगतात  “मुलांसाठी वेळ नाही म्हणून त्यांच्या प्रत्येक हट्टाला हो म्हणायचं.” काही दबावाखाली जगतात  “लोक काय म्हणतील” या भीतीने उसने पैसे काढून मुलांचे मन राखतात. काही अहंकारी पालक  “आमचं मूल श्रेष्ठच आहे” या भावनेत अडकतात. काही असहाय पालक  “माझं मूल काही ऐकतच नाही” म्हणत हताश होतात. आणि काही अंध अनुयायी  “त्यांच्या मुलाला सायकल दिली, मग मीही देणार.”

प्रत्येक पालकाने स्वतःकडे प्रामाणिक नजरेने पाहणं गरजेचं आहे  मी कोणत्या प्रकारचा पालक आहे? माझं वर्तन मुलांच्या वाढीला पोषक आहे का? हे प्रश्न विचारणे हेच सुजाणतेचं पहिले पाऊल आहे.

सुविधा, प्रेम आणि मर्यादा

मुलांना सुविधा देणं चुकीचं नाही, पण ते “हक्क” बनू नयेत हे पाहणं आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती, कुटुंबाच्या मर्यादा, आणि जीवनातील वास्तव याबद्दल मुलांशी मोकळेपणाने बोला. त्यांना आपल्या घराचा, कुटुंबाचा आणि परिस्थितीचा भाग असल्याची जाणीव होईल.
केवळ दिखावा, भ्रामक प्रतिष्ठा किंवा “इतरांकडे आहे म्हणून आपणही द्यावं” हा दृष्टिकोन मुलांमध्ये अवास्तव अपेक्षा निर्माण करतो. अशा पालकत्वातून वास्तवाशी सामना करण्याची क्षमता कमी होते.

नकाराची सवय आणि जीवनशिक्षण

आज अनेक पालक मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी “हो” म्हणतात. पण जीवनात सर्वच गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे “नाही” स्वीकारण्याची, पराभव पचवण्याची आणि चूक मान्य करण्याची सवय बालपणातच लावली पाहिजे.
जगात कुणीही नेहमी बरोबर नसतं. परिस्थिती, मतभेद, अपयश  या सगळ्याला सामोरं जाण्याचं बळ देणं हेच खरी पालकत्वाची कसोटी आहे. जसं पोहायला शिकायचं असेल तर पाण्यात उतरणं भाग असतं, तसंच जगायला शिकायचं असेल तर मुलांना जीवनाच्या वास्तवात उतरू द्या.

कुटुंब – संगोपनाची शाळा

मुलांना योग्य संस्कार द्यायचे असतील तर फक्त आई-वडीलच नाही, तर संपूर्ण कुटुंबाने एकत्र प्रयत्न करावा. एकजुटीचं वातावरण, ठाम नियम, आणि परस्पर आदर  हे वातावरण मुलांच्या मनावर अमिट ठसा उमटवतं.
पालकांनी घरातील वडिलधाऱ्यांशी संवाद साधून एकमत निर्माण करावं. “आई-वडील रागावले म्हणजे प्रेम कमी नाही, ते संस्कारांची गरज ओळखतात”  हा संदेश सगळ्यांना समजला पाहिजे.

समतोलचं तत्त्व

अती कठोर पालक मुलांना भित्रं बनवतात, तर अती प्रेमळ पालक अवलंबी बनवतात. या दोन्ही टोकांमधला सुवर्णमध्य साधणं म्हणजेच सुजाण पालकत्व.
पालकांनी लक्षात ठेवावं  आपण मुलांसाठी जगत नाही, आपण मुलांना जगायला शिकवत आहोत. त्यांना योग्य मार्ग दाखवा, पण त्यांच्या वाटेवर चालायला त्यांनाच संधी द्या.

 सुजाणतेकडे एक पाऊल

पालकत्व म्हणजे फक्त कर्तव्य नव्हे, ती सतत चालणारी शिकवण आहे  पालकही शिकत राहतात, जसं मुलं शिकतात. मुलांच्या डोळ्यांतून जग पाहण्याची तयारी पालकांनी ठेवली पाहिजे.
सुजाण पालकत्व म्हणजे सर्वकाही मुलांच्या मनासारखं करणे नव्हे, तर त्यांना भावनांबरोबर विवेकही शिकवणं आहे. बाहेरचं जग कोवळं नसतं; म्हणूनच पालकांनी मुलांना जीवनाच्या मैदानात उतरवून स्वतःच्या पंखांवर उडण्याची ताकद द्यावी.

आजच्या पालकांसमोर प्रचंड आव्हानं आहेत  स्पर्धा, तंत्रज्ञान, बदलती मूल्यं. पण प्रत्येक आव्हानामागे एक संधी दडलेली आहे  एक सुजाण, संवेदनशील आणि जबाबदार पिढी घडवण्याची.

सुजाण पालकत्व म्हणजे मुलांवर डोळसपणे संस्कार करणं, त्यांना योग्य दिशा देणं आणि त्यांच्या हातात विश्वासाचा दिवा देणं. अशी पिढी जेव्हा घडेल, तेव्हा समाजही अधिक प्रकाशमान बनेल.

……………………………………………………………………

पल्लवी चिकारे-पळसकर

स्किल इंडिया सर्टिफाइड पॅरेंटिंग कोच.

‘सुजाण पालकत्व’ उपक्रम समन्वयक, युवा रुरल असोशिएशन, नागपूर

 9890665676

pallavi.chikare@yraindia.org

भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदा विश्वविजेता 🏆

0

भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच वनडे आणि टी20 वर्ल्ड कप चा किताब जिंकून इतिहास रचला आहे.

अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

बीसीसीआयने केली विक्रमी बक्षिसाची घोषणा

  • बक्षीस रक्कम: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी महिला संघासाठी 51 कोटी रुपये च्या रोख बक्षिसाची घोषणा केली आहे.
  • यशाचा प्रवास: याआधी 2005 आणि 2017 च्या अंतिम फेरीत संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र यावेळी खेळाडूंनी हा इतिहास बदलला.

महिला क्रिकेटमध्ये मोठे बदल

  • वेतन समानता (Pay Parity): देवजीत सैकिया यांनी नमूद केले की, 2019 ते 2024 या काळात बीसीसीआयचे सचिव राहिलेल्या जय शाह यांच्या नेतृत्वाखाली महिला क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. महिला खेळाडूंसाठी वेतन समानता लागू करणे हे त्यातील एक मोठे पाऊल होते.

आयसीसी बक्षीस रकमेत मोठी वाढ

  • आयसीसी बक्षीस: आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी महिला वर्ल्ड कपच्या बक्षीस रकमेत 300 टक्क्यांनी वाढ केली. ही रक्कम 2.88 दशलक्ष डॉलरवरून ($2.88 मिलियन) 14 दशलक्ष डॉलर (सुमारे 123 कोटी रुपये) झाली आहे.

ऐतिहासिक क्षणावरील प्रतिक्रिया

  • देवजीत सैकिया: “1983 मध्ये कपिल देव यांनी भारताला वर्ल्ड कप जिंकून क्रिकेटचे एक नवे युग सुरू केले होते. आज आमच्या महिला संघाने तोच इतिहास पुन्हा घडवला आहे. हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने केवळ ट्रॉफीच जिंकली नाही, तर कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत. त्यांनी येणाऱ्या पिढ्यांतील महिला क्रिकेटपटूंसाठी प्रेरणा बनून दाखवले आहे. ऑस्ट्रेलियाला हरवून सेमीफायनल जिंकणे हाच या प्रवासातील सर्वात मोठा टप्पा होता.”

“लोकसंवाद डॉट कॉम” चा दिवाळी अंक २०२५

“लोकसंवाद डॉट कॉम” चा दिवाळी अंक २०२५

“लोकसंवाद डॉट कॉम” चा दिवाळी अंक आपली वैचारिक दिवाळी साजरी करीत आहे.

नेहमीप्रमाणे लोकसंवादचा दिवाळी अंक आपल्या वाचकांचे वैचारिक खाद्य पूर्ण करेल यात शंका नाही.

दरवर्षी प्रमाणे दर्जेदार साहित्य आपल्याला या अंकात वाचायला मिळेल.

आपल्या सतत मिळणाऱ्या प्रेमासाठी व पाठींब्यासाठी आपले धन्यवाद..!

               

 

“लोकसंवाद दिवाळी अंक २०२५”

वर्ष – सहावे.
मूल्य – ३०० रु.
पृष्ठ संख्या – २०८
मुख्यसंपादक – नितीन राजवैद्य.
दिवाळी अंक संपादक – श्रेयस पन्नासे.
मुखपृष्ठ – तुषार कठाळे
मांडणी – मित्राय पब्लिकेशन.
दिवाळी अंका करिता संपर्क – ९८८१५६०१५५ (WhatsApp only)
ईमल – sampadak.loksanvad@gmail.com
www.loksanvad.com

भारत-अफगाणिस्तान संबंधांचे नवे पर्व: तालिबानचे परराष्ट्र मंत्री दिल्लीत.

भारत-अफगाणिस्तान संबंधांचे नवे पर्व: तालिबानचे परराष्ट्र मंत्री दिल्लीत.

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांचा नवी दिल्ली दौरा हा याच बदलाचे प्रतीक आहे. भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव आनंद प्रकाश यांनी त्यांचे स्वागत केले. तालिबानने ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतरचा हा पहिलाच इतका उच्च-स्तरीय दौरा आहे. कूटनीतीच्या दृष्टीने या भेटीला मोठे महत्त्व आहे, कारण यातून भारत अफगाणिस्तानमधील आपल्या जुन्या व महत्त्वपूर्ण हितसंबंधांना पुन्हा चालना देऊ इच्छित आहे.

भारत सरकारने अद्याप तालिबान सरकारला औपचारिकपणे मान्यता दिलेली नाही. मात्र, अफगाणिस्तानच्या जनतेसाठी मदत आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी भारताने मागील काही महिन्यांपासून तालिबानच्या अधिकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद सुरू ठेवला आहे. मुत्ताकी यांच्या भारत भेटीला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) निर्बंध समितीने विशेष ‘सूट’ (Waiver) दिली आहे, कारण ते निर्बंध असलेल्या व्यक्तींच्या यादीत आहेत.

या भेटीमुळे नवी दिल्लीसमोर एक राजनैतिक पेच उभा राहिला आहे. तालिबानला मान्यता नसल्यामुळे, मुत्ताकी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या भेटीच्या वेळी तालिबानचा ध्वज भारतीय ध्वजाशेजारी लावायचा की नाही, यावर चर्चा झाली. सध्या भारत अफगाणिस्तानमधील दूतावासात जुन्या म्हणजेच ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान’चाच (अशरफ गनी यांच्या सरकारचा) ध्वज वापरत आहे. तरीही, मुत्ताकींना देण्यात आलेला उच्चस्तरीय प्रोटोकॉल हा दोन्ही देशांमधील ‘बर्फ वितळवण्याच्या’ प्रक्रियेतील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अफगाणिस्तान भारतासाठी नेहमीच अत्यंत महत्त्वाचा देश राहिला आहे. त्याला ‘हार्ट ऑफ एशिया’ (Heart of Asia) असेही म्हटले जाते.

अफगाणिस्तान हा भारताला इराणमधील चाबहार बंदरामार्गे मध्य आशियाई देशांशी जोडणारा सर्वात सोयीचा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. पाकिस्तानमुळे असलेला जमिनी मार्गावरील अडथळा या मार्गाने दूर होतो. त्यामुळे, व्यापार आणि आर्थिक हितसंबंधांसाठी अफगाणिस्तानची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

अफगाणिस्तानची भूमी भारताच्या विरोधात दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाऊ नये, ही भारताची मुख्य सुरक्षा चिंता आहे. तालिबानने भारतात झालेल्या काही दहशतवादी हल्ल्यांचा (उदा. काश्मीरमधील पहलगाम हल्ला) निषेध केला आहे, जो एक सकारात्मक संकेत मानला जातो. मात्र, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटनांवर तालिबान नियंत्रण ठेवेल का, हा प्रश्न भारतासाठी गंभीर आहे.

पूर्वीच्या अफगाण सरकारसोबत भारताचे संबंध चांगले होते. अमेरिकेने बगराम एअरबेसचा वापर अफगाणिस्तानात तळ म्हणून केला होता. त्यावेळेस, अमेरिकेला विरोध करताना भारताने अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय हिताला पाठिंबा दिला होता, ज्यामुळे भारताचे स्थान अफगाण नागरिकांमध्ये अधिक बळकट झाले होते.

मुत्ताकी यांचा भारत दौरा पाकिस्तानसाठी सर्वात मोठी ‘डोकेदुखी’ ठरला आहे, कारण या भेटीमुळे पाकिस्तानचे प्रादेशिक स्थान कमकुवत झाले आहे.

मुत्ताकी यांना भारत भेटीची परवानगी मिळू नये म्हणून पाकिस्तानने थेट संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आक्षेप घेतला होता. भारताच्या राजनैतिक प्रयत्नांमुळे पाकिस्तानचा हा विरोध यशस्वी झाला नाही.

अफगाणिस्तान आता पाकिस्तानवरील आपले आर्थिक अवलंबित्व कमी करण्यासाठी चाबहार बंदराचा अधिक सक्रियपणे वापर करू इच्छित आहे.

भारत-अफगाणिस्तान संबंध सुधारत असताना, तालिबानने पाकिस्तानसोबतची ‘ड्युरंड लाईन’ ही सीमा रेषा मान्य नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढला आहे.

या सर्व कारणांमुळे पाकिस्तानला एकाच वेळी भारताकडून राजनैतिक आणि अफगाणिस्तानकडून सीमा सुरक्षा व आर्थिक असे दुहेरी आव्हान उभे राहिले आहे.

तालिबान सत्तेत आल्यावर पाकिस्तानला वाटले होते की, त्यांचे भारताशी असलेले संबंध बिघडतील. मात्र, तसे झाले नाही. उलट, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेमुळे अफगाण तालिबान आणि पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत.

चीननेही तालिबानशी जवळीक वाढवली आहे. अशा परिस्थितीत, प्रादेशिक भू-राजकारणात आपले महत्त्व कायम ठेवण्यासाठी भारताने अफगाणिस्तानशी चांगले संबंध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

अमीर खान मुत्ताकी यांचा भारत दौरा हा केवळ एक राजनैतिक कार्यक्रम नाही, तर अफगाणिस्तानच्या जनतेसोबतचे जुने आणि ऐतिहासिक संबंध कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. भारताने अफगाण जनतेला अन्नधान्य, औषधे आणि इतर मानवतावादी मदत सातत्याने पुरवली आहे. या भेटीतून द्विपक्षीय व्यापार वाढवणे, शांतता आणि स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि दहशतवादाच्या धोक्यावर नियंत्रण ठेवणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे. थोडक्यात, वास्तवाचे भान ठेवून भारत अफगाणिस्तानमधील बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेत, आपल्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलत आहे.

सध्या अशी माहिती समोर येत आहे की, या महत्त्वाच्या दौऱ्यामुळे पाकिस्तानचा इतका तिळपापड (अतिशय संताप) झाला आहे की, पाकिस्तानी सैन्याने काल रात्री अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे एअर स्ट्राईक (हवाई हल्ला) केला आहे.

जर पाकिस्तान इतका संतापला असेल, तर या एका गोष्टीवरूनच हा दौरा किती महत्त्वपूर्ण आहे, हे स्पष्टपणे लक्षात येते..

जय हिंद!🇮🇳
– जयसिंग मोहन 🚩

बळी.

  • बळी म्हणजे केवळ चक्रवर्ती सम्राट नव्हे, तर त्रैलोक्यावर अधिराज्य गाजवलेला आणि प्रजेने काळजात चिरकाळ जपून ठेवलेला चिरंजीवी राजा ! न्याय, प्रेम आणि समृध्दीने त्रैलोक्य उजळून टाकणारा दानवीर, महाबली बळी नेमका कोण होता ? दानशीलतेचं सर्वोच्च शिखर गाठणारा बळी नेमका कसा होता ? जिथे युद्धात त्याचा पराक्रम विजेसारखा झळाळत होता… सभेत त्याचा विचार समुद्रासारखा खोल होता… आणि प्रजेवरचं प्रेम वसंतासारखं बहरलेलं होतं… परंतू त्याच्या ह्या भव्यतेच्या आड दडले होते… संघर्ष, विश्वासघात आणि नियतीचे खेळ. बळीचं हृदय जितकं विशाल होतं, तितकंच हळवं होतं. प्रेम, मैत्री, नातेसंबंध ह्यांच्यात संतुलन राखणारा हा राजा शेवटी कोणत्या निर्णायक क्षणी नियतीसमोर नतमस्तक झाला ? आपण आजही म्हणतो, ईडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे ! ते बळीचं राज्य नेमकं कसं होतं ? त्या बळीच्या राज्याच्या अद्वितीय काळाचं जिवंत दर्शन ह्या कादंबरीतून सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. ही केवळ एका राजाची कथा नाही, तर प्रजेच्या काळजाला स्पर्शून जाणारी, सत्याच्या आसनावर बसलेल्या…धर्म, न्याय, दया आणि अपरंपार दानशीलतेच्या सुवर्णयुगाची उज्वल साक्ष आहे ! ही आहे पराक्रमाच्या गजरात, प्रेमाच्या गंधात आणि त्यागाच्या तेजात न्हालेली त्रैलोक्याची अखंड स्मृती ! ही आहे…ज्याच्या हृदयात प्रजेचा प्रत्येक श्वास सुरक्षित होता अशा महान चिरंजीवी राजाची महागाथा !

 

  • कादंबरी – बळी प्रकाशक – मधुश्री पब्लिकेशन पुणे.
  • लेखिका – अंजली दासखेडकर.
  • किंमत – 350.
  • WhatsApp – 8421188872
  • Website – www.madhushreepublication.com

संघभाव.

संघभाव

आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.

संघाच्या गाभ्याला स्पर्श करणारे, संघविचारांची खोली उलगडणारे आणि संघसूत्रांवर भाष्य करणारे पुस्तक.

मूल्य : 200/- ₹
सवलत मूल्य 160/- ₹

संपर्क – 

  • 9898989898
  • support@vivekprakashan.in

संघाचे समरसतेतुन राष्ट्रनिर्माणाकडे जाण्याचे स्वप्न.

संघाचे समरसतेतुन राष्ट्रनिर्माणाकडे जाण्याचे स्वप्न.

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षाचा झाला. संघाचा इतिहास जवळ जवळ आज सर्वांना काही प्रमाणात का असोना मात्र माहितीये.पण त्या इतिहासातून आज संघ वर्तमानात कुठल्या दिशेने चालला आहे हे लिहायला मला जास्त आवडेल.
आज जर संघ सांगायचा झाला तर मी म्हणेन की शंभर वर्षात संघाने जर काही कमावले असेल तर तो प्रत्येक समाजातील व्यक्ती आणि आपुलकीचा, जिव्हाळ्याचा समरस भाव कमावला.
संघाचा मूळ पाया शाखा आहेत, शाखेतून व्यक्तीनिर्माण, आणि व्यक्तीनिर्मार्णातून राष्ट्रनिर्माण. जर आपल्याला आपले राष्ट्र जगाच्या पाठीवर एक आदर्श, प्रेरणादायी शक्तिशाली बनवायचे असेल तर राष्ट्रात सर्वात प्रथम समरसता असणे अत्यंत महत्वाचे आहे.

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेचं एकमेव असं संघटन आहे ज्या ठिकाणी जात कधीही विचारल्या नाही जात. जो जाती मे फसा वो किचड मे फसा.कारण जर भारताला सर्वांना सोबत घेऊन पुढे न्यायचे असेल आणि हिंदुसंस्कृती अबाधित ठेवायची असेल जर जातीच्या फेऱ्यातून बाहेर पडणे खूप गरजेचे आहे.समाजातून स्पृश्य अस्पृश्य हा भेद दूर होणे खूप महत्वाचे आहे.आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सर्व समाजातील घटक वर्गाला सोबत घेऊन पुढे जातोय.आपण सर्व जण हिंदू आहोत आपल्यात कोणीच उच्च आणि नीच नाही, हा भाव प्रत्येक व्यक्तीच्या मनात रुजवण्याचे काम आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय.

मला येथे काही माझे थोडक्यात अनुभव सांगावेसे वाटतात, मी सर्वात प्रथम इयत्ता सातवी मध्ये असतांना संघाच्या शाखेत जायला सुरुवात केली. आणि मला शाखेतील खेळ संपल्यावर एक घोषणा खूप मनाला भाऊन जायची…खेळ संपल्यावर खेळ घेणारे मास्तर म्हणायचे कोन जिता भाई कोन जिता? आणि त्यामागे सर्व स्वयंसेवक म्हणायचे संघ जिता भाई संघ जिता… म्हणजेचं आपण शाखेत सुद्धा खेळत असतांना कोणीही जिंकलं नाहीये, आणि कोणीही हारलं देखील नाहीये तर आपण सगळे जिंकलो आहोत, म्हणजेचं आपण समूहात आहोत म्हणून संघ जिता भाई संघ जिता. या एका घोषणेमागील भाव जर मन लावून समजून घेतला तर त्याचा अर्थ समरसता या गोष्टीला घेऊन खूप मोठा होऊ शकतो, तो म्हणजे आम्ही सर्व समान आहोत. जिंकलो तरीही संघ जिंकेल. आणि शाखेत कधीही कोणाला जात विचारल्या जात नाही.म्हणून आज संघातून समरसतेकडे आपण भारत घेऊन जात आहोत. संघात आले की माणूस हा समरस होतोचं त्याच्या मनात कधीही कोणाच्या जातीबद्दल चा द्वेष दिसून येत नाही.

मी एक दोनदा विभाग प्रचारकांसोबत खेडेगावात प्रवासाला सुद्धा गेलोय, आणि गावात स्वयंसेवकांच्या घरी मुक्कामी पण राहिलोय. मी मुद्दाम प्रचारकांचे नांव येथे घेत नाहीये कारण त्यांना त्यांच्या नावाची प्रसिद्धी आवडणार नाही.पण प्रचारकांसोबत केलेला एखाद्या गावात मुक्कामी प्रवास हा खूप काही आयुष्यात शिकवून जातो.. गावात गेल्या बरोबर तिथले स्वयंसेवक विभाग प्रचारक येणार म्हणून उपस्थित असतात, सगळे राष्ट्रभावनेने प्रेरित झालेले असतात. आणि अश्याच स्वयंसेवकांकडे मुक्कामी राहण्यात एक वेगळाच आनंद असतो, संघात कोणीही कोणाकडे एकमेकांची जात बघून मुक्कामी राहत नाही. संघ स्वयंसेवक प्रत्येकाकडे पाणी चहा कॉफ़ी पितो आणि एकमेकाकडे बंधुत्वाच्या नजरेने बघतो ही आहे संघातून समरसतेकडे जाण्याची पहिली पायरी. म्हणून आज समाज संघात येऊन समरस होऊन राष्ट्रकार्यात लागलाय.

राष्ट्रनिर्माणाच्या या यज्ञात आम्ही सर्व एक आहोत हा भाव घेऊन स्वयंसेवक काम करतो. आज अनेक सेवा वस्तीत संघाचे सेवा प्रकल्प चालतात त्याठिकाणी आपलेच बंधू जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत, जे काही कारणास्तव मघास राहिले अश्यांची सेवा करणे सुद्धा आमचे काम आहे, हा भाव मनात ठेऊन संघ जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करतोय.

सेवावस्तीत संघ दवाखाणे, शाळा, व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. म्हणून आज खऱ्या अर्थाने संघातून समरसता नांदते आहे. मी तर म्हणेन आज प्रत्येकाने संघात येऊन या समरसतेच्या यज्ञात आहुती टाकावी आणि आपल्या देशाच्या राष्ट्रनिर्माणात आपला खारी इतका तरी वाटा असावा याची प्रेरणा मनी जागवावी.

संघ म्हणजे व्यक्तीनिर्माण, संघ म्हणजे समरसता,संघम्हणजे राष्ट्रनिर्माण आणि आपण सर्व जण संघात येऊन समरस भारताचे मॉडेल काही दिवसात जगापुढे नक्की ठेऊ याची पूर्ण खात्री आहे.
संघ शंभर वर्षाचा झाला आणि शंभर समाजाला एकत्र घेऊन एकमेकांप्रति प्रेमाची भावना रुजवीत गेला.पथ का अंतिम ध्येय नही है सिंहासन चढते जाना, सब समाज को साथ लिये आगे है बढते जाना…

भारत माता की जय
RSS@100

अभिषेक म पत्की.

मनाचा दसरा कधी काढलाय ?

मनाचा दसरा कधी काढलाय ?

नवरात्र , दसरा जवळ येतोय. घरोघरी या निमित्ताने साफसफाई जोरात चालू आहे. वर्षभर घरात सासलेली घाण , जळमटे ,  टाकाऊ सामान आपण या वेळी बाहेर टाकतो. याने होत काय तर घर स्वच्छ व सुंदर दिसतं.  नवीन एखादी वस्तू घेतली जी या व पुढे येणाऱ्या  दिवाळी  सणा निमित्त घेतली देखील जाते तिला निरुपयोगी वस्तू बाहेर गेल्याने मुबलक जागा मिळते. घर मोकळा श्वास घेतं. हे आपण सर्व दरवर्षी नियमीत करतो. हे झालं घराचं पण मनाचे काय ? कधी आपण ते स्वच्छ  केलंय ?  कधी त्यात साठलेली जळमटं आपण काढलीत ? कधी त्यात नीटसं डोकावून पाहिलंय ?  याचे  उत्तर नाही असंच असेल. स्वच्छ घरात बुरसट , राग, व्देष, ईर्षा,  विषारी स्पर्धा युक्त मनाची माणसे आनंदी कशी राहू शकतील. मागील एखाद्या वाईट घटनेचा, अपमानाचा मनावर असलेला पगडा आपल्याला पुढे कसा जाऊ देईल. तेव्हा मनात सासलेले नकोश्या विचारांचे गाठोडे घरातल्या  टाकाऊ वस्तूप्रमाणेच बाहेर प्रयत्नपूर्वक टाकावे लागेल. घर साफ करण्यासाठी  जेवढी आपण मेहनत घेतो तेवढी मन साफ करण्यासाठी घेत नाही. त्याची गरजही  कधी आपल्याला भासत नाही. वर्षा-वर्षाला घर तर साफ केलं पण वर्षानुवर्षे मन मात्र कोंदलेलंच राहिलं. अश्या  कोंदलेल्या मनात नवीन विचार कसा रुजेल ? नवीन गोष्टी आपण  कश्या शिकूत. तेव्हा घरा सोबत मनाचाही  दसरा काढणे गरजेचे आहे . आपल्या मनाला विचारा आपले विचार योग्य दिशेने जात आहेत का ? एखाद्या व्यक्ती बद्धल धरलेला आकस योग्य आहे का ? एखाद्या बरोबर करत असलेली आपली तुलना आपल्याला चिंताग्रस्त तर बनवत नाही ना ? प्रगतीसाठी जो मार्ग मी निवडला आहे तो योग्य आहे का ? चुकीचा मार्ग निवडून मी माझे जीवन तणावग्रस्त तर बनवत नाही ना ?  एखाद्याचा व्देष,  ईर्षा करून मी काय साध्य करतोय?  या सर्व प्रश्नांचा विचार  वर्षातून  कमीत कमी एकदा तरी करावाच लागेल.नकारात्मक विचार टाकून सकारात्मक विचारांची कास धरावी लागेल . घरासारखाच मनाचा कोपरांन कोपरा स्वच्छ करावा लागेल कारण मनःस्थिती जेव्हा बदलेल तेव्हाच परिस्थिती बदलेल. मनावरील ओझे आपल्याला नेहमी मागे खेचत असते निरुपयोगी वस्तू सोबत आपण कधीही राहत नाही तर निरुपयोगी विचारां सोबत कसे राहू शकतो ? याचा  विचार करावा लागेल. तरंच प्रगतीची नवीन दालने खुलतील. मन प्रसन्न राहील. हे सर्व करणे केवळ आपल्या आणि आपल्याच  हातात आहे. तर चला या वर्षी ठरवूया घरासोबत मनाचाही दसरा काढायचा. तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सव व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

महेश भा. रायखेलकर

9326612436

पत्ता : महेश भालचंद्रराव रायखेलकर  “गंगा स्मृती”, घर क्रमांक 1, रोहिणी नगर , विजापूर रोड, सोलापूर 413004.. मोबाईल व व्हाट्सअँप : 9326612436

ई-मेल : vcdigitalonline@gmail.com

संघ शताब्दी वर्ष.

संघ शताब्दी वर्ष –

इतिहासाच्या पार्श्वभूमीवर
भारतीय समाजजीवनात एकात्मता, राष्ट्रनिष्ठा आणि संस्कारित पिढी घडविण्याचे महान कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा शताब्दी वर्षाचा अभिषेक लाभत आहे. संघाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर हे कार्य केवळ एका संस्थेचे नव्हे तर एका अखंड राष्ट्रचेतनेचा हा प्रवास आहे.
संघाची स्थापना विजयादशमीच्या दिवशी, विक्रम संवत १९८२ म्हणजेच २७ सप्टेंबर १९२५ रोजी डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांनी केली. सुरुवातीच्या त्या पहिल्या सभेत अवघे वीस-पंचवीस जण सहभागी झाले होते. त्याच बैठकीत हिंदू समाजाच्या संघटनाची बीजे रोवली गेली. पुढे १७ एप्रिल १९२६ रोजी या संस्थेला औपचारिक नाव देण्यात आले – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS).
दैनिक शाखा व संघकार्याची सुरुवात
२८ मे १९२६ रोजी नागपूरमधील मोहितेच्या बाड्यातील मैदानावर विधिवत दैनिक शाखेचा प्रारंभ झाला.
संघाची शाखा भगव्या ध्वजाला वंदन करून प्रारंभ होते व भारत मातेला वंदन करून पूर्ण होते. शाखेत कोणत्याही देवतेची, व्यक्तीची प्रतिमा ठेवली जात नाही. सर्वोच्च स्थान ध्वजाला दिले आहे. ध्वजासमोर सर्व समान उच्च नीच शिक्षित अशिक्षित शहरी ग्रामीण अशा कोणत्याही प्रकारच्या भेदाला स्थान नाही.
पुढे १९ डिसेंबर १९२६ रोजी डॉ. हेडगेवार यांना संघाचे पहिले सरसंघचालक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. १९२७ मध्ये प्रथम शिक्षणवर्ग (OTC) आयोजित झाला. १९२८ मध्ये गुरुपौर्णिमेला भगवाध्वजपूजनासह गुरुदक्षिणा, प्रतिज्ञा कार्यक्रम आणि प्रथम शिक्षा शिबिर घेण्यात आले. त्याच काळात घोषवादनासह पथसंचलनाचीही सुरुवात झाली.
१९२९ मध्ये प्रथमच डॉ. हेडगेवार यांना संघस्थानावर सरसंघचालक प्रणाम देण्यात आला. त्याच वर्षी अनौपचारिक स्वरूपात प्रचारक परंपरेची सुरुवात झाली. १९३२ मध्ये मात्र ही व्यवस्था अधिकृत झाली आणि बाबासाहेब आपटे, दादाराव परमार्थ, रामभाऊ जामघडे व गोपालराव येरकुंटवार यांना प्रचारक म्हणून विविध ठिकाणी पाठविण्यात आले.
१९३० मध्ये जंगल सत्याग्रहाच्या वेळी डॉ. हेडगेवार यांनी स्वतः सरसंघचालकपदावरून बाजूला होत डॉ. परांजपे यांच्याकडे दायित्व दिले. सत्याग्रह करून ते तुरुंगात गेले आणि तिथूनही नवे कार्यकर्ते उभे केले. १९३४ मध्ये वर्धा येथे संघाच्या शिबिरात महात्मा गांधी आले आणि स्वयंसेवकांमधील अस्पृश्यतेचा पूर्ण अभाव पाहून ते अत्यंत प्रभावित झाले.
१९३९ मध्ये सिंधी येथे झालेल्या बैठकीत संस्कृतमधील आज्ञा व प्रार्थना निश्चित करण्यात आली. हा बदल १९४० च्या शिक्षणवर्गापासून लागू झाला. २१ जून १९४० रोजी डॉ. हेडगेवार यांचे निधन झाले, मात्र त्याआधीच त्यांनी माधवराव सदाशिव गोलवलकर (गुरुजी) यांना द्वितीय सरसंघचालक म्हणून मनोनीत केले होते.
१९४२ मध्ये इंग्रज सरकारने संघाच्या परेड व सैनिकी स्वरूपाच्या कार्यक्रमांवर बंदी घातली. त्यावेळी पर्यायी स्वरूपात विविध खेळांचा समावेश करण्यात आला. पुढे काळानुरूप संघकार्याच्या शारीरिक पद्धतीत बदल होत गेले. १९७७ मध्ये नियुद्ध व योगचाप या नव्या पद्धतींचा समावेश करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा इतिहास एका सामाजिक-सांस्कृतिक क्रांतीची गाथा आहे. संघाने राष्ट्रजीवनात संघटनेचे बीज रोवून आज शताब्दी वर्षात प्रवेश केला आहे. शिस्त, त्याग, साधना आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांच्या आधारे उभा राहिलेला हा प्रवास भारतीय समाजासाठी प्रेरणादायी आहे.

श्रीकांत तिजारे

भारतमाता: त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी.

भारतमाता: त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी.

भारतीय संस्कृतीत पृथ्वीला ‘भूमाता’ म्हटले गेले आहे. अथर्ववेदात “माता भूमिः पुत्रोऽहम् पृथिव्याः” (पृथ्वी ही माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे) असे म्हटले आहे. याच आपल्या मुलभूत विचारांमुळे ‘भारत’ हा आपल्यासाठी केवळ भूमीचा तुकडा नाही, तर आपण त्याला एका आईचे रूप दिले आहे. जसे आपली आई आपल्यावर प्रेम करते, आपले पालनपोषण करते, त्याचप्रमाणे ही भारतमाता आपल्या देशाची भूमी, नद्या, डोंगर आणि इथल्या लोकांना सांभाळते. या आपल्या श्रद्धेमुळे आपल्या देशावर प्रेम करणं हे फक्त एक कर्तव्य राहत नाही, तर ते आपल्या आईवर प्रेम करण्यासारखं पवित्र होतं. या भावनेमुळेच ‘मातृप्रेम’ आणि ‘राष्ट्रप्रेम’ दोन्ही एकसारखे वाटू लागतात.

बंकिमचंद्र आणि ‘वंदे मातरम्’

‘भारतमाता’ या संकल्पनेला साहित्यिक आणि वैचारिक अधिष्ठान देण्याचे श्रेय प्रामुख्याने बंकिमचंद्र चटर्जी यांना जाते. त्यांनी १८७० च्या दशकात ‘वंदे मातरम्’ हे काव्य लिहिले, जे पुढे त्यांच्या १८८२ साली प्रकाशित झालेल्या ‘आनंदमठ’ या राजकीय कादंबरीत समाविष्ट करण्यात आले. या काव्यात बंकिमचंद्रांनी मातृभूमीचे वर्णन केवळ एक भूमी म्हणून न करता, तिला ‘दुर्गा, दशप्रहरणधारिणी’, ‘कमला, कमलदल विहारिणी’ आणि ‘वाणी, विद्यादायिनी’ या प्रकारे संबोधलेले आहे. हे गीत केवळ राष्ट्राची स्तुती नसून, मातृभूमीला साक्षात देवीच्या रूपात पूजणारे एक शक्तिशाली स्तोत्र आहे.

‘आनंदमठ’ ही कादंबरी १७७३ साली बंगालमध्ये झालेल्या ‘संन्याशांच्या बंडा’च्या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. या कादंबरीत देशभक्त संन्यासी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत, भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करताना दाखविले आहेत. या संन्याशांनी स्वतःला भारतमातेचे ‘संतान’ (अपत्य) म्हणून मानले. बंकिमचंद्रांनी यातून एक अत्यंत प्रभावी रूपक (metaphor) तयार केले: भारतमाता ही परकीय जुलुमात अडकलेली ‘आई’ आहे आणि तिचे ‘संतान’ म्हणून भारतीयांनी तिच्या स्वातंत्र्यासाठी ‘बंड’ करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. हा साहित्यिक आविष्कार नंतरच्या स्वातंत्र्य चळवळीतील अनेक क्रांतिकारकांसाठी एक वैचारिक प्रेरणा बनला. स्वातंत्र्यलढ्याला एक ऐतिहासिक आणि नैतिक अधिष्ठान देऊन, बंकिमचंद्रांनी ‘भारतमाता’ या कल्पनेला राष्ट्रीय चेतनेचे केंद्र बनवले.

चित्रकारांचे योगदान

१९०५ मध्ये अबनिंद्रनाथ टागोर यांनी काढलेल्या ‘भारतमाता’ या चित्राने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक नवीन दिशा दिली. हे चित्र केवळ एक कलाकृती नसून, ते राष्ट्रप्रेमाचे आणि स्वदेशी चळवळीचे एक शक्तिशाली प्रतीक बनले.

BharatMata

चित्राचे सविस्तर वर्णन आणि त्याचे महत्त्व

या चित्रात भारतमातेला एका साध्वीच्या रूपात (संन्यासिनीसारखे) दाखवण्यात आले आहे. तिच्या चेहऱ्यावर शांतता आणि दैवी भाव दिसतात. तिच्या शरीरावर भगव्या रंगाचे वस्त्र आहे, जे त्याग, बलिदान आणि अध्यात्म यांचे प्रतीक आहे.

चित्रात भारतमातेच्या चार हातांमध्ये चार वेगवेगळ्या वस्तू आहेत. या प्रत्येक वस्तूचा एक खास अर्थ आहे:

1. श्वेत वस्त्र: हे उत्पादन आणि उद्योजकतेचे प्रतिक आहे.

2. पुस्तक: हे ज्ञानाचे प्रतीक आहे.

3. धान्याची लोंबी: ही अन्न आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

4. जपमाळ: ही भारताच्या अध्यात्मिक स्व-भावाचे प्रतीक आहे.

हे चित्र १९०५ च्या बंगाल फाळणीच्या वेळी आणि त्यानंतर सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीत खूप लोकप्रिय झाले. बंगाल फाळणीमुळे देशभरात ब्रिटिश राजवटीविरोधात असंतोष वाढत होता. अशा वेळी, अबनींद्रनाथ टागोर यांनी काढलेल्या या चित्राने लोकांच्या मनात एकता आणि राष्ट्रीय अस्मितेची भावना जागृत केली.

हे चित्र पाहून लोकांना जाणवले की, भारतमाता ही फक्त एक भौगोलिक भूमी नाही, तर ती एक सजीव आई आहे, जी आपल्याला ज्ञान, अन्न, वस्त्र आणि अध्यात्मिक मार्गदर्शन देते. यामुळे स्वातंत्र्य सैनिकांना आणि सामान्य लोकांना देशासाठी एकत्र येण्याची आणि लढण्याची प्रेरणा मिळाली.

१९०५ मध्ये जेव्हा ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याला जोरदार विरोध झाला. याच फाळणीविरोधी आंदोलनाचा आणि स्वदेशी चळवळीचा भाग म्हणून अबनींद्रनाथ टागोर यांनी हे चित्र काढले होते.

हे चित्र मुळात बंगालच्या एकतेचे प्रतीक होते. बंगालच्या लोकांनी एकत्र येऊन फाळणीला विरोध करावा, अशी भावना त्यामागे होती.

चित्रातील ‘बंग माता’ हे दुःख, त्याग आणि देशाच्या संरक्षणासाठी उभे राहण्याचे प्रतीक मानले गेले.

पण या चित्रातील भावना इतकी प्रभावी आणि शक्तिशाली होती की, ती केवळ बंगालपुरती मर्यादित राहिली नाही. स्वदेशी चळवळ लवकरच देशभर पसरली आणि हे चित्र संपूर्ण भारतीय राष्ट्रवादाचे प्रतीक बनले. त्यामुळे, जे चित्र सुरुवातीला बंगालच्या लोकांनी आपली ‘बंग माता’ मानले होते, ते कालांतराने सर्व भारतीयांनी आपली ‘भारत माता’ म्हणून स्वीकारले. या बदलामुळे हे चित्र एका प्रदेशाच्या अस्मितेतून बाहेर पडून संपूर्ण राष्ट्राला एकत्र आणणारे एक शक्तिशाली चिन्ह बनले.

पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी काढलेलं चित्रही प्रसिद्ध आहे. त्यांनी भारतमातेला एका बाळासोबत दाखवलं आहे, ज्यामुळे ती खऱ्या आईसारखी दिसते. या चित्रात त्यांच्या साडीचा भाग भारताचा नकाशासारखा दिसतो. त्यांच्या पायाजवळ दिसणारं पाणी हिंदी महासागराचं प्रतीक आहे. जवळच असलेला दगड श्रीलंकेसारखा दिसतो.

दुर्गामाता व महिषासुर वध

‘देवी भागवता’ मध्ये वर्णन केल्यानुसार, महिषासुर नावाच्या शक्तिशाली असुराने ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते की त्याचा वध कोणत्याही देव, दानव किंवा मानवाकडून होणार नाही. या वरदानाच्या बळावर उन्मत्त झालेल्या महिषासुराने देवलोकावर आक्रमण करून इंद्रासह सर्व देवांचा पराभव केला. देव हतबल झाल्यावर त्यांनी विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेवाकडे धाव घेतली. महिषासुराचा वध करण्यासाठी, सर्व देवांनी आपल्या तेजाचे एकत्रीकरण करून त्यातून सर्वगुणसंपन्न आणि शस्त्रधारी दुर्गा देवीची निर्मिती केली. या देवीने महिषासुराशी नऊ दिवस घनघोर युद्ध केले आणि शेवटी त्याचा वध करून ‘महिषासुरमर्दिनी’ (महिषासुराचा वध करणारी) हे नाव धारण केले.

दुर्गा माता – महिषासुर कथेचे रूपक

महिषासुराचा वध करण्यासाठी सर्व देव (ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इतर) एकत्र येतात आणि त्यांच्या एकत्रित शक्तीतून देवीची निर्मिती होते, जी कोणत्याही एका देवाच्या शक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. याचप्रकारे, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात विविध पंथ, जात, प्रांत आणि विचारधारांचे लोक एकत्र आले. त्यांच्या एकत्रित शक्तीतूनच ‘भारतमाता’ मुक्त झाली. . दुर्गा-महिषासुर कथा हे सांगते की, कोणताही एक गट किंवा व्यक्ती नव्हे, तर सर्व चांगल्या शक्ती/ सज्जन शक्तींचा समन्वयच असुरी शक्तींचा पराभव करू शकतो आणि अपेक्षित परिवर्तन आणू शकतो.

स्वामी विवेकानंद आणि भारतमाता

स्वामी विवेकानंद यांनी ‘भारतमाता’ या संकल्पनेला एका नव्या उंचीवर नेले. १८९७ साली मद्रासमध्ये (सध्याचे चेन्नई) दिलेल्या एका भाषणात त्यांनी भारतीयांना आवाहन केले की, “आगामी ५० वर्षांसाठी ही जननी जन्मभूमी भारतमाताच एकमेव आराध्य देवी मानली जावी”. पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्रासाठी, मुक्ती हेच सर्वात मोठे पुण्यकार्य आहे. त्यामुळे, वैयक्तिक मुक्तीसाठी केली जाणारी पारंपरिक पूजा बाजूला ठेवून, देशाच्या मुक्तीसाठी सर्व शक्ती एकत्रित करणे हाच खरा ‘धर्म’ आहे. त्यांच्या या विचारांनी राष्ट्रासाठी केलेल्या त्यागाला आणि बलिदानाला एक धार्मिक पावित्र्य दिले. विशेष म्हणजे, त्यांचे हे आवाहन १८९७ मध्ये केले गेले आणि बरोबर ५० वर्षांनंतर, १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, ज्यामुळे त्यांच्या विचारांना एक दैवी आणि भविष्यवेधक महत्त्व प्राप्त झाले.

भगिनी निवेदिता आणि कलात्मक आविष्कार

स्वामी विवेकानंदांची शिष्या असलेल्या भगिनी निवेदिता यांनी ‘भारतमाता’ या संकल्पनेला दृश्यात्मक रूप देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी १९०५ मध्ये अबनींद्रनाथ टागोर यांनी काढलेल्या ‘भारतमाता’ या चित्राला प्रेरणा दिली आणि त्याचे महत्त्व ओळखले. हे चित्र मूलतः ‘बंगा माता’ म्हणून संकल्पित केले होते, परंतु निवेदिता यांनी त्याला ‘भारतमाता’ या अखिल भारतीय प्रतीकात रूपांतरित केले. या चित्रात भारतमातेला भगवे वस्त्र परिधान केलेल्या, चार भुजाधारी हिंदू देवीच्या रूपात दर्शवले आहे. तिच्या हातात ज्ञान, अन्न, वस्त्र आणि दीक्षा यांची प्रतीके आहेत.

निवेदिता यांनी या चित्राचे महत्त्व ओळखून, त्याचे देशभरातील आंदोलनांमध्ये पोस्टर आणि बॅनरवर मोठ्या प्रमाणात पुनर्मुद्रण करण्यास मदत केली. त्यांनी ‘बंगा माता’ प्रतीकाला ‘भारतमाता’ या राष्ट्रीय प्रतीकामध्ये रूपांतरित करण्याची दूरदृष्टी दाखवली. त्यांनी अमूर्त विचारांना मूर्त रूप देऊन, ते सामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले, ज्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला एक शक्तिशाली दृश्यात्मक ओळख मिळाली.

योगी अरविंद आणि आध्यात्मिक राष्ट्रवाद

योगी अरविंदांनी ‘आध्यात्मिक राष्ट्रवाद’ ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते, भारत हा केवळ एक भौगोलिक भूभाग नसून, एक सजीव, आध्यात्मिक सत्ता आहे. त्यांनी राष्ट्रीयत्व आणि सनातन धर्म यांना समानार्थी मानले. अरविंदांनी ‘वंदे मातरम्’मधील ‘दुर्गा’ या शब्दाला भारतमातेचेच एक रूप मानले आणि स्पष्ट केले की, भारतीय संकल्पनेत हिंदू देवी-देवतांचा उल्लेख असणे अपरिहार्य आहे. अरविंदांनी स्वातंत्र्यलढ्याला एक पवित्र ‘योग’ मानले. त्यांच्या मते, भारताची मुक्ती ही केवळ राजकीय मुक्ती नसून, संपूर्ण मानवतेच्या आध्यात्मिक उत्थानासाठी आवश्यक आहे. ही दृष्टी राष्ट्रवादाला एका उच्च नैतिक आणि वैश्विक स्तरावर घेऊन जाते. त्यांच्यासाठी भारतमाता ही निव्वळ एक प्रतीक नाही, तर ती एक ‘अध्यात्मिक सत्ता’ आहे, आणि तिचे रक्षण करणे हे देशभक्तीचे एक सर्वोच्च रूप आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतमाता

विवेकानंद आणि अरविंदांसारख्या विचारवंतांनी ‘भारतमाता’ ही संकल्पना वैचारिक पातळीवर मांडली, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ती आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि संघटनेचा अविभाज्य भाग बनवली. ‘भारत माता की जय’ हा घोष संघ प्रार्थनेचाच भाग आहे. संघाच्या प्रार्थनेत भारतमातेचे वंदन केले जाते. या प्रार्थनेद्वारे, स्वयंसेवक स्वतःला ‘भारतमातेच्या कार्यासाठी’ समर्पित करण्याची शपथ घेतात ‘भारत माता की जय’ हा घोष या विचारांचा एकप्रकारे केंद्रबिंदू आहे.

संघाने ही घोषणा लोकांच्या मानसिकतेत आणि सवयींमध्ये अधिक खोलवर रुजवली.

विविध ठिकाणी उभारली गेलेली भारतमाता मंदिर

भारत माता मंदिर, वाराणसी

‘भारतमाता’ संकल्पनेची सर्वात मूर्त आणि अद्वितीय अभिव्यक्ती म्हणजे वाराणसीतील भारत माता मंदिर. हे मंदिर १९३६ मध्ये स्वातंत्र्यसेनानी बाबू शिव प्रसाद गुप्त यांनी बांधले आणि महात्मा गांधींनी त्याचे उद्घाटन केले. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणत्याही देवी-देवतेची मूर्ती नाही. मंदिराच्या गर्भगृहात अखंड भारताचा एक प्रचंड, संगमरवरी नकाशा (map) आहे, त्या लाच पूज्य मानले जाते. हा नकाशा पूर्व-पश्चिम ३२ फूट २ इंच आणि उत्तर-दक्षिण ३० फूट २ इंच एवढा विशाल आहे, जो ७६२ संगमरवरी तुकड्यांपासून तयार केला आहे. यामध्ये हिमालय आणि इतर ४५० पर्वत तसेच ८०० हून अधिक नद्यांचे चित्रण केले आहे.

हरिद्वारचे भारतमाता मंदिर.

हरिद्वारमध्ये गंगेच्या काठी असलेले हे मंदिर आठ मजली आहे. प्रत्येक मजल्यावर वेगवेगळे संत, महापुरुष आणि ऐतिहासिक व्यक्तींचे दर्शन घडवले जाते. या मंदिराचे उद्घाटन 1983 मध्ये इंदिरा गांधी यांनी केले.

देवगिरी किल्ला

छत्रपती संभाजीनगरजवळील देवगिरी किल्ल्यावर भारतमाता मंदिर उभारलेले आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला येथे विशेष कार्यक्रम होतात. किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच राष्ट्रभक्तीची जाणीव या मंदिरातून होते.

‘भारतमाता’ ही संकल्पना केवळ एका प्रतिमेपुरती मर्यादित नसून, ती भारतीय राष्ट्रवादाच्या वैचारिक आणि भावनिक प्रवासाचे एक महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. बंकिमचंद्रांच्या साहित्यिक रूपकातून सुरू झालेला हा प्रवास विवेकानंद आणि अरविंदांसारख्या विचारवंतांनी तिला आध्यात्मिक आणि तात्त्विक अधिष्ठान देऊन पुढे नेला. भगिनी निवेदितांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी तिला दृश्यात्मक रूप दिले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांनी तिला संस्थात्मक स्वरूप दिले.

ही संकल्पना आजही भारतीय राजकारण आणि सामाजिक जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. ती केवळ स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक नसून, राष्ट्रीय अस्मिता, शौर्य आणि एकतेचे एक चिरंतन प्रतीक म्हणून पाहिली जाते. तथापि, ही प्रतिमा एकाच वेळी राष्ट्रीय एकात्मतेचे आणि समर्पणाचे प्रतीक म्हणून प्रेरित करते.