मध्यपूर्वेतील नाजूक व अवघड शस्त्र संधी

मध्यपूर्वेतील नाजूक व अवघड शस्त्र संधी

   सूत्रांनुसार; ३५ दिवसांच्या युद्धानंतर,पाकची राजधानी इस्लामाबादमधे अमेरिका व इराणनी शस्त्रसंधी  लावण्यासाठी २१ तास चर्चा केली. अमेरिकेनुसार, इराणनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे आणि इराणनुसार, अमेरिकेच्या या अवास्तव मागण्यांमुळे, या चर्चेत शस्त्रसंधीवर कोणता ही तोडगा निघू शकला नाही. दोघांनी ही एकमेकांवर भरपूर दोषारोपण केल.मात्र; संरक्षणतज्ञांनुसार, युद्ध विरामानंतरच्या पहिल्याच बैठकीत कोणताही निर्णय/करार झाला नाही यात काहीच नवल नाही किंवा, आता ही प्रतिक्रिया थांबली आहे असही म्हणता येणार नाही. अनेक मतभेद असूनही, अमेरिकन उपराष्ट्रपती आणि इराणी संसद अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळांनी १९७८ नंतर पहिल्यांदाच एकमेकांशी थेट चर्चा केली हेच याच मोठ यश आहे.अमेरिका व इराणनुसार; इराणचा अण्वस्त्र प्रकल्प/ अणु कार्यक्रम, हार्मोझ सामुद्रधुनीवरील इराणी सार्वभौमत्व/ ताबा आणि लेबनानवर होत असलेले इस्रायली हल्ले या  तीन मुद्द्यांवर एकमत होऊ शकल नाही. संरक्षणतज्ञांनुसार या युद्धामुळे,अमेरिका इस्रायलला सामरिक धोरणात्मक धक्का (स्ट्रॅटेजिक शॉक) बसला असून त्यामुळे यात,कुठलीही सामरिक/ प्रशासकीय/ आर्थिक अट न घालता तोडगा निघण/काढण अपरिहार्य होत.

     युद्धविराम सुरू झाल्यानंतरच्या ४८ तासांत इस्रायलचे लेबनॉन आणि इराणवरील हल्ले आणि इराणचे आखाती अरब देशांवरील हल्ले सुरूच राहिले, आणि हा युद्धविराम मोडण्याची शक्यता तासा गणिक वाढत असल्याचे दिसत होते. चीनच्या सांगण्यावरून,पाकिस्ताननी एक महत्त्वपूर्ण मध्यस्थ म्हणून हस्तक्षेप केल्यानंतर, अमेरिका आणि इराण,पंधरा दिवसांचा युद्ध विराम करायला सहमत झाले.मात्र; युद्धविराम सुरू झाल्यानंतरच्या ४८ तासांत इस्रायलनी, लेबनॉन आणि इराणवर आणि इराणनी आखाती अरब देशांवर हल्ले करण सुरूच ठेवल्यामुळे हा युद्धविराम मोडण्याची शक्यता तासागणिक वृद्धिंगत होत होती.

      त्यानंतर, पाकिस्तानच्या माध्यमातून झालेल्या,अनेक संदेशांच्या देवाणघेवाणी नंतर इराण व अमेरिकेनी,राजधानी इस्लामाबादमधे येऊन, सौदी अरेबियाच्या उपस्थितीत, शस्त्रसंधीची चर्चा करण्यास संमती दिली.पण हा युद्ध विराम मुळातच डळमळीत (फ्रजाईल) होता.अमेरिका व इराण दोघांच्या युद्ध विरामसंबंधी आकलनात जमीन अस्मानाच अंतर आणि गंभीर मतभेद होते. इस्रायलनी या युद्ध विरामाच स्वागत केल पण,हा दोघांमधील करार असल्यामुळे यात,लेबनान इस्रायल सामील नाहीत आणि आमचे हिजबुलवरील हल्ले सुरूच राहतील हे देखील स्पष्ट केल. अमेरिकेनीही या इस्रायली दाव्याच समर्थन केल.हा इस्रायली दावा,मूळ   पाकिस्तानी मसुद्यात नव्हता. इस्रायलनी युद्ध विराम लागू झाल्याच्या काही तासांतच, लेबनानमधील शंभर प्लस ठिकाणांवरसर्वात भीषण हल्ला करून,२५० लोक अल्ला प्यारे आणि १२८० प्लस लोक जखमी केलेत. या मुळे, हा विषय खूपच नाजूक व संवेदनशील बनला.युद्ध विरामाच स्वागत करणाऱ्या अनेक राष्ट्रांनी,लेबनान व इराणच समर्थन केल. युद्ध सुरू होण्या आधीपासून इस्रायल, लेबनानवर हल्ले करत होता हे लक्षात घेता,या युद्ध विराम करारात लेबनानचा समावेश आवश्यक आहे,किंबहुना झालाच पाहिजे अस या राष्ट्रांच मत होत. लेबनान मधील रुग्णालयांसह अन्य अनेक नागरी सुविधांवर झालेल्या या नवीनतम क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटना प्रतिनिधी आणि जगभरातील मानवाधिकार संघटनांनी यावर व्यापक संताप व्यक्त करून,सूड बुद्धीनी करण्यात आलेल्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. इस्रायलनुसार हा हल्ला, केवळ हिजबुल ठिकाणांवर करण्यात आला होता.

    अमेरिकेनुसार,इराणनी  युरेनियमच पुढील संवर्धन थांबवाव, आपला उच्च संवर्धित युरेनियमचा साठा अमेरिकेकडे सुपूर्द करावा, मध्य पूर्वेतील बिगरसरकारी सशस्त्र गटांना दिलेला पाठिंबा संपवावा आणि आपला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम स्थगित/मर्यादित करण अपेक्षित होत. दुसरीकडे, इराणची मागणी होती की, लेबनॉनसह मध्य पूर्वेतील संघर्षाचा सर्वसमावेशक शेवट व्हावा, युद्धादरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अमेरिका आणि इस्रायल पुन्हा हल्ला करणार नाहीत याची हमी मिळावी, युरेनियम संवर्धनाच्या अधिकाराला मान्यता मिळावी आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीवर इराणी नियंत्रण कायम राहावे.मात्र;अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पनुसार,जर इराणनी हार्मोझ सामुद्रधुनी जगासाठी खुली केली नाही तर,अमेरिका इराणवर जबरदस्त हल्ला करून त्याची पुरातन संस्कृती सर्वात:नष्ट करेल. इराणनुसार, अमेरिकेनी असा हल्ला केल्यास अशी कारवाई केल्या जाईल की अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांना पुढील कित्येक वर्षे तेल आणि वायू मिळणार नाही. २८ फेब्रुवारी, २६ला सांप्रत युद्ध सुरू होण्याच्या कितीतरी आधीपासून,इस्रायलनी गाझा पट्टी,वेस्ट बँक आणि लेबनानवर तुफान हवाई व क्षेपणास्त्र हल्ले करून हजारो अरबांना अल्ला प्यारे केल होत.सर्व मुस्लिम व अरब राष्ट्र,चीन, रशिया,उत्तर कोरिया आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधींनुसार हा, एक प्रकारचा वंश संहार आहे. अशा वेळी, डोनाल्ड ट्रम्पनी दिलेल्या या नरसंहारक धमकीकडे दुर्लक्ष करण अवघड असल्यामुळे,उर्वरित जगासाठी ही एक चिंताजनक बाब  आहे/होती.

   इस्लामाबादमधील इराण अमेरिका वाटाघाटी कुठलाही तोडगा न काढता संपन्न झाल्यानंतर ही कोंडी फोडण्यासाठी अमेरिका खालील  पर्यायांवर विचार करू लागली)करते आहे. एक) होर्मुझ सामुद्रधुनीची नौसेना नाकेबंदी कायम राखत,इराणच्या पाणी,क्षार विरहितीकरण प्रकल्प आणि वीज निर्मिती प्रकल्प या सारख्या पायाभूत सुविधांवर मर्यादित लष्करी हल्ले करण; दोन) या दरम्यान राजनैतिक तोडगा काढण्याचा मार्ग खुला ठेवण; तीन) प्रादेशिक अस्थिरतेचा धोका आणि तेथील दीर्घकालीन लष्करी संघर्षांमध्ये गुंतण्याच्या शक्यतेचा विचार करून वाटाघाटीं पूर्वी होत असलेल्या बॉम्ब हल्ला मोहिमेची पूर्ण क्षमतेनी पुनर्सुर्वात करण; चार) अल्प कालावधीसाठी नौसेना नाकेबंदी कायम राखत,नाटो आणि मित्र राष्ट्रांना सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग सुनिश्चित करण्याची जबाबदारी घेण्यासाठी भाग पाडण. संरक्षणतज्ञांनुसार;अमेरिकेसमोर हे पर्याय असले तरी इस्लामाबादमधील प्राथमिक चर्चेत,पुढील राजनैतिक प्रक्रियेचा पाया रोवल्या गेला असून, विश्वास आणि इच्छाशक्ती दृढ झाल्यास, सर्व पक्षांच्या हितासाठी एक सुरक्षित,शाश्वत चौकट तयार होऊ शकेल.

        ही चर्चा;अतिरेकीपणा, सतत बदलणारे निकष आणि “घ्या किंवा सोडून द्या” या अंतिम इशाऱ्याच्या भाराखाली कोसळलेल एक मोठे राजनैतिक नाट्य होत अस म्हटल्यास ते वावग होणार नाही. ४७ वर्षांनंतर अमेरिका आणि इराणमधे झालेल्या पहिल्या चर्चेत,चर्चा सुरू ठेवत पुढील तारीख निश्चित करण अपेक्षित होत. यामुळे,झालेल्या नाजूक शस्त्रसंधीला थोडा दिलासा मिळून,दोन्ही बाजूंना राजरोस रित्या पुढे जाण्याचा मार्गही मिळाला असता.चर्चेतील मुख्य घडामोडींमधे; अ) अमेरिकी शिष्टमंडळानी, इराणनी युरेनियम संवर्धन थांबवाव आणि होर्मुझ पुन्हा सुरू कराव अशा,वाटाघाटी न करता येणारा अल्टिमेटम दिला; ब) अणु/क्षेपणास्त्र संवर्धन हा आपला सार्वभौम अधिकार असल्याचा दावा करत इराणनी हा अल्टिमेटम फेटाळून लावत अमेरिकेवर अतिरेकी भूमिका घेण्याचा व सतत नियम बदलण्याचा आरोप केला; क) एकमत न झाल्यास,इराणच्या बंदरांवर नौसेनेची  नाकेबंदी करणार अस जाहीर केल्यामुळे तणाव वाढून,सामजिक दृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये संघर्षाचा धोका निर्माण झाला; ड) अमेरिकन स्टँडला चीन, तुर्की आणि इतरांनी विरोध केल्यामुळे जागतिक मतभेद आणि तेल ऊर्जेच्या किंमती वृद्धिंगत होऊन शेयर बाजार कोसळला.

      एकमेकां विरूद्धच्या कठोर अटी आणि अविश्वास यामुळे, पहिल चर्चा सत्र असफल झाल.अमेरिकेनुसार; इराणनी  पुढील किमान २० वर्षांसाठी युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवाव, आधीच्या बॉम्बस्फोटात नष्ट झालेली मुख्य अणुकेंद्रे पूर्णपणे नष्ट करावीत आणि इराणच्या ४०० किलोहून अधिक “हायली एनरिच्ड युरेनियम”चा हिशोब द्यावा हे आवश्यक मानल. उत्तरादाखल इराणनी, युरेनियम संवर्धन केवळ पाच वर्ष थांबवण्याच मान्य केल.मात्र; इराणनी; अमेरिकेनी इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध उठवावेत,यु्द्धाची नुकसान भरपाई द्यावी आणि चर्चा सुरू असतानाच केल्या गेलेली  होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी उठवावी या मागण्या केल्यात.आता याच मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी चर्चेच्या दुसऱ्या फेरीचे नियोजन केल जात आहे.

    इस्लामाबादमधील चर्चा फिसकटल्या नंतर हा लेख लिहेस्तोवर कोणत्याही उघड संघर्षाची नोंद झाली नसली तरी,दोन्ही बाजूंनी सुरू असलेली वक्तव्य अधिक तीव्र व धोकादायक आहेत/ होती.आगामी सात आठ  दिवसांत,चर्चेच अपयश वाटाघाटींतील डावपेचांमुळे झाल की एका योजनेंतर्गत हे स्पष्ट होईल.या अवघड, अडकलेल्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी दोघांकडे, स्पेशली अमेरिकेकडे, तीनच मार्ग उरले आहेत: एकतर माघार घेण, संघर्ष वाढवण, किंवा ही/अशी नवी परिस्थिती हळूहळू स्वीकारण.इस्लामाबादमधील चर्चेत; “होर्मुझ सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना निर्बंधमुक्त आणि विनाशुल्क मार्ग मिळावा ही अमेरिकन मागणी इराणनी फेटाळली.आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात  हा मुद्दा औपचारिकपणे पहिल्यांदाच मांडल्या गेला होता.युद्धोत्तर पुनर्बांधणी/ पुनर्रचनेसाठी आवश्यक निधी करता टोल आकारण्याचा इराणचा निर्णय अमेरिकेनी; सुएझ किंवा पनामा कालव्यांसारख्या कृत्रिम जलमार्गांवरच टोल आकारला जातो; मलाक्का, बोस्फोरस डार्डानेल्स, बाब अल मंदाब, बाल्टिक सामुद्रधुनी आणि जिब्राल्टर यांसारख्या नैसर्गिक सामुद्रधुनींमधून पारंपरिक रित्या मुक्त संचार असलेल्या नैसर्गिक सागरी अडथळ्यांच्या ठिकाणी तो आकारल्या जात नाही या कारणास्तव या मागण्या फेटाळण्यात.अमेरिकेनुसार ही जागतिक खंडणीची परिस्थिती असून,जो कोणी बेकायदेशीर टोल भरेल त्याला खुल्या समुद्रात सुरक्षित मार्ग मिळणार नाही. त्यासाठी; आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत इराणला खंडणी देणाऱ्या प्रत्येक जहाजाचा शोध घेऊन त्याला रोखण्याचे निर्देश अमेरिकन नौसेनेला देण्यात आलेत.

       अमेरिकन नौसेनेनी,होर्मुझ सामुद्रधुनीत  प्रवेश करण्याचा किंवा बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व जहाजांची तात्काळ नाकाबंदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ऊर्जा व्यापारातून मिळणारा इराणचा आर्थिक ओघ रोखून त्याच्यावर जास्तीत जास्त दबाव आणण, हा अमेरिकन नाकाबंदीचा उद्देश आहे.इराणवर लादलेल्या अमेरिकन नाकाबंदीमुळे इराणला दररोज अंदाजे सुमारे ४३५ दशलक्ष डॉलर्सच आर्थिक नुकसान सोसाव लागत आहे/ लागेल. नाकाबंदीमधे अमेरिकन नौसेना किती जहाज जप्त करेल आणि  नौसेनेच्या वेढ्यातून निसटण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांना ते पकडले जातील याची कशी व किती खात्री पटवून देऊ शकेल यावर सागरी नाकेबंदीच यश अवलंबून असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.अमेरिकेन नाकाबंदीसाठी त्यांची नौसेना ॲक्शन मोडमधे आली असून त्यासाठी विमानवाहू जहाजांसमेत,१५ युद्ध नौका तैनात होतील. इराणी तेल, पेट्रोकेमिकल्स, सिमेंट, स्टील आणि सुक्या मेव्याची समुद्रमार्गे होणारी निर्यात रोखण्यासाठी हा अंकुश लावल्या जाईल.

      इस्लामाबादमधील चर्चेची पहिली फेरी निष्फळ झाल्यानंतर पुढची फेरी, आंतर राष्ट्रीय शांतता चर्चा आणि वाटाघाटींसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वित्झर्लंड मधील जिनिव्हामधे,२२ एप्रिल२६च्या आधी, होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. जिनिव्हा,एक तटस्थ ठिकाण असून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षा व्यवस्था आणि राजनैतिक चर्चेसाठी आवश्यक असलेल्या गोपनीयता सोयी उपलब्ध आहेत. दुसऱ्या चर्चेतही पाकिस्तान, तुर्की, इजिप्त, ओमान आणि कतार  मध्यस्थी करतील कारण,या देशांना अमेरिका आणि इराणच्या मागण्या आणि त्यावरील आक्षेपांबद्दल सविस्तर माहिती असल्यामुळे चर्चा पुढे नेता येईल.दोघांपैकी कोणालाही जिनिव्हा मान्य नसल्यास चर्चा परत एकदा इस्लामाबादमधे होऊ शकते.   

        सूत्रांनुसार युद्धाच्या ३९ व्या दिवशी,१४ एप्रिल २६ला,फ्रान्स व ब्रिटनच्या दोन जहाजांनी इराणला प्रति जहाज दोन मिलियन डॉलर्सचा टोल दिला आहे. त्यामुळे, नजदीकी भविष्यात उर्वरित युरोपियन देश त्यांचा कित्ता गिरवू शकतात.दुसरीकडे; कुठल्याही अमेरिकन युद्ध नौकेनी हार्मोझची सामुद्रधुनी पार करण्याची कोशिश केली तर आधी त्यांना दोन वॉर्निंग्ज द्या आणि नंतर त्यांना उडवून लावा असा आदेश इराणच्या आयआरजीसी नौदलाला देण्यात आला  आहे. इराण किंवा ओमानच्या कुठल्याही बंदराला थोडा जरी धक्का बसला तर आखतातील सर्व बंदर नष्ट होतील असा कडक इशारा इराणनी दिला आहे.तिसरीकडे याच सूत्रांनुसार;१४ एप्रिल, २६लाच सकाळी चीनच्या तीन जहाजांपैकी एकानी,हार्मोझ सामुद्रधुनी ओलांडून इराणकडे कूच केल पण अमेरिकेनी त्याला अडवल नाही.खर तर, तेल नेण्यासाठी जातांना/घेऊन परततांना अमेरिकन नौसेनेची नाकाबंदी त्या चीनी जहाजांना अडवू शकेल का व अस झाल्यास त्याचे परिणाम काय होतील याकडे सर्वांचच लक्ष लागल आहे.चीनच्या तीन आण्विक पाणबुड्या आणि सहा लढाऊ जहाज पाकिस्तानमधील ग्वादार बंदरात असून, अमेरिकन नौसेनेच “व्हॅलनरेबल रिअर” त्यांच्यासाठी खुल, सॉफ्ट टार्गेट असेल. अमेरिकेला याची कल्पना होती/ असेलच कारण,चीन व इराणच्या क्षेपणास्त्र माऱ्यासमोर अमेरिकन नौसेना किती काळ तग धरू शकेल हा विवादास्पद मुद्दा आहे. मात्र अस झाल्यास, आण्विक अस्त्र वापरण्या खेरीज अमेरिकेकडे दुसरा पर्यायच नसेल. इराण किंवा चीन,जर अमेरिकन आण्विक अस्त्रांचा माऱ्यात आलेत तर,उत्तर कोरिया,चीन व रशिया हे अण्वस्त्रधारी देश या युद्धात उतरतील आणि तस झाल्यास त्याचे किती भीषण परिणाम होतील याची कल्पना सुद्धा करवत नाही.हे झाल असतच/होईलच अस खात्रीनी म्हणता येणार नाही पण होणारच/होऊच शकणार नाही याचीही खात्री कोणी देऊ शकेल/देईल असही वाटत नाही.

     भारत सरकारनी या युद्धात तटस्थ भूमिका घेतली आहे. या निर्णयावर देशांतर्गत अश्लाघ्य टीका करण्यात आली होती.पण;हिंद महासागरातील युद्ध पोतावर झालेला जीवघेणा हल्ला,मध्य पूर्वेतील  युद्धात, नागरिक आणि पायाभूत सुविधांवर होणारे  हल्ले,सागरी वाहतुकीला होणारा व्यत्यय आणि लेबनान मधील जीव/संसाधन हानीचा भारत तीव्र निषेध/विरोध करतो अस,इराण किंवा इस्रायलच नावही न घेता भारतानी, १०-१२ एप्रिल,२६ दरम्यान मॉरिशसमधे झालेल्या ९व्या हिंद महासागर परिषदेत ठासून सांगितल.मुत्सद्दीगिरीची ही कसोटी सरकारनी यशस्वी रित्या पूर्ण केली अस म्हटल्यास ते चूक नसेल.जय हिंद !!

 

कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त) 

१५/४/२६ : १६, भगवाघर कॉलनी, धरमपेठ नागपूर,१० : ९४२२१४९८७६/ abmup54 @gmail.com

दार उघड बये दार उघड …!

दार उघड बये दार उघड …!

लँड जि!हाद, लव जि!हाद, जिम जि!हाद,कॉर्पोरेट जि!हाद…ही यादी वाढतच आहे. या घटना आणि त्यांचे परिणाम,तरुणींचं शोषण सातत्याने समोर येत आहे. समाज माध्यमांवरचे videos,बातम्या, सखोल लेखन, चित्रपट, विविध सामाजिक संस्थांद्वारे जनजागृती…एवढंच काय पण पोलिसांकडून मिळणारी माहिती आणि सतर्कतेचा इशारा….चोहीकडून या विषयावर लख्ख प्रकाश टाकला जात आहे. एकूणच त्यांची सतत बदलणारी modus operandi (कामाची पद्धत) आपल्याला वारंवार सावध करत आहे. पण तरीही समाजातल्या तरुणी मनाची कवाडं का बंद करून बसल्या आहेत? ज्या निरपराध आहेत, त्यांचा इथे विषय नाही. परंतु ज्या हे सारं टाळू शकतात त्यांना मात्र परखड प्रश्न विचारणं तितकंच महत्त्वाचं आहे.

औद्योगिक संस्था, दुष्कृत्य करण्यासाठी रूम पुरवणारी हॉटेल्स…अशा सगळ्यांना तेवढंच जवाबदार (accountable) ठरवणं, धर्मांतरविरोधी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी, जनजागृती,पोलीस कारवाई याद्वारे उपाय सुरू आहेतच. पण – माझा सवाल आहे तो स्वतः victim mode मध्ये वावरणाऱ्या तरुणी आणि स्त्रियांबद्दल.

….कशासाठी?

बाई गं, अशी कोणती अगतिकता आहे की जी बुद्धीला झापडं लाऊन चुकीच्या माणसांवर अंधविश्वास ठेवायला भाग पाडत आहे? वैयक्तिक आयुष्यात अशी कोणती जगावेगळी दु:खं आहेत ज्यामुळे सतत तुम्ही victim होऊन आधारासाठी खांदा शोधत आहात? अशी कोणती हतबलता आहे की ज्यामुळे आत्मसन्मान विकून तुम्हाला नोकरी आणि प्रमोशन हवं आहे? कुटुंबव्यवस्था,संस्कार,चांगली संगत हे सारं क्षणांत डावलून ‘मुक्त’ होण्यामध्ये तरुणींना कसली धन्यता वाटत आहे? रोज नवनवीन डावपेचांना, निरनिराळ्या पद्धतीने केलेल्या बुद्धीभेदांना बळी पडतांना तुमचं शिक्षण, तुमचा विवेक, स्वाभिमान कुठे गहाण ठेवताय? पदोपदी लावलेले सापळे आपण ओळखायला पाहिजेत,त्यापासून चातुर्याने दूर रहायला पाहिजे असं अजूनही वाटत नाही का? हे परखड प्रश्न सर्वांना लवकरात लवकर जागं करोत.

ज्याप्रमाणे ‘गरीब परिस्थिती, शिक्षणाचा अभाव वगैरे गोष्टी समाजात दहशतवादी तयार करतात,मुळात ती निरागस माणसंच असतात’ हा मूर्ख समज आता दूर झालाय आणि त्याच्या मुळाशी असणारी टोकाची धर्मांध वृत्ती कुणीही नाकारू शकत नाही, त्याचप्रमाणे ओळख लपवून करण्यात येणारी कारस्थानं,मुलींचं शोषण,धर्मांतर,पाठोपाठ क्रूर हिंसा असा घटनाक्रम लवजि!हादचा हेतू स्पष्ट करतो आणि या घटनांना व्यक्तीस्वातंत्र्य किंवा आंतरधर्मीय विवाह इ. कायदेशीर गोष्टींपासून वेगळा करतो (अजूनही काही ढोंगी लोक या घटनांना सामान्य म्हणून गृहीत धरत आहेत ही गोष्ट वेगळी). कोणते मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत?

सशक्त प्रतिमा

काही ना काही वैयक्तिक अडचणींमध्ये ग्रासलेल्या तरुणी शोषणाला लवकर बळी पडत आहेत. असं का? संस्कृतात एक सुंदर सुभाषित आहे. ज्या लाकडामध्ये आग/ ठिणग्या स्पष्ट दिसतात ते ओलांडण्यासाठी सहसा कुणी धजावत नाही, पण जिथे ती प्रकर्षाने दिसत नाही, आतल्या भागात असते, ते लाकूड कुणीही सहज ओलांडण्याचं धाडस दाखवतं. तशीच व्यक्तीची प्रतिमा(image) आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक मुलीची प्रतिमा करारी का असू नये? प्रयत्नपूर्वक तिने ती तशी घडवावी. स्वतःचं आत्मबळ वाढवावं. महाविद्यालय असो, ऑफिस असो,व्यवसाय असो – समर्थ,सशक्त व्यक्तिमत्त्व आपोआपच संकटांना दूर ठेवतं. याउलट स्वतःच्या अपयशासाठी कायम परिस्थितीला दोष देणं, कुटुंबातले वाद बाहेर सांगणं, स्वतःला दुर्बल, हतबल समजून प्रत्येक वळणावर परिस्थितीचं उदात्तीकरण करणं थांबवायला हवं.त्यातूनच शोषणासाठी मुली हेरल्या जातात. समोरचा तुमच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन स्वतःचा खांदा पुढे करतो. तुम्ही त्याचं स्वागतच करता!

माझी सुरक्षा – माझी जवाबदारी

‘my life – my space’ म्हणता तसंच स्वत:च्या सुरक्षेची किती जवाबदारी घेता? सामाजिक स्तरावर हा विषय महत्त्वाचा आहेच परंतु एकूणच स्वतःच्या सुरक्षेसाठी जाणतेपणाने आम्ही काय काय करतो? किती सतर्क आहोत? खूप उदाहरणं आहेत. तपासून बघा – पालक म्हणून शाळा, ट्यूशन किंवा इतर आवश्यक whats app groups व्यतिरिक्त आपण किती whats app groups चा भाग आहोत? ब्युटिपार्लर, रेसिपीज, साड्या आणि दागिने खरेदी, गृह सजावट, tattoos, छंद,सौंदर्य प्रसाधनं, इतर business groups,प्रॉपर्टी खरेदी विक्री,ट्रेडिंग अशा वेगवेगळ्या कारणांमुळे एकेक स्त्री कित्तीतरी whats groups मध्ये सध्या सहज active असते ही वस्तुस्थिती आहे! त्या ग्रुपमधल्या बाकी सदस्यांना तुम्ही ओळखता का? त्यातून तुमच्याविषयी महत्त्वाची माहिती, तुमच्या नकळत किती लोकांपर्यंत सहज पोहोचते याची कल्पना तुम्हाला आहे का?

कुणाकडून काही प्रॉडक्ट/सेवा घेतली की तो म्हणतो मी तुम्हाला whats app ग्रुप मध्ये अॅड करतो म्हणजे पुढचे प्रोडक्टस आले की तुम्हाला ग्रुपवर दिसतील…कशासाठी? notifications साठी सुद्धा number देऊ नका. काम झालं की तो नंबर आपण कितीदा ब्लॉक करतो?

आवश्यक तेवढंच बोला

परवा एका किराणा दुकानात home delivery साठी दुकानदाराला आलेला फोन स्पीकरवर टाकून तो विचारतो, “दाल २ किलो कर दू? त्यावर बाई म्हणतात, “नही, इतने बडे घर में हम दोनो ही रहते है…उसमें भी हसबंड ज्यादातर बाहरगाव जाते है..ज्यादा समान का क्या करू? आप एक किलो लिखिए|” मी समोरच होते. एक किलो की दोन एवढंच बोला. इतर भाषण कशाला करता! Home deliveries मुळे सुलभता वाटते, पण धोकाही तेवढाच वाढत आहे, लक्षात घ्या.

रक्षक की भक्षक? कसं ओळखायचं?

Delivery boys व्यवस्थित entry करून येत आहेत का? येणारे नक्की त्याच फ्लॅटच्या पत्त्यावर जात आहेत का? काम झालं की लगेच बाहेर पडत आहेत की तिथेच घुटमळत इतर माहिती काढत आहेत? ज्या security एजन्सीकडे सोसायटीच्या सुरक्षेची जवाबदारी/कॉंट्रॅक्ट आहे…ती एजन्सी सहसा कसे गार्ड्स पुरवत आहे? हेही बघायला हवं. काहीही संशयास्पद आढळल्यास त्यांच्याकडून तत्काळ काम काढून घ्यावं. दुरुस्तीसाठी सुतार,प्लंबर,इलेक्ट्रिशियन,गाडीसाठी ड्रायवर इत्यादि पुरवणाऱ्या एजन्सीने कोणाला पाठवलं आहे? संशयास्पद आढळल्यास घरात घेऊ नये/त्याच्या गाडीत जाऊ नये. काम करतांना अरेरावी केली तर रिमार्क नोंदवण्यासाठी विसरू नये.

कम्फर्ट झोन

मी सॉफ्टवेअर इंजीनियर आहे, मी मॅनेजमेंट क्षेत्रात काम करते… माझा इतर सामाजिक समस्यांशी काय संबंध?everything is politics yaar…मला दूर रहायचं आहे.. असं म्हणत अनेक सुशिक्षित स्त्रिया मतदानही करण्याची तसदी घेत नाहीत. अशा भिंती घालून घेणाऱ्या स्त्रिया सर्रास आढळतात भोवती. नोकरी,weekend life, शॉपिंग इ. चकोरीचा कम्फर्ट झोन कधी होतो त्यांचं त्यांनाही कळत नाही! ज्या राष्ट्राचे तुम्ही नागरिक आहात, ज्या समाजात तुम्ही रहाता, त्याविषयी एवढी उदासीनता कशासाठी? ‘work-life balance’ वर सातत्याने चर्चा होताना दिसते, पण त्यातल्या ‘life’ चा परीघ किती मोठा आहे, ते नको समजून घ्यायला? समाजकारण, धर्मकारण,अर्थकारण,राजकारण सगळं मला कळणं अतिशय गरजेचं आहे, ही जाणीव केव्हा होणार? त्यासाठी मनाची कवाडं कधी उघडणार बये!

विघटन की संघटन

मागच्या महिन्यात बीडमध्ये भयंकर घटना घडली. चुकून गाडीचा जरासा धक्का लागला म्हणून एका निवृत्त सैनिकावर जीवघेणा हल्ला झाला. काही मिनिटांत रही!म शे!ख नावाच्या गुंडाने मोठी गँग जमा करून त्या सैनिकाला बेदम मारहाण केलीच वर त्याच्या संपूर्ण अंगावर उकळता चहा टाकला. अजूनही वेदनांनी ओरडणारा त्यांचा आवाज ऐकवत नाही. ज्या सैनिकाच्या जिवावर इथे सुरक्षित राहून ऐशोआरामात जगताय त्याच्याच जिवावार उठताय? असा कोणताही जमाव धाऊन आला तर विघटनवाद पसरवणाऱ्या जातीजातींच्या झुंडी वाचवणार आहेत का? की संपूर्ण समाज एकत्र येऊन या आक्रमणाला थोपवणार आहोत हा विचार गांभीर्याने करावा.

सुसंवादाचा पूल

पालक -पाल्य हा संवाद उत्तम हवाच. त्यातही आईची भूमिका महत्त्वाची आहे. एक गोष्ट पालकांशी बोलतांना जाणवते – ‘धर्म, धर्माधर्मांतले वाद, हे सगळं कशाला सांगायचं ना मुलांना? आणखी लहान आहेत ते!पुढे तर भारतात रहातील की नाही हेही माहित नाही!’ लहान मुला मुलींबरोबर घडणारे इतके भयंकर गुन्हे,त्यांचं शोषण होत असूनही आपण आपल्या मुलांना मात्र गुलाबी फुग्यात वाढवणं ही केवढी मोठी चूक आहे! आणि या साऱ्या भोवती घडणाऱ्या गोष्टी भारतापुरत्याच मर्यादित आहेत का?

इथे असणाऱ्या धर्मांची मुख्य शिकवण, त्यांचा उगाम, आत्तापर्यंतचा इतिहास, त्या धर्माची मूल्यं, तुलनात्मक गोष्टी,आताची आव्हानं.. हे सारं मोकळेपणाने मुलांना शिकवायला नको? एखादी गोष्ट ही वरवर वाटणारा गुन्हा आहे की एखाद्या धर्माची मूळ शिकवण आणि त्याचा अविभाज्य भाग – हे स्पष्टपणे त्यांना कळायला नको? की दहशतवाद्यांशी लढण्यासाठी सैनिकांनीच मरण झेलायचं? नक्षलवाद मोडून काढताना पोलिसांनीच जीव धोक्यात घालायचा? नागरिक,पालक म्हणून माझी जवाबदारी काय? विचार करा. घराबाहेर पडल्यावर मुलं कुठल्याही प्रकारच्या बुद्धिभेदाला बळी पडणार नाहीत एवढा आपल्या संवादाचा पूल पक्का आहे का? स्वतःला विचारा.

लढाई टाळणं हाच ती जिंकण्याचा सर्वोत्तम उपाय

दुर्बलता झटकून द्यावी. आत्मविश्वास, धाडस, चातुर्य, मुख्य म्हणजे निर्णयक्षमता इ. कितीतरी नेतृत्त्वगुण मला वाढवले पाहिजेत असा निश्चय करूया. शारीरिक, मानसिक, भावनिक,बौद्धिक, आध्यात्मिक – जगण्याच्या या सगळ्या पातळ्यांवर मी सशक्त झालंच पाहिजे. समर्थ,विवेकी स्त्री ही काळाची गरज आहे.

“पितापुत्रभ्रातृंश्च भर्तारमेवं
सुमार्गं प्रति प्रेरयन्तीमिह”

अर्थात् वेळ आल्यावर स्वत:चा पिता, पुत्र,भाऊ,पती या सर्वांना देखील सन्मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करणारी अशी भारतीय स्त्री आहे! ती स्वतःच दिशाहीन होऊन कसं चालेल?

साहसी खेळ असो वा तंत्रज्ञान..भारतीय मुली आज प्रत्येक क्षेत्रात एकेक शिखर काबीज करत आहेत. तरुणींनो, शिक्षण घ्या, स्वप्नं बघा, आतोनात मेहनत घेऊन तुमचं ध्येय साध्य करा पण वैयक्तिक आयुष्यातही योग्य निर्णय घ्या. मोहांना बळी पडू नका. नाही तर मिळवलेलं यश, जिवाला जीव देणारं कुटुंब, स्वातंत्र्य.. सारं गमावून बसाल. त्यासाठी अविवेकाची झापडं उघडून डोक्यात विवेकाचा प्रकाश पडू द्या! आत्मभान जागं करा. या क्रूर रक्तबीज रक्षासाला संपवण्यासाठी आपल्याला समर्थ व्हायलाच हवं!

– मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)

स्वराज्य सेवा प्रतिष्ठान चा उपक्रम.

दिनांक 12 एप्रिल 2026 ठरल्याप्रमाणे स्वराज्य सेवा प्रतिष्ठान चे मावळे बैतूल च्या दिशेने निघाले. पण बैतूल का? तिथे अस काय की एवढ्या भर उन्हात बाईक घेऊन 350 किलोमीटर चा सपाटा आम्हाला मारायचं धाडस झालं? त्याच कारण एक नाव. ते नाव म्हणजे नरसिंहदेव यादव

कोण हे नरसिंह देव यादव? हे सर्व प्रश्न मनात होते. म्हणून आम्ही रविवारी सकाळी निघालो शिवा दादा, प्रतीक पाथरे, प्रथमेश बाहेकर, राहुल भलावी, कृष्णा धांडे, श्रवण लांबट असे आम्ही सहा मावळे आपापल्या बाईक घेऊन बैतूल मार्गाने निघालो, आधी चांदूर बाजार वरून घाटलाडकी मार्गे आठनेर ला पोहोचलो आठनेर वरून पुढे पारसडोह येथे पोहोचलो. येथे दादाजी धुणीवाले यांचे भव्य मंदिर आहे. सोबत तापीचा फार मोठा व्याप असलेले विशाल पात्र आणि पाण्याच्या प्रवाहाने त्यात तयार झालेले विवर नजर रोखून ठेवते, काळया पोषणाला पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेले हे विवर इतके सुंदर की पाहताक्षणी नजर त्यावर रोखली जाते. हा निसर्गाचा एक अपूर्व चमत्कारच म्हणावा, त्या उन्हाच्या रखरखत्या लाटेत आमचा प्रवास बैतूल च्या वाटेने सुरू झाला आता लवकर आपल्याला खेरला (खेडला) किल्ला गाठायचा इच्छा होती. आणि दुपारी 2 वाजता कडक उन्हात आम्ही किल्ल्याच्या जवळ पोहोचलो 5 तासाची आमची मेहनत फळाला आली होती पुढच्या डोंगरावर असलेला खेडला आम्हाला खुणावत होता, किल्ल्याच्या आत जायला, हा किल्ला मिस्त्रदुर्ग पद्धतीचा आहे, भुईकोट अजूनही शाबूत अवस्थित आहे त्याला बाहेर खंदक पहायला मिळतात, गोमुखी पद्धतीने किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेले असता प्राचीन मंदिराचे अवशेष पहायला मिळतात, त्यात सुबक नक्षी असलेले अस्ताव्यस्त पडलेल खांब, गणेशपट्टी असे सर्व.
थोड पुढे गेल्यास शिवाचे पुरातन मंदिर आहे, त्याला नवीन करण्यात आले पण मंदिराच्या बाहेर म्हैशासुर मर्दिनीच्या पुरातन मूर्ती, गणेश मूर्ती, जैन मूर्ती अशा खूप भग्न मूर्ती मंदिर परिसरात पहायला मिळतात, तेथून वर 600 ते 700 मीटर डोंगरी पायरी मार्गाने मुख्य बालेकिल्ल्यात प्रवेश करावा लागतो, पायरिमार्ग अजूनही बराचसा शाबूत आहे, किल्ल्याचे भव्य पराकोट आणि वरून दिसणारा नयनरम्य परिसर मन वेधून घेतो, वर किल्ल्यावर आदिवासी समाजाचे देवीचे मंदिर आहे, बालेकिल्ला सुंदर असून आता फक्त पराकोट शिल्लक राहिले आहे.सध्याच्या मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील खेरला या किल्ल्यातून नरसिंहदेवराय यादव हा गुणी राजा कारभार पाहत होता. इसवी सन १३९७ यावर्षी दिल्लीवर तैमूरलंग ने हल्ला केला व दिल्लीतील जनतेची कत्तल करून तैमूरने मोठी लूट आपल्या बरोबर नेली. यावेळी तैमुरलंग हा सुन्नी पंथाचा आहे तर बहामनी शिया पंथीय म्हणून बहामनी सुलतान फिरोजशहा बहमनीने तैमुरच्या भीतीने आपल्या सर्व सुभेदारांसहित सैनिकांनाही गुलबर्गा येथे बोलावविले. याचा फायदा घेऊन नरसिंहदेव याने संपूर्ण वऱ्हाड मुसलमानांपासून मुक्त केले. त्याच्या दुर्दैवाने नियोजन आणि प्रशासन व्यवस्थेचा अभाव यामुळे लवकरच त्याला वऱ्हाड सोडून द्यावा लागला. याच काळात बहामनीचे सूत्रे अहमदशहा बहामनी या सुलताना कडे गेली व त्यानेच बहामनी ची राजधानी गुलबर्गा येथून बिदर येथे इसवी सन १४२५ या वर्षी आणली. याच वर्षीपासून नरसिंहदेव यादवाच्या भीतीने वऱ्हाडातील अनेक किल्ल्यांची डागडूजी करण्यात आली. गाविलगड किल्ल्यांवर तर या घटनेची शिलालेखात नोंद आहे. बहामनी सत्ताधीश व नरसिंग देवराय यादव यांच्यातील संघर्ष तब्बल 35 वर्षे चालले. शेवटी खेरला येथे नरसिंग देवाचा पराभव झाल्यानंतर बहामनी सुलतानाने त्याला ठार मारले तब्बल 35 वर्ष बहामनींशी संघर्ष करणारा नरसिंहदेवराय यादवाचा इतिहास आजही उपेक्षित आहे हे त्याचे आणि इतिहासाचे दुर्दैवच म्हणावे लागेल
त्या नरसिंह देव यादवांच्या पराक्रमाला, शौर्याला नमन करायला आणि त्यांच्या शौर्याला उजळा देण्याकरिता स्वराज्य सेवा प्रतिष्ठान चा हा छोटा सा प्रयत्न.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : राष्ट्रनिष्ठेचा प्रखर आवाज.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : राष्ट्रनिष्ठेचा प्रखर आवाज.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : राष्ट्रनिष्ठेचा प्रखर आवाज ही केवळ एक गौरवपूर्ण ओळ नाही, तर त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा सार आहे. १४ एप्रिल हा दिवस त्यांच्या जन्माचा असला, तरी तो भारताच्या सामाजिक जागृतीचा, बौद्धिक प्रामाणिकतेचा आणि राष्ट्रनिष्ठ विचारांचा दीपस्तंभ आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर अन्याय, विषमता आणि ढोंगीपणाविरुद्ध संघर्ष केला, पण त्यांचा दृष्टिकोन नेहमीच व्यापक, तर्काधिष्ठित आणि राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवणारा होता.

बाबासाहेब हे प्रखर राष्ट्रभक्त होते. हे त्यांच्या जीवनातील अनेक कृत्यांवरून अनेक प्रसंगावरून आपल्याला दिसून येते. राष्ट्र हे प्रथम येते आणि नंतर सर्व गोष्टी येतात असा संदेश त्यांनी अनेक उदाहरणातून आपल्या समोर ठेवला. राष्ट्र हे छोट्या छोट्या कृतीतून सुद्धा महान होऊ शकते असे त्यांचे मत होते. बाबासाहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कोणत्याही एका विचारसरणीला अंतिम सत्य मानले नाही. समाजातील जातिव्यवस्थेवर त्यांनी कठोर प्रहार केला, परंतु त्याच वेळी त्यांनी इस्लाम, कम्युनिझम आणि इतर विचारप्रवाहांचेही सखोल आणि निर्भीड विश्लेषण केले. आणि याच गोष्टी त्यांना प्रखर राष्टभक्त बनवतात. “Pakistan or Partition of India” या ग्रंथात त्यांनी इस्लामचा अभ्यास करताना स्पष्ट केले की इस्लाम हा केवळ वैयक्तिक धर्म नसून एक सर्वसमावेशक सामाजिक-राजकीय व्यवस्था आहे. त्यांच्या शब्दांत, इस्लामची बंधुता ही ‘उम्मा’वर आधारित असून ती राष्ट्रनिष्ठेपेक्षा वेगळी ओळख निर्माण करते. त्यांनी असेही नमूद केले की “इस्लाम एक बंद निगम आहे आणि जो मुसलमान नाही तो बाहेरचा आहे,” आणि ही विचारसरणी राष्ट्रीय एकात्मतेसमोर अडथळा ठरू शकते.

याच संदर्भात त्यांनी ‘दार-उल-इस्लाम’ आणि ‘दार-उल-हर्ब’ या संकल्पनांचे विश्लेषण करत सांगितले की ज्या ठिकाणी इस्लामी सत्ता नाही ती भूमी ‘दार-उल-हर्ब’ मानली जाते, आणि अशा विचारसरणीमुळे राष्ट्रनिष्ठा गुंतागुंतीची बनते. बाबासाहेबांनी हा मुद्दा केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक आणि राजकीय परिणामांच्या दृष्टीने मांडला. अनेक इतिहास तज्ञांचे विश्लेषण आहे की बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताच्या फाळणीला आणि पाकिस्तानच्या निर्मितेला शेवट पर्यंत विरोध राहिलेला आहे. एक प्रकार राष्ट्रभक्त कधीच देशाचे दोन तुकडे होताना बघू शकणार नाही.भारतातील धर्मांतराच्या प्रक्रियेवर भाष्य करताना त्यांनी एक अत्यंत संवेदनशील निरीक्षण नोंदवले धर्मांतर हे अनेक वेळा केवळ श्रद्धेचे परिवर्तन राहत नाही, तर ते सांस्कृतिक तुटणाही निर्माण करते. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की भारतातील काही मुसलमान स्वतःला अरब, इराणी किंवा मध्य आशियाई वंशाशी जोडण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या भारतीय पूर्वजांपासून दुरावतात. यामुळे त्यांच्या भारताशी असलेल्या सांस्कृतिक आणि भावनिक नात्यात अंतर निर्माण होते. त्यांनी विचारलेला प्रश्न आजही तितकाच लागू होतो धर्म बदलता येतो, पण जन्मभूमी, भाषा , संस्कृती आणि इतिहास कसे बदलता येतील?

बाबासाहेबांनी काही धार्मिक स्थळांमधून दिल्या जाणाऱ्या प्रवचनांवरही गंभीर निरीक्षण नोंदवले. त्यांनी नमूद केले की काही ठिकाणी खुतब्यांमधून शासनाविरोधात लढण्याचे आवाहन केले जाते, जे धर्माच्या नावाखाली राष्ट्रविरोधी प्रवृत्तीला प्रोत्साहन देऊ शकते. त्यांनी हा मुद्दा मांडताना कोणत्याही व्यक्तीला दोष देण्याचा हेतू ठेवला नव्हता, तर धर्म आणि राजकारण यांचे धोकादायक मिश्रण दाखवण्याचा होता. धर्माची जोड घेऊन राजकारणात आलेली मुस्लिम लीग शेवटी पाकिस्तान तयारच करणार, म्हणून बाबासाहेब धर्म आणि राजकारणाच्या मिश्रणाला विरोध करीत राहिले.खिलाफत चळवळीच्या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ही चळवळ भारताच्या स्वातंत्र्यासाठी नव्हती, तर तुर्कीतील खलिफाच्या सत्तेसाठी होती. त्यांनी नमूद केले की भारतीय मुसलमानांनी भारताच्या राष्ट्रीय हितापेक्षा एका परदेशी सत्तेला अधिक महत्त्व दिले, आणि काही नेत्यांनी अफगाण अमीरला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रण देण्याची भूमिकाही घेतली. या घटनांनी त्यांना राष्ट्रनिष्ठेच्या प्रश्नावर सखोल विचार मांडण्यास प्रवृत्त केले. भारतीय मुस्लिम हे भारताचे पहिले आहेत आणि नंतर ते एका विशिष्ट धर्माचे आहेत, धर्म आणि देश निवडतांना देशच सुरवातीला समोर यायला हवा असे आवाहन सुद्धा त्यांनी अनेक आपल्या भाषणा मधे भारतीय मुस्लिमांना केले. आणि या प्रेरणेतून अनेक राष्ट्रीय विचारांचे मुस्लीम नेते सुद्धा तयार झाले.

आजच्या काळातही काही ठिकाणी परदेशातील मुस्लिम राष्ट्रांबाबत तीव्र भावनिक प्रतिक्रिया दिली जाते, तर भारतातील प्रश्नांबाबत तुलनेने कमी भूमिका घेतली जाते, अशी टीका केली जाते. या संदर्भात बाबासाहेबांचे विश्लेषण आठवते. मात्र, हेही तितकेच सत्य आहे की भारतातील मोठा मुस्लिम समाज संविधाननिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ आहे. त्यामुळे हा प्रश्न संपूर्ण समाजाचा नसून काही प्रवृत्तींचा आहे हे संतुलन राखणे आवश्यक आहे.कम्युनिझमविषयी बाबासाहेबांची भूमिका तितकीच स्पष्ट आणि ठाम होती. बाबासाहेब आणि कम्युनिस्ट यांचा संघर्ष हा केवळ वैचारिक नव्हता, तर तो ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचा होता. १९३७ साली त्यांनी स्थापन केलेल्या ‘Independent Labour Party’ ला कम्युनिस्टांनी विरोध केला, कारण त्यांच्या मते वर्गसंघर्ष हा जातिसंघर्षापेक्षा महत्त्वाचा होता. बाबासाहेबांनी हे ठामपणे नाकारले आणि सांगितले की भारतात जात ही वर्गापेक्षा अधिक मूलभूत समस्या आहे.

१९४६ च्या संविधान सभेच्या निवडणुकीतही कम्युनिस्टांनी त्यांच्या उमेदवारांविरोधात प्रचार केला. मुंबईतून त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न झाला, आणि ते बंगालमधून निवडून आले. ‘Annihilation of Caste’ या ग्रंथावरही कम्युनिस्टांनी टीका केली, कारण त्यांना वाटत होते की आर्थिक क्रांती ही अधिक महत्त्वाची आहे. बाबासाहेबांनी याला उत्तर देताना स्पष्ट केले की भारतात जात आणि वर्ग वेगळे करता येत नाहीत जात ही आर्थिक विषमतेचे मूळ कारण आहे. कम्युनिस्ट विचारधारेच्या लोकांना ही कल्पना आधीच होती की बाबासाहेब आंबेडकर हे देशविरोधी शक्तींना विरोध करणारे आहेत. त्यामुळे त्यांचा संघर्ष हा कायम शेवट पर्यंत राहिला.कम्युनिस्ट पक्षाने भारतीय संविधानालाही ‘बुर्जुआ दस्तावेज’ म्हणून हिणवले, जे भारताचा आणि येथील लोकशाहीचा थेट अवमान होता. तसेच एक राष्ट्रभक्त विचारधारेला वंचितांपर्यंत घेऊन जाणाऱ्या कायदेपंडिताचा सुद्धा अपमानच होता. बाबासाहेबांनी कम्युनिझमला नाकारताना स्पष्ट केले की तो भारतातील जातिव्यवस्था नष्ट करू शकत नाही, कारण जात ही केवळ आर्थिक नव्हे, तर धार्मिक आणि सामाजिक रचना आहे. त्यांनी कम्युनिझममधील हिंसात्मक प्रवृत्तीवरही टीका केली आणि सांगितले की रशियन क्रांतीसारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी जीवितहानी झाली.

त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की “आर्थिक समानता आली तरी सामाजिक समानता आपोआप येत नाही,” कारण भारतातील भेद हे आर्थिक नसून सामाजिक आणि धार्मिक स्वरूपाचे आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दलित प्रश्नाकडे अनेकदा दुय्यम दृष्टीने पाहिले, आणि वर्गसंघर्षाच्या नावाखाली जातिसंघर्ष दुर्लक्षित केला. केरळ आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये दीर्घकाळ सत्ता असूनही दलित आणि आदिवासींच्या स्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नाही, हा मुद्दाही अनेकदा मांडला जातो.कम्युनिस्टांनी ‘दलित आणि मुसलमान’ एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, परंतु बाबासाहेबांनी स्पष्ट केले की कोणतीही एकता ही केवळ राजकीय समीकरणांवर नव्हे, तर सामाजिक सुधारणा आणि समानतेच्या आधारावर असावी. त्यांनी मुस्लिम समाजातील अशरफ-अजलाफ भेद संपवण्याची गरजही अधोरेखित केली. बाबासाहेबांनी कम्युनिस्ट विचारधारेची नस ओळखलेली होती. प्रत्येक वेगवेगळ्या देशात कम्युनिस्ट आपली एक वेगळी राजनीती वापरत होते. त्यात भारतात कम्युनिस्ट हे उच नीच आणि दलित मुस्लिम ऐक्याची आभासी राजनीती करीत होते.

या सर्व विचारांमधून एक गोष्ट स्पष्ट होते बाबासाहेब हे कोणत्याही एका विचारसरणीचे नव्हते; ते समता, न्याय, तर्क आणि राष्ट्रहिताचे होते. त्यांनी प्रत्येक समाजाला आरसा दाखवला आणि सांगितले की भारताची एकता टिकवायची असेल, तर प्रत्येकाने स्वतःतील दोषांवर मात केली पाहिजे. त्यांनी नेहमीच राष्ट्रविरोधी शक्तींना तीव्र विरोध केला मग ते लाल सलाम करणारे कम्युनिस्ट असो की धर्माची राजनीती करणारे जिहादी मुस्लिम.. त्यांचा विरोध कायम होता. आज एक खरं बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणाऱ्या राष्ट्रप्रेमी भारतीयांना आश्चर्य वाटत असेल जेव्हा जय भीम सारखा पवित्र नारा हा लाल सलाम आणि जय मिम सारख्या विरोधाभास आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांच्या तोंडून घेतो. खरच अश्या कम्युनिस्ट आणि जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी बाबासाहेबांचा इतिहास नीट वाचवा. ज्यांनी देशाचे संविधान नाकारले ज्यांनी बाबासाहेबांचे विचार नाकारले आज तेच लोक फक्त वोट बँक च्या राजकारणासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नाव चुकीच्या पद्धतीने वापरत आहे. बाबासाहेब हे संपूर्ण राष्ट्राचे आहेत. त्यांचे जीवन या राष्ट्राला समर्पित होते. महामानव हे कोणत्या एका जातीचे राहत नाहीत तर ते संपूर्ण सर्व समाजाचे होतात. परंतु असे महामानव त्यांचे कधीच नसतात जे अश्या थोर महामानवाच्या विचारांचे पाईक होऊ शकत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने भारतीय समरसतेचे सेतू आणि राष्ट्रनिष्ठेचा प्रखर आवाज होते. त्यांनी समाजाला केवळ विचार दिले नाहीत, तर दिशा दिली. त्यांचा वारसा जपायचा असेल, तर त्यांच्या विचारांचे संपूर्ण, प्रामाणिक आणि निर्भीड आकलन करणे आवश्यक आहे. अश्या थोर महामानवाला त्यांच्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन करतो.

जय भीम | जय भारत | जय संविधान

– ॲड संकेत राव

उत्तराखंडची चारधाम यात्रा – आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक महात्म्य.

उत्तराखंडची चारधाम यात्रा – आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक महात्म्य.

उत्तराखंडमधील ‘चारधाम’ यात्रा ही केवळ एका भौगोलिक प्रदेशातील प्रवास नसून ती भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि इतिहासाचा एक सखोल संगम आहे. ‘देवभूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भूमीचे वर्णन “पुण्यभूमी भारत, चैतन्य भूमी भारत” असे यथार्थपणे केले जाते. हिमालयाच्या उत्तुंग रांगांमध्ये वसलेली ही चार तीर्थक्षेत्रे—यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ—भारताचा आत्मा मानली जातात. निसर्गाच्या उदारहस्ते लाभलेल्या वरदानासह, येथील खडतर प्रवास, पौराणिक कथा आणि ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना आणि भाविकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.
चारधाम यात्रेची संकल्पना आणि त्याचे महत्त्व प्रस्थापित करण्यामागे आठव्या शतकातील महान तत्वज्ञ आणि धर्मगुरू आदि शंकराचार्य यांचा मोलाचा वाटा आहे. ज्या काळात बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसार वाढत होता, त्या काळात हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन आणि एकत्रीकरण करण्यासाठी त्यांनी भारताच्या चार दिशांना चार मुख्य धामे निश्चित केली. मूळ चार धाम संकल्पनेत बद्रीनाथ (उत्तर), द्वारका (पश्चिम), पुरी (पूर्व) आणि रामेश्वरम (दक्षिण) यांचा समावेश होतो. तथापि, उत्तराखंडमधील यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार क्षेत्रांना ‘छोटा चारधाम’ असे संबोधले जाते. हे सर्किट विशेषतः हिमालयातील आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. आदि शंकराचार्यांनी या स्थानांना हिंदू उपासनेची प्रमुख केंद्रे म्हणून ओळख दिली आणि विविध परंपरांमध्ये एकता निर्माण केली.प्रत्येक धाम एका विशिष्ट युगाचे प्रतिनिधित्व करते, जे खालील तक्त्यावरून स्पष्ट होते:उत्तराखंडातील बदीनाथधाम. सत्ययुगातील भगवान विष्णूंचे अधिष्ठान आहे. तमिलनाडुमधील रामेश्वरम येथे त्रेतायुगातील भगवान शिवाचे अधिष्ठान आहे.गुजरातेतील द्वारका. याठिकाणी द्वापारयुगातील कृष्णाचे अधिष्ठान असलेले ठिकाण आणि ओडीसातील जगन्नाथपुरी म्हणजे कलीयुगातील भगवान जगन्नाथाचे अधिष्ठान असलेले स्थान आहे. ही धार्मिकक्षेत्रे कालचक्राच्या प्रवासाचे प्रतीक मानले जातात. या चार क्षेत्रांची यात्रा केल्याने व्यक्तीला जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी सनातन धर्मात मान्यता आहे. चारधाम यात्रेची पारंपरिक सुरुवात हरिद्वार किंवा ऋषिकेशपासून होते. हरिद्वार म्हणजे ‘हरिचे द्वार’ (विष्णूकडे जाण्याचा मार्ग). गंगेच्या काठावर वसलेले हे शहर भाविकांना यात्रेसाठी साकडे घालण्याचे मुख्य ठिकाण आहे. प्राचीन काळी येथील रस्ते कच्चे आणि दुर्गम असल्यामुळे यात्रेकरू परत येतीलच याची खात्री नसे, म्हणून ते विष्णूच्या दारी नतमस्तक होऊन यात्रेला सुरुवात करत असत. हरिद्वारमधील ‘हर की पौडी’ हा सर्वात पवित्र घाट मानला जातो. असे मानले जाते की भगवान विष्णूचे पाऊल येथे उमटले आहे. येथील ‘ब्रह्मकुंड’ परिसरात दररोज संध्याकाळी होणारी गंगा आरती हा एक विलोभनीय सोहळा असतो. १९१६ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी या परंपरेचे पुनरुज्जीवन केले होते. गंगेच्या पात्रात सोडलेले हजारो पणत्यांचे द्रोण आणि मंत्रोच्चाराने भारलेले वातावरण भाविकांच्या मनात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करते. ऐतिहासिकदृष्ट्या, पहिल्या शतकात राजा विक्रमादित्य याने आपला भाऊ भर्थरी याच्या स्मृतीप्रित्यर्थ या घाटाची बांधणी केली होती. आजही भाविक आपल्या आप्तांच्या आत्म्यास सद्गती लाभावी म्हणून गंगा मैयाला फुले आणि वात अर्पण करतात.

यमुनोत्री धाम: कठीण प्रवासाचा पहिला टप्पा – परंपरेनुसार, चारधाम यात्रा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच यमुनोत्रीपासून सुरू होऊन बद्रीनाथला संपते. यमुनोत्री हे यमुना नदीचे उगमस्थान असून ते समुद्रसपाटीपासून ३,२९३ मीटर उंचीवर आहे. यमुना ही सूर्यदेवाची कन्या आणि मृत्यूचा देव यमराज याची बहीण मानली जाते. अशी मान्यता आहे की, ज्याप्रमाणे सूर्य प्रखर असतो, त्याप्रमाणे यमुनेचे तेजही अधिक होते. यमराजाने यमुनेला वर दिला होता की, जो कोणी या नदीत स्नान करेल, त्याला यमलोकाची धास्ती राहणार नाही आणि तो मोक्षास पात्र ठरेल. जानकी चट्टी ते यमुनोत्री: खडतर प्रवास यमुनोत्रीला जाण्यासाठी जानकी चट्टी हे शेवटचे वाहनतळ आहे. येथून सुमारे ५ ते ६ किलोमीटरचा उभा चढाव पार करावा लागतो. हा प्रवास पायी, घोड्यावरून किंवा डोलीतून (पालखी) केला जातो. प्रवासात उंच पर्वत आणि खोल दरी यांचे दर्शन घडते, जे एका बाजूला निसर्गसौंदर्य तर दुसऱ्या बाजूला भीतीची जाणीव करून देते. यमुनोत्रीमधील मुख्य आकर्षणे आणि वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
येथील सुर्यकुंड हे नैसर्गिक उष्ण पाण्याचे कुंड प्रसिद्ध आहे. इथे प्रसाद म्हणून तांदूळ शिजवले जातात. त्याचा भात प्रसादाच्या स्वरुपात घरी नेला जातो. यमुनोत्री मंदिराबाहेर दिव्य शीला आहे. त्याचे पूजन केले जाते. या प्रवासात ऑक्सिजनची कमतरता आणि अचानक बदलणारे हवामान ही मोठी आव्हाने असतात. जानकी चट्टी येथील हॉटेल्सचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे मजले जमिनीच्या खाली बांधलेले असतात, जे पहाडी प्रदेशातील स्थापत्यशास्त्राचा एक नमुना आहे.
गंगोत्री धाम- स्वर्गीय गंगेचे पृथ्वीवरील अवतरण: यमुनोत्रीनंतर यात्रेचा पुढचा टप्पा म्हणजे गंगोत्री. १०,३०० फूट उंचीवर वसलेले हे धाम गंगेच्या उगमस्थानाचे प्रतीक आहे. प्रत्यक्षात गंगेचा उगम १८ किलोमीटर दूर ‘गोमुख’ येथे होतो, परंतु भाविकांसाठी गंगोत्री मंदिर हे मुख्य केंद्र आहे. पौराणिक कथेनुसार, सूर्यवंशातील राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्ती देण्यासाठी भगवान शिवाची कठोर तपस्या केली. त्याच्या तपस्येला प्रसन्न होऊन गंगा माता पृथ्वीवर येण्यास तयार झाली, परंतु तिचा वेग इतका होता की पृथ्वी ती सहन करू शकली नसती. म्हणून भगवान शिवाने गंगेला आपल्या जटांमध्ये सामावून घेतले आणि नंतर हळूहळू पृथ्वीवर सोडले. ज्या शिळेवर बसून भगीरथाने तप केले, ती ‘भगीरथ शिला’ आजही मंदिर परिसरात पाहायला मिळते.
गंगोत्री मंदिराचे बांधकाम १८ व्या शतकात अमरसिंग थापा याने केले होते. पांढऱ्या शुभ्र दगडांनी बनलेले हे मंदिर अतिशय भव्य आणि शांत वाटते. मंदिरात गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या सोन्याचे मुखवटे असलेल्या मूर्ती स्थापित आहेत. गंगोत्रीच्या मार्गावर ‘हर्षिल’ नावाचे एक निसर्गरम्य गाव लागते, ज्याला उत्तराखंडचे ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हटले जाते. हर्षिलचा इतिहास फ्रेडरिक ‘पहाडी’ विल्सन या इंग्रज सैनिकाशी जोडलेला आहे. १८४२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातून पळून आलेला हा सैनिक या दुर्गम भागात स्थायिक झाला आणि त्याने स्थानिक संस्कृतीशी स्वतःला जोडून घेतले. विल्सनने या खोऱ्यात काही महत्त्वाचे बदल घडवून आणले:
विल्सननेच या भागात सफरचंदाच्या बागा आणि राजमा पिकाची ओळख करून दिली, जे आज या भागातील मुख्य नगदी पीक आहे. त्याने देवदारच्या झाडांची तोड करून रेल्वे बांधकामासाठी ब्रिटिशांना लाकूड विकून मोठी संपत्ती कमावली. तो स्वतःची नाणी चालवत असे आणि स्थानिक लोक त्याला ‘हर्षिलचा राजा’ म्हणत असत. विल्सनच्या जंगलतोडीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले. चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांनी गडवालमधील जंगलतोडीसाठी विल्सनला जबाबदार धरले होते. विल्सनचा वारसा आजही वादात आहे. असे म्हटले जाते की स्थानिक देवतेच्या पुजाऱ्याने त्याला जंगलांचा नाश केल्याबद्दल शाप दिला होता, ज्यामुळे त्याच्या पुढील पिढ्यांचे नाव संपुष्टात आले. तरीही, ‘हर्षिल ॲपल फेस्टिव्हल’ च्या माध्यमातून त्याचा कृषी वारसा आजही साजरा केला जातो. केदारनाथ धाम- आध्यात्मिक शक्ती आणि २०१३ चा महाप्रलय – केदारनाथ हे भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर (११,७५५ फूट) असलेले धाम आहे. हे मंदिर मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेले असून पांडवांशी याचा जवळचा संबंध आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी पांडव शिवाला शोधत हिमालयात आले होते. १६ आणि १७ जून २०१३ रोजी उत्तराखंडमध्ये ढगफुटी होऊन भीषण जलप्रलय आला. चौराबाडी तलाव फुटल्यामुळे आलेल्या पाण्याचा प्रचंड ओघ केदारनाथ मंदिराच्या दिशेने येत होता. अशा संकटाच्या वेळी एक अवाढव्य शिळा (साधारण १२ फूट उंच आणि २० फूट रुंद) पाण्याच्या प्रवाहातून वाहत आली आणि मंदिराच्या अगदी मागे स्थिर झाली. या शिळेमुळे पुराच्या पाण्याचे दोन प्रवाह विभागले गेले आणि मुख्य मंदिराला कोणतीही मोठी इजा झाली नाही. या शिळेला ‘भीम शिला’ असे नाव देण्यात आले आहे. असे मानले जाते की भगवान शिवाने स्वतः या मंदिराचे रक्षण करण्यासाठी ही शिळा पाठवली होती. या प्रलयात ६००० हून अधिक लोक दगावले, परंतु मंदिरात आश्रय घेतलेल्या ३०० ते ५०० भाविकांचे प्राण या भीमशिलेमुळे वाचले. केदारनाथ मंदिराची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
कत्युरी शैलीतील मजबूत दगडी बांधकाम, सिमेंटशिवाय इंटरलॉकिंग पद्धतहे स्थापत्य शैलीचा उत्कृष्ठ नमुना आहे. येथील स्वयंभू पाषाण लिंग त्रिकोणी आकाराचे आहे. येथी शिवाची पाच रूपे: केदारनाथ (कुबड), तुंगनाथ (बाहू), रुद्रनाथ (मुख), मध्यमहेश्वर (नाभी), कल्पेश्वर (जटा). हिवाळ्यात देवाचे पूजन उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात केले जाते. बद्रीनाथ धाम: विष्णूचे परम पवित्र निवासस्थान यात्रेचा अंतिम टप्पा म्हणजे बद्रीनाथ. अलकनंदा नदीच्या काठावर, नारायण आणि नील पर्वतांच्या मध्ये वसलेले हे मंदिर भगवान विष्णूच्या बद्रीनारायण रूपाला समर्पित आहे. आदि शंकराचार्यांनी या मंदिराची स्थापना केली होती. असे मानले जाते की भगवान विष्णूने येथे ‘नर-नारायण’ अवतारात तपस्या केली. त्यांच्या तपस्येच्या वेळी लक्ष्मी मातेने बोरीच्या (बद्री) झाडाचे रूप घेऊन त्यांच्यावर सावली धरली, म्हणून या स्थानाला ‘बद्रीनाथ’ म्हटले जाते. बद्रीनाथ मंदिराच्या खाली ‘तप्त कुंड’ नावाचे गरम पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. भाविक या कुंडात स्नान करूनच मंदिरात दर्शनासाठी जातात.
माना गाव: सांस्कृतिक आणि पौराणिक केंद्र बद्रीनाथपासून ४ किमी अंतरावर असलेल्या ‘माना’ गावाला भारत-चीन सीमेवरील ‘पहिले भारतीय गाव’ म्हटले जाते. हे गाव सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध असून येथे भोटिया समुदायाचे वास्तव्य आहे. व्यास गुंफा: महर्षी वेद व्यास यांनी याच गुहेत बसून महाभारताची रचना केली होती असे मानले जाते. या गुहेच्या छताचा आकार पुस्तकाच्या पानांसारखा दिसतो. गणेश गुंफा: व्यासांनी सांगितलेले महाभारताचे श्लोक गणपतीने याच ठिकाणी लिहिले होते. भीम पूल: पांडव जेव्हा स्वर्गारोहणासाठी (स्वर्गारोहिणी) निघाले होते, तेव्हा सरस्वती नदी ओलांडण्यासाठी भीमाने एक अवाढव्य शिळा टाकून पूल तयार केला होता, जो आजही तेथे पाहायला मिळतो. सरस्वती उगम: सरस्वती नदी येथेच जमिनीतून प्रकट होते आणि थोड्या अंतरावर अलकनंदेला मिळते.
चारधाम यात्रेचा प्रवास अत्यंत कठीण डोंगराळ भागातून होतो. उत्तराखंडमधील चमोली, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी जिल्ह्यांत ही तीर्थक्षेत्रे पसरलेली आहेत. प्रवासात ‘टिहरी धरण’ सारखी आधुनिक अभियांत्रिकीची स्थळे आणि ‘देवप्रयाग’ (अलकनंदा आणि भागीरथीचा संगम) सारखी नैसर्गिक संगम स्थाने पाहायला मिळतात.
आजच्या काळात ‘चारधाम महायोजना’ अंतर्गत १२,५०० कोटी रुपयांचे रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू आहे, ज्यामुळे बाराही महिने यात्रा सुरक्षित करणे हा शासनाचा उद्देश आहे. हेलिकॉप्टर सेवांमुळे केदारनाथचा खडतर प्रवास आता सोपा झाला आहे, तरीही निसर्गाचा लहरीपणा हे सर्वात मोठे आव्हान आहे. ११,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर ऑक्सिजनची पातळी ९० टक्क्यांच्या खाली जाते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. पावसाळ्यात डोंगराचा भाग कोसळल्यामुळे रस्ते तासनतास बंद राहतात.
येथे सकाळी निरभ्र आकाश असते आणि दुपारी अचानक धो-धो पाऊस सुरू होऊ शकतो. चारधाम यात्रा ही केवळ हिंदू धर्मातील एक संस्कार असून ती मानवी जिद्द आणि निसर्गाप्रती असलेली श्रद्धा यांचे प्रतीक आहे. आदि शंकराचार्यांनी मांडलेली एकतेची संकल्पना आजही या तीर्थक्षेत्रांच्या माध्यमातून जिवंत आहे. २०१३ च्या प्रलयाने हिमालयाची संवेदनशीलता जगासमोर आणली, तरीही भीमशिलेसारख्या घटनांमुळे भाविकांची श्रद्धा अधिकच दृढ झाली आहे. या यात्रेचे यश हे केवळ धार्मिक पर्यटनावर अवलंबून नाही तर, तेथील स्थानिक भोटिया समुदायाचा विकास आणि सफरचंदासारख्या कृषी उद्योगांवरही आधारित आहे. निसर्गाचा आदर राखून आणि आध्यात्मिक शिस्त पाळून केलेली ही यात्रा खऱ्या अर्थाने आत्मिक शांती देणारी ठरते. भविष्यात पर्यटनाचे स्वरूप बदलले तरी हिमालयातील या चार धामांचे आध्यात्मिक तेज आणि त्यांचे भारतीय मनातील स्थान अढळ राहील हे सत्य आहे.

चारधाम यात्रेचा प्रवास संपतो. पण ती संपत नाही. कारण ती आपल्या मनात चालूच राहते, आठवणींमध्ये, विचारांमध्ये, श्रद्धेमध्ये रुंजी घालत राहते..या यात्रेने एक गोष्ट शिकवली. देव हा केवळ मंदिरात नाही, तो प्रत्येक अनुभवात आहे, प्रत्येक क्षणात आहे. हिमालयाच्या त्या थंड वाऱ्याने, गंगेच्या त्या प्रवाहाने, केदारनाथाच्या त्या दर्शनाने आणि सहप्रवाशांच्या त्या सहवासाने, जीवनाला एक नवीन दृष्टी दिली. कदाचित पुन्हा हा योग येईल, कदाचित नाही. पण एक गोष्ट नक्की. ही यात्रा आयुष्यभर सोबत राहणार आहे.
“हर हर गंगे…
जय बाबा केदारनाथ…
जय बद्रीविशाल…!”

 

श्रीकांत भास्कर तिजारे
९४२३३८३९६६

भारतीय पोलिसांची ब्रिटीशी वसाहतवादी मानसिकतेतून मुक्ततेची गरज ?

भारतीय पोलिसांची ब्रिटीशी वसाहतवादी मानसिकतेतून मुक्ततेची गरज ?

१९ जून २०२० ची संध्याकाळ भारतीय न्यायप्रक्रियेतील एक वाईट संध्या म्हणून उदयास आली. तामिळनाडूतील थुथुकुडी जिल्ह्यातील सथनकुलम हे छोटेसे शहर. कोविड 19 च्या लॉकडाऊनमुळे संचारबंदी लागू होती. पी. जयराज हे ५८ वर्षांचे व्यापारी आपले छोटे मोबाइल दुकान चालवत होते. त्या संध्याकाळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आरोप होता की त्यांनी दुकान परवानगीच्या वेळेनंतर काही मिनिटे उघडे ठेवले. त्यांचा ३१ वर्षांचा मुलगा जे . बेनिक्स बापाची चौकशी करायला पोलीस ठाण्यात आला आणि त्यालाही आत घेण्यात आले. त्यानंतर कोणालाही त्यांना भेटू दिले गेले नाही. त्या संध्याकाळी काळाची आणि पोलिसांची अशी संधी झाली होती की एका सामान्य बाप लेकाचा घात झाला. CBI च्या फॉरेन्सिक अहवालानुसार त्या रात्री दोघांना सुमारे सात तास सातत्याने मारहाण करण्यात आली. ऑटोप्सी रिपोर्टस मध्ये जायराज यांच्या शरीरावर किमान १७ जखमा आणि बेनिक्स यांच्या शरीरावर १३ जखमा आढळल्या. त्यांचे रक्त पोलीस ठाण्याच्या भिंती, शौचालय आणि लाठ्यांवर सापडले आणि DNA चाचणीत ते पीडितांशी जुळले. दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेताना त्यांना रेक्टम मधून इतका रक्तस्त्राव होत होता की सहा वेळा कपडे बदलावे लागले तरीही डॉक्टरनांनी पोलिसांच्या दबावात त्यांना फिटनेस सर्टिफिकेट दिले. आणि कोरोनाकाळ असल्यामुळे न्याय दंडाधिकारी यांनी कोविड प्रोटोकॉल चे कारण सांगत दुरूनच पोलिसांना त्यांना सब जेल मध्ये न्यायला सांगितले.
२२ जून २०२० रोजी रात्री ९ वाजता बेनिक्स यांचे अतीव अंतर्गत रक्तस्त्रावामुळे निधन झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे ४:३० वाजता जयराज यांचाही फुफ्फुसाला इजा झाल्याने मृत्यू झाला. बाप आणि मुलाचा गुन्हा होता फक्त दुकान काही मिनिटे उशिरापर्यंत उघडे ठेवणे ?  मृत्यूनंतर तामिळनाडूभर व्यापाऱ्यांनी बंद पाळला, रस्ते अडवले गेले आणि मद्रास हाई कोर्ट ने २४ जून रोजी स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतली. तपास सीआयडी कडून सीबीआय कडे हस्तांतरित करण्यात आला. सीबीआय ने तब्बल १०५ साक्षीदार तपासले आणि २,४२७ पानांचे चार्जशीट दाखल केले. दोन्ही पीडितांना स्वतःचे रक्त स्वतःच्याच कपड्यांनी पुसायला लावण्यात आले होते आणि ब्लैंकेट रक्ताने भिजून गेला तरी त्याच ब्लैंकेट वर त्यांना कोव्हिलपट्टी सब जेल मध्ये हलवण्यात आले. २३ मार्च २०२६ रोजी मदुराईच्या एडिशनल डिस्ट्रीक्ट अँड सेशन्सकोर्ट ने सर्व नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले आणि ६ एप्रिल २०२६ रोजी न्यायाधीश जी.मुथुकुमारान यांनी सर्व नऊ जणांना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायाधीश म्हणाले, “जर सामान्य नागरिकांनी हाच गुन्हा केला असता तर सामान्य शिक्षा दिली जाऊ शकली असती, परंतु येथे हा गुन्हा पोलिसांनीच केला.” दोषी ठरलेल्यांमध्ये इन्स्पेक्टर्स . श्रीधर सबइन्सपेक्टर्स बालाकृष्णन आणि रघुगणेश , तसेच हेड कॉन्स्टेबलस आणि कॉन्स्टेबलस यांचा समावेश आहे. न्यायालयाने नऊ पोलिसांना एकत्रितपणे पीडित कुटुंबाला १.४० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचेही आदेश दिले. न्यायाधीशांनी या प्रकरणाची तुलना अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड हत्याप्रकरणाशी करत हे केवळ भारताचे नव्हे, जगभरातील पोलीस हिंसेचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले. हे प्रकरण एकट्या नऊ पोलिसांचे अपयश नाही. ती एका संपूर्ण वसाहतवादी यंत्रणेची विफलता आहे. ज्यात पोलीस, दंडाधिकारी, वैद्यकीय व्यवस्था आणि राजकीय इच्छाशक्ती सर्व सहभागी आहेत. हे समजून घ्यायचे असेल तर आपल्याला आधी भारताचा स्वतःचा गौरवशाली पोलीस इतिहास समजून घ्यायला हवा. भारतातील पोलीस व्यवस्थेचे मूळ हे जगातील सर्वात प्राचीन आणि परिपक्व अशा शासनव्यवस्थांमध्ये आहे. वेद, उपनिषदे आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रात ‘दंडनीती’ म्हणजे न्याय आणि दंडाचे शास्त्र याची विस्तृत मांडणी आहे. या संकल्पनेत सामाजिक व्यवस्था पुरस्कार आणि शिक्षेच्या योग्य संतुलनाद्वारे राखण्याचा आग्रह होता. ऋग्वेद आणि अथर्ववेदात गुन्ह्यांचे उल्लेख आहेत आणि सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या कालखंडातही सुरक्षा व्यवस्थेचे पुरावे सापडतात.
मौर्य साम्राज्याच्या काळात कौटिल्याने अर्थशास्त्रात ‘नगराध्यक्ष’ किंवा ‘नागरक’ या पदाचे वर्णन केले आहे, जो शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रमुख होता. संपूर्ण शहर चार भागांत विभागले जाई आणि प्रत्येक भागाचा प्रमुख ‘स्थानिक’ असे. दर १० ते ४० घरांमागे ‘गोप’ हा अधिकारी असे, ज्याचे काम केवळ सुरक्षा नव्हे तर रहिवाशांशी सातत्याने संपर्क राखणे हेही होते. याज्ञवल्क्य यांनी स्पष्ट केले की पोलिसांची मुख्य कर्तव्ये गुन्हे प्रतिबंध, जनसंरक्षण आणि गुन्हेगार पकडणे ही आहेत. त्या काळात बंदी केलेल्या कैद्यांवर अत्याचार करणाऱ्या सैनिकांना सुद्धा कठोर शिक्षा राजाकडून दिल्या जात होत्या. गुप्त काळात ही व्यवस्था अधिक विकेंद्रित झाली. ग्राम पंचायती आणि स्थानिक संस्थांना सुरक्षेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले. म्हणजेच सांगण्याचे एकमेव कारण हे की भारताची मूळ पोलीस संकल्पना जनाभिमुख, स्थानिक, आणि धर्म म्हणजे सामाजिक न्यायावर आधारित होती. जनतेचा रक्षक म्हणून होती मालक म्हणून नव्हे. मध्ययुगात मुघल साम्राज्याने कोतवाल व्यवस्था आणली. कोतवाल हा शहराचा पोलीस प्रमुख, दंडाधिकारी आणि नगरपाल तिन्ही एकाच व्यक्तीमध्ये एकवटलेले होते. आणि खऱ्या अर्थाने या व्यवस्थेचा दूरपयोग सुरू झाला. ग्रामीण भागात चौकीदार व्यवस्था होती. परंतु मुघल शासन मूलतः लष्करी आणि केंद्रीकृत स्वरूपाचे असल्याने न्याय यंत्रणा कमकुवत राहिली. इथ पर्यंत ठीक होते परंतु या काळानंतर जो ब्रिटिश काळ आला तो मात्र पोलिस प्रक्रियेला पूर्णत बदलणार होता.

१७५७ नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जी चौकट उचलली, ती आधीच भ्रष्ट झालेली होती. लॉर्ड कॉर्नवॉलीस यांनी १७८६–९३ दरम्यान थानेदारी व्यवस्था रद्द करण्याचा प्रयत्न केला, परंतु खंडणी, बेकारकारभार आणि अत्याचार चालूच राहिले. मद्रास टॉर्चर कमिशन(१८५५) ने पोलीस यंत्रणेतील पद्धतशीर अत्याचाराचा पर्दाफाश केला. १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांनी आयर्लंडमधील कॉन्स्टेबुलरी प्रणालीचे अनुकरण करत इंडिया पोलीस एक्ट , 1861 तयार केला. या कायद्याचा आत्मा एकाच वाक्यात सांगता येतो: पोलीस हे जनतेचे सेवक नव्हे, सत्तेचे हत्यार आहेत. स्वातंत्र्यानंतर हे जसेच्या तसे उचलले गेले. नॅशनल पोलीस कमीशन (१९७७–८१), रिबेरो कमिटी(१९९८) आणि पद्मनाभैयाह कमिटी (२०००) यांनी सुधारणांची शिफारस केली. परंतु प्रत्येक वेळी त्या फायलींमध्येच दडपल्या गेल्या. कारण उघड होते. सत्ता टिकवण्यासाठी वसाहतवादी पोलीस यंत्रणा सोयीची होती. परंतु या संपूर्ण व्यवस्थेचा सर्वात खोल परिणाम हा केवळ कायद्यांत नव्हे तर मानसिकतेत झाला. ब्रिटिशांनी उभारलेली पोलीस यंत्रणा ही मूळतः “law enforcement for public welfare” नव्हती, तर “law enforcement for control” होती. भारतीय समाजावर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांना संशयाच्या नजरेतून पाहणे, लोकांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, आणि कायद्याची अंमलबजावणी करताना मानवी हक्कांपेक्षा सत्ता टिकवणे. ही त्या वसाहतवादी पोलीस व्यवस्थेची वैशिष्ट्ये होती. पोलीस हे जनतेचा भाग नसून सत्तेचे प्रतिनिधी आहेत, अशी जाणीव जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली होती. या दृष्टिकोनातूनच पोलीस ठाणे हे “सेवा केंद्र ” न राहता “नियंत्रण केंद्र ” बनले. नागरिक हा ‘हक्कधारक’ नसून ‘संशयित’ आहे, अशी एक अव्यक्त धारणा या यंत्रणेत रुजली. चौकशी म्हणजे सत्य शोधण्याची प्रक्रिया नसून कबुलीजबाब काढण्याची पद्धत बनली. अधिकार म्हणजे जबाबदारी नव्हे, तर वर्चस्व गाजवण्याचे साधन बनले. हीच मानसिकता पुढे स्वातंत्र्यानंतरही अनेक स्तरांवर टिकून राहिली. त्या काळात ब्रिटिशांनी केलेला Criminal Tribes Act, १८७१ हा त्याच मानसिकतेचा सर्वात टोकाचा नमुना होता, ज्यामध्ये संपूर्ण समाजांना जन्मतःच गुन्हेगार ठरवण्यात आले. हा केवळ कायदा नव्हता, तर राज्य आणि नागरिक यांच्यातील विश्वास पूर्णपणे नष्ट करणारी रचना होती. जरी हा कायदा रद्द झाला असला, तरी त्याची सावली आजही अनेक भटके-विमुक्त समाजांवर दिसून येते, जिथे पोलिसांकडून त्यांच्याकडे संशय आणि भेदभावाच्या नजरेने पाहिले जाते.

आणि स्वतत्रकाळानंतर सर्वोच्च न्यायालयाने यात अमूलाग्र बदल घडवून आणला. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली अर्नेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार (Criminal Appeal No. 1277 of 2014) या खटल्यात जे निरीक्षण नोंदवले, ते केवळ एका प्रकरणाचा निकाल नव्हे ते एक ऐतिहासिक साक्ष आहे. न्यायमूर्ती चंद्रमौली प्रसाद आणि पिनाकी चंद्रघोष यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने स्पष्ट शब्दांत नमूद केले की, पोलीस यंत्रणा स्वातंत्र्याच्या सहा दशकांनंतरही आपली वसाहतवादी प्रतिमा सोडू शकलेली नाही आणि ती जनतेसाठी “a tool of harassment and oppression” म्हणूनच ओळखली जाते “not considered a friend of public.” हेच ते महत्त्वाचे विधान आहे. याच निकालाचा विस्तार करताना सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की, “The need, therefore, for maintaining the confidence of individuals and society at large in the police is paramount.” म्हणजेच जनतेचा आणि समाजाचा पोलिसांवरील विश्वास टिकवणे ही लोकशाहीच्या प्रभावी कार्यासाठी अत्यावश्यक बाब आहे. न्यायालयाने असे सांगितले की Police is a friend of society हे केवळ एक आदर्श नाही, ती एक घटनात्मक जबाबदारी आहे. पोलिसांच्या अटकेच्या अधिकाराचा वापर जनतेचा मित्र म्हणून व्हायला हवा, हत्यार म्हणून नव्हे. न्यायालयाने म्हटले की, “Arrest brings humiliation, curtails freedom and casts scars forever. Law makers know it so also the police. There is a battle between the law makers and the police and it seems that police has not learnt its lesson.” त्याचबरोबर न्यायालयाने बजावले की अटक करण्याचा अधिकार हा पोलीस भ्रष्टाचाराचा एक फायदेशीर स्रोत बनला आहे आणि ‘आधी अटक करा, नंतर विचार करा’ ही वृत्ती घृणास्पद आहे, तसेच ती कमी संवेदनशीलता असलेल्या किंवा वाईट हेतू असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे सोयीचे साधन बनली आहे. या निकालाचा खरा अर्थ असा आहे की न्यायालयाने भारतीय पोलिसांना दोन टोकांमध्ये उभे राहिलेले दाखवले एका बाजूला जे असायला हवे आहे, police as a friend of society, आणि दुसऱ्या बाजूला जे प्रत्यक्षात आहे, colonial tool of harassment. अर्नेश कुमार निकालातील गाइडलाईन्स म्हणजे या दोन्ही टोकांमधील अंतर कमी करण्याचा न्यायालयाचा प्रयत्न होता. अटकेपूर्वी Section 41 CrPC अंतर्गत नऊ प्रश्नांची चेकलीस्ट अनिवार्य, ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये अटक हा नियम नव्हे अपवाद, आणि दंडाधिकारी ने कारणमीमांसा न वाचता डिटेन्शन अधिकृत करणे म्हणजे डिपार्टमेंटल एक्शन ला पात्र. हे निर्देश BNSS 2023 च्या कलम ३५ मध्येही कायम आहेत. परंतु निकाल असताना जयराज , बेनिक्स सारख्या घटना घडत राहतात, हे ‘police as friend’ या संकल्पनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे अपयश आहे.

NCRB आणि NHRC च्या अधिकृत आकडेवारीनुसार, १९९९ ते २०२३ या २५ वर्षांत पोलीस कोठडीत २,२५३ व्यक्तींचे मृत्यू नोंदविले गेले, दरवर्षी सरासरी ९० माणसे. पोलिसांविरुद्ध २,३७३ गुन्हे दाखल झाले परंतु शिक्षा केवळ ३ जणांना तेही फक्त एकाच वर्षी. महाराष्ट्रात २०१८ ते २०२३ दरम्यान पोलीस कोठडीत ८० मृत्यू देशात गुजरातनंतर दुसऱ्या क्रमांकावर. हे आकडे police as friend या आदर्शाचे किती मोठे उल्लंघन आहे हे सांगतात. मग इतर देशांनी या समस्येवर काय उपाय केले? जगभरातील अनुभव आपल्याला मार्ग दाखवतो. युनायटेड किंग्डममध्ये Independent Office for Police Conduct (IOPC) ही पूर्णपणे स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. युनायटेड किंग्डममध्ये IOPC सारख्या स्वतंत्र संस्था कोठडीतील मृत्यूंची निःपक्षपाती, सार्वजनिक छाननी आणि कायदेशीर कठोरतेसह चौकशी करतात. अटक झालेल्या व्यक्तींना कायदेशीर सल्ला, मानसिक मूल्यांकन आणि त्यांच्या हक्कांची त्वरित माहिती मिळण्याचा अधिकार आहे. याचा परिणाम म्हणजे पोलीस जबाबदारीची संस्कृती निर्माण झाली आहे. पोलीस ठाण्यातील प्रत्येक मृत्यूची IOPC कडे त्वरित नोंद अनिवार्य आहे, चौकशी त्याच विभागाने नव्हे तर बाहेरील यंत्रणेने होते आणि निष्कर्ष सार्वजनिक केले जातात. नॉर्वे आणि फिनलंड यांनी कोठडी आणि तुरुंग व्यवस्थेत एक मूलभूत तात्विक बदल केला आहे. नॉर्वेच्या Correctional Service चे मुख्य तत्त्व आहे, “Life inside shall resemble the life outside as much as possible.” तेथील पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “If you treat someone as a monster, they’ll behave like a monster.” नॉर्वेने पोलीस कोठडी ४८ तासांपेक्षा जास्त असणे जवळजवळ नाहीसे केले आहे. अल्पवयीनांसाठी कोठडी हा शेवटचा उपाय असतो आणि non-custodial sanctions ला प्राधान्य दिले जाते. स्थानबद्ध वर सातत्याने नजर ठेवण्याची आणि त्यांना सामाजिक संवादाची संधी देण्याची जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांवर कायद्याने घातली आहे. अमेरिकेने जॉर्ज फ्लॉयड च्या हत्येनंतर अनेक राज्यांमध्ये बॉडीवर्न कॅमेरा(BWC) अनिवार्य केले. पोलिसांनी घातलेल्या body camera मुळे कोठडीतील प्रत्येक क्षण रेकॉर्ड होतो. फुटेज नष्ट करणे हा स्वतंत्र गुन्हा ठरतो. यामुळे पुरावा नष्ट होण्याची शक्यता संपुष्टात येते. भारतात सर्वोच्च न्यायालयाने CCTV अनिवार्य केले असले तरी आजही २,७०१ पोलीस ठाणी कॅमेऱ्याविना आहेत.

जर्मनी आणि स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये पोलीस प्रशिक्षणात मानसशास्त्र, सामाजिक संवाद आणि डी -एस्केलेशन टेक्निक्स यांवर भर दिला जातो. शारीरिक बळाचा वापर हा शेवटचा उपाय असतो, पहिला नाही. भारताने स्वतंत्र देखरेख संस्था स्थापन करणे, एंटी -टॉर्चर कायदा संमत करणे आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मानकांशी देशांतर्गत कायदे सुसंगत करणे आवश्यक आहे. भारताने १९९७ साली UN Convention Against Torture वर स्वाक्षरी केली परंतु अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही. या सर्व देशांतील एक समान सूत्र आहे. पोलीस यंत्रणा ही सत्तेचे हत्यार नसून समाजाचा मित्र असली पाहिजे. ती संकल्पना तेथे कागदावर नाही, व्यवस्थेत आहे. भारताची प्राचीन पोलीस संकल्पना याच तत्त्वावर उभी होती. कौटिल्याने सांगितले होते की राजाचे सुख हे प्रजेच्या सुखात आहे. अर्नेश कुमार निकालात सर्वोच्च न्यायालयाने तेच सांगितले. police must be a friend of society. परंतु जयराज आणि बेनिक्स यांच्या मृत्यूला सहा वर्षांनंतर न्याय मिळाला, आणि त्यानंतरही तामिळनाडूत २०२१, २०२२, २०२४ आणि २०२५ मध्ये कोठडीतील मृत्यूच्या घटना घडत राहिल्या. हे सांगते की एकट्या निकालाने किंवा शिक्षेने व्यवस्था बदलत नाही त्यासाठी मूल्यांमध्ये, प्रशिक्षणात, कायद्यात आणि राजकीय इच्छाशक्तीत बदल हवा. पोलीस सुधारणा म्हणजे पोलिसांविरुद्ध युद्ध नव्हे. ती एक सामाजिक आणि संवैधानिक जबाबदारी आहे. अनुच्छेद २१ ने दिलेला जगण्याचा हक्क हा केवळ न्यायालयाच्या निकालांत राहू नये तो प्रत्येक पोलीस ठाण्यात, प्रत्येक रात्री, प्रत्येक कोठडीत जगला पाहिजे. जोपर्यंत ‘police as friend of society’ हे केवळ निकालातील वाक्य राहते. आणि प्रत्यक्ष कृती होत नाही, तोपर्यंत भारतीय संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकार आणि स्वातंत्र्याचे वचन पूर्ण होत नाही. आज सामान्य माणूस पोलीस स्टेशनला जाताना घाबरतो. पोलिसांचा फोन आला तरी तणाव निर्माण होतो. ही भीती संपवण्यासाठी पोलीस ठाणे हे सामाजिक विश्वासाचे केंद्र बनले पाहिजे. पोलीस सुधारणा म्हणजे संघर्ष नव्हे, तर विश्वासाची पुनर्स्थापना आहे. जोपर्यंत सामान्य नागरिक पोलीस ठाण्यात जाण्यास घाबरतो, तोपर्यंत स्वातंत्र्य अपूर्ण आहे. आणि जेव्हा पोलीस खऱ्या अर्थाने “समाजाचा मित्र” बनतील, तेव्हाच भारत पोलिस संस्था ही वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त होईल.

— ॲड संकेत राव

रायगडावरील शांतता राखा असा फलक काढल्याचे दिसतंय ?

रायगडावरील शांतता राखा असा फलक काढल्याचे दिसतंय ?

RIP हि हिंदूंची संकल्पना नाही. छत्रपती शिवरायांचा जयजयकार करणे हे चुकीचे नाही .

असे करण्यापासून पोलीस कुणाला थांबवू शकत नाहीत.

रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेर बाजूला जो शिलालेख आहे त्यांचे वर्णन इतरांना सांगण्यास पोलिसा प्रतिबंध करीत आहेत ?

(फोटो गुगल साभार )

 

 

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=oD1QXQS65IM[/embedyt]

 

 

 

चिनी जहाजे सोडियम पर्क्लोरेट घेऊन इराणला पोचल्याचे पुरावे.

इराण युद्ध सुरू झाल्यानंतर कित्येक चिनी जहाजे इराणला सोडियम पर्क्लोरेट हे मिसाईल उत्पादनातील सर्वाधिक महत्वाचे रसायन घेऊन पोचली असल्याचे पुरावे मिळाले आहेत. यामुळे इराणला आजपर्यंत नव्याने शेकडो मिसाईल तयार करता आल्याचा अंदाज आहे.

सोडियम पर्क्लोरेट हे रसायन सॉलिड फ्युएल मिसाईलच्या इंधनात अत्यंत महत्वाचा भाग आहे. चीन आणि रशिया इराणला अचूक टार्गेट अक्विजीशन, हल्ल्यानंतर झालेल्या नुकसानांचे सेटेलाईट फोटो, निर्व्याध कम्युनिकेशन, एयर डिफेन्स यंत्रणा आणि रिअल टाइम इंटेलिजन्ससह मिसाईल मध्ये वापरली जाणारी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सर्किट पुरवत आहेत. ( फोटो प्रतीक्त्म्क )

(ICRR Military/ Defence)

https://www.msn.com/en-gb/news/insight/chinese-missile-fuel-shipments-arrive-in-iran-amid-war/gm-GM38E0A885?gemSnapshotKey=GM38E0A885-snapshot-1&uxmode=ruby

निवृत्त पोलीस महासंचालक – प्रवीण दीक्षित यांचा विशेष लेख.

0

समाजाच्या संमतीने व सहकार्याने समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी आणि समाजस्वास्थ्य कायम ठेवण्यासाठी लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी बनवलेल्या घटनेने पोलीस दलाची निर्मिती करण्यात आली आहे. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी इंग्रजांनी भारतातील त्यांची सत्ता कायम राखण्यासाठी व त्यांच्या सत्तेला विरोध करणार्‍यांना चिरडून टाकण्यासाठी भारतातील संस्थाने विलीन केली. १८५७च्या स्वातंत्र्यसमरानंतर पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली भारतातील सध्याच्या पोलीस दलाची मुंबई, कलकत्ता, मद्रास व अन्य प्रांतांत निर्मिती करण्यात आली. १९२२पर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी हे पद फक्त इंग्रज अधिकार्‍यांसाठी राखीव होते. त्यामुळे खालच्या पदांवर म्हणजे शिपाई, फौजदार, पोलीस निरीक्षक, पोलीस उपअधीक्षक या पदांवर फक्त भारतीय काम करत होते. इंग्रजांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक लोकांचे दमन करणारे, स्वातंत्र्यसेनानींना त्रास देणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाई. तरीही त्या वेळी असलेल्या बेकारीमुळे, गरिबीमुळे व संस्थाने खालसा झाल्यामुळे अनेक गरीब ब्राह्मण घरांतील होतकरू मुले पोलीस दलात काम करू लागली.

भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या १८व्या अध्यायात ४२व्या श्लोकात ब्राह्मण्याची व्याख्या अशी केली आहे –

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च।

ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्।। अर्थात् शम (निग्रह), दम (बाह्य इंद्रियांचा निग्रह), तप (बाह्य व आंतर), शुद्धी, क्षमा, आर्जव (सरळपणा), शास्त्रज्ञान, विज्ञान (शास्त्रार्थााची अनुभूती) व आस्तिक्य (शास्त्रादिकांविषयी श्रद्धा) हे ब्राह्मणाचे स्वभावसिद्ध कर्म आहे.

कामसू वृत्ती, लेखनात हुशार, प्रामाणिकता, कामावरील श्रद्धा, स्वामीनिष्ठा, मृदुपणा, सर्व नियमांची-कामकाजाची उत्तम माहिती, जनसंपर्क व भ्रष्टाचारापासून अलिप्त या त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गुणांमुळे त्यांनी पोलीस ठाण्यातील महत्त्वाच्या अशा लेखनिक, मुद्देमाल कारकून, कोर्ट कारकून अशा अनेक पदांवर आपली छाप निर्माण केली. कुठेही बदली झाल्यास आज्ञाधारकपणे त्वरित तिथे पोहोचणे व लगेचच कामाला सुरुवात करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. निःपक्षपातीपणामुळे व स्थानिक लोकांच्या सहकार्याने अनेक गुन्ह्यांचा तपास त्यांनी हुशारीने केला आणि वेळोवेळी लोकांची व वरिष्ठांची मर्जी त्यांनी संपादन केली.

१९व्या शतकात, गणेश सहस्रबुद्धे यांना एकदा एका इंग्रज अधिकार्‍याने त्या वेळच्या नगर जिल्ह्यामध्ये पाहिले व विचारले, ‘तू पोलिसांत भरती होतोस का?’ त्याप्रमाणे ते पोलीस दलात बरीच वर्षे काम करत होते. पुढे साईबाबांनी त्यांना सांगितले, ‘तू ही नोकरी सोड;’ ‘पण चरितार्थ कसा चालवणार?’ त्यावर साइबाबांनी सागितले, ‘तू संतचरित्रे लिही व ती लोकांना सांग.’ त्याप्रमाणे सुरुवात होऊन आधुनिक महिपती म्हणून प्रसिद्ध दासगणू महाराजांचा लोकांना परिचय झाला हे सर्वश्रुत आहे.

भारतीय घटनेप्रमाणे भारत अनेक राज्यांमधे विभागलेला आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्या राज्यांवर सोपवलेली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असणारे पोलीस, गुप्तवार्ता संस्था (उदा. आयबी, रॉ, सीबीआय, बीएसफ, सीआरपी, एसएसबी, एनआयए, आयटीबीपी) अशी अनेक दले केंद्र शासनाच्या अखत्यारीत काम करत असतात. त्यांमध्ये ५० लाखांहून अधिक अधिकारी-कर्मचारी काम करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यात पुरुषांबरोबर स्त्रियांचीही मोठ्या प्रमाणात निवड केली जाते. परंतु माहीत नसल्यामुळे किंवा उदासीनतेमुळे किंवा आत्मविश्वासाअभावी महाराष्ट्रातील ब्राह्मण मुले-मुली या केंद्रीय दलांमध्ये अधिकारी किंवा कर्मचारी पदांवर क्वचितच आढळतात. दर वर्षी जवळजवळ चार लाख तरुण स्त्री-पुरुषांची या ठिकाणी गरज असते. वेतन अंदाजे दरमहा एक लाख रुपये असते आणि सोबत अनेक सुविधाही असतात. त्यासाठी दर वर्षी नियमितपणे स्पर्धा परीक्षा घेतली जाते. त्याची तयारी करून ब्राह्मण मुला-मुलींनी त्याचा फायदा घेतल्यास त्यांचे, कुटुंबीयांचे व देशाचे कल्याण होईल.

या अनेक संधी उपलब्ध आहेत, प्रत्यक्ष तसेच आंतरजालाच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार्‍या ‘अमृत’सारख्या संस्था आहेत, मुंबईच्या सावरकर राष्ट्रीय स्मारक निधीत मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था आहे, शिष्यवृत्त्या आहेत. त्यामुळे होतकरू तरुण-तरुणींनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे सुचवावेसे वाटते. या संधीपासून दूर राहण्याने आपण आपले नुकसान तर करतोच; पण देश विकासामध्ये आपल्या योगदानाने इतरांना विकसित व्हायला जी मदत झाली असती ती आपण नाकारत असतो.

देश एकसंध ठेवणे, परकीय शक्तींच्या आक्रमणाच्या वेळेस अंतर्गत सुरक्षा कायम राखणे, विविध राजकीय पक्षांच्या स्पर्धेत लोकांचा योग्य उमेदवार निवडायचा हक्क बजावायला मदत करणे व अडथळा आणणार्‍यांना प्रतिबंध करणे, विविध आंदोलनांत नागरिकांचे जीवन व मालमत्तेचे रक्षण करणे, सायबर क्राइम्स आणि आर्थिक गुन्ह्यांत लोकांची फसवणूक होणार नाही यासाठी प्रयत्न करणे व झाल्यास त्यांची रक्कम त्यांना परत करण्यास मदत करणे, महत्त्वाच्या व्यक्तींचे रक्षण करणे, औद्योगिक सुरक्षा अशी एकाहून एक अवघड वाटणारी कामे यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी भारतीय पोलीस सेवेत निवड झालेल्या अधिकार्‍यांना पार पाडावी लागते. वर उल्लेख केलेल्या अनेक संस्थांमध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्रातील व अन्य राज्यांतील ब्राह्मण अधिकार्‍यांनी सतत फार मोठे योगदान केलेले आहे. व्ही. जी. गोखले हे माउंट अबू येथील राष्ट्रीय पोलीस अकादमीचे संचालक होते. व्ही. जी. वैद्य इंटेलिजन्स ब्यूरोचे संचालक होते. मोहन कात्रे सीबीआयचे प्रमुख होते. मी (प्रवीण दीक्षित) देशातील ‘इमिग्रेशन’चा प्रमुख होतो. दत्ता पडसलगीकर राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार होते. सदानंद दाते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख होते आणि सध्या ते पोलीस महासंचालक असून, त्यांचे उत्कृष्ट योगदान आहे. ही मी फार थोडी नावे नमूद केली आहेत. संपूर्ण यादी लिहायची झाली, तर पाने कमी पडतील. महाराष्ट्र व मुंबईबद्दल सांगायचे तर एस. के. बापट, भावे, सोमण हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. पोलीस महासंचालक म्हणून मी २०१५-१६मध्ये काम पाहिले.

लोकांना भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करणे सोपे व्हावे म्हणून एसीबी महाराष्ट्र हे अ‍ॅप आम्ही तयार केले होते. त्यामुळे कोणीही व्हिडिओ, ऑडिओ किंवा फाइल मेसेज सहजपणे संबंधित अधिकार्‍याला पाठवू शकले. त्यामुळे दोन वर्षांत २४०० लाचखोर अधिकार्‍यांना रंगेहाथ पकडणे शक्य झाले. पोलीस महासंचालक असताना गडचिरोली, गोंदिया भागातील नक्षलवाद्यांना प्रतिबंध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या उपायांमुळे स्थानिक जनतेने नक्षल्यांना पूर्णपणे झिडकारले व नवीन भरती बंद झाली. पोलिसांच्या होणाऱ्या हत्या योग्य प्रशिक्षणामुळे बंद झाल्या. जनता व पोलीस यांच्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस मित्र ही अभिनव संकल्पना राबवण्यात आली. संपूर्ण राज्यातून पाच लाख स्त्री-पुरुष आपखुशीने पुढे आले व पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम कोणताही मोबदला न घेता करत होते. सर्व सणांमध्ये बंदोबस्त करत होते. त्यामुळे चेन स्नॅचिंग, खंडणी, लुटालूट करणे अशा रस्त्यावरील गुन्ह्यांमध्ये १५-२० टक्के घट करण्यात यश आले. मी नागपूरमध्ये आयुक्त असताना, गुन्हेगारीत अडकलेल्या १८ वर्षांखालील मुलांसाठी समुपदेशन करून त्यांना व्यवसायकौशल्य देण्यात आले. त्यामुळे ते कमावू लागले व घरच्यांना आर्थिक मदत करू लागले. पोलिसांच्या कल्याणासाठी मुंबई व अन्य भागांत चांगली घरे बांधून दिल्याने पोलिसांचे मनोधैर्य उंचावले. पोलिसांच्या मुलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

मुस्लिम तरुणांची डोकी भडकवून त्यांना आततायी करण्याच्या प्रयत्नांविरोधात अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दहशतवादविरोधी पथकात काम करत असताना अत्यंत महत्त्वाचे काम केले. अनेक दहशतवादी कोणतेही देशविरोधी कृत्य करण्यापूर्वी पकडले गेले. राष्ट्रीय तपास यंत्रणेत (एनआयए) विशेष संचालक म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक दहशतवादी मोड्यूल्स उद्ध्वस्त केली. सोलापूर ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पंढरीच्या वारीत येणार्‍या २० लाख वारकर्‍यांची अचूक मोजणी केली. चेनस्नॅचिंग करणार्‍या गुन्हेगारांना फेशियल टेक्नॉलॉजीचा वापर करून पकडले. याव्यतिरिक्त त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारात झाडे लावून हवामान थंड राखण्यास हातभार लावला आहे.

मी पोलीस सेवेत रुजू झालो तेव्हा बॅनर्जी पोलीस अधीक्षक होते. मुख्यालयातून त्यांनी मला एक सायकल दिली व सांगितले, की ‘ही तू वापरत जा.’ तेव्हा ब्राह्मण अधिकारी अतिशय साधेपणे जगत होते. आजही जिथे सायकल पॅट्रोलिंग केले जाते, तिथे गुन्हे कमी होतात. त्यानंतर आलेल्या अरविंद इनामदार यांच्याकडून पोलिसिंगबद्दल मला खूप काही शिकता आले. संभाजीनगरमध्ये काम करत असताना पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी पेठांमधून, बाजारातून पायी पॅट्रोलिंग करण्याचे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे कसब शिकवले. पोलिसिंगमध्ये हडेलहप्पी नसून, ते शांतपणे, कौशल्याने, मेहनतीने करायचे काम आहे, हे अनेक ब्राह्मण अधिकार्‍यांनी समाजावर आपल्या उत्कृष्ट वर्तनाने वारंवार बिंबवले आहे. त्यामुळे मी सगळ्या तरुण ब्राह्मण युवक-युवतींना आग्रह करीन, ‘स्पर्धेला घाबरू नका. शिपायापासून ते आयपीएसपर्यंत कोणत्याही पदासाठी नक्की प्रयत्न करा. तुम्ही यशस्वी व्हाल व मोठे योगदान द्याल.’ (साभार अमृत महाराष्ट्र)

– प्रवीण दीक्षित

(लेखक निवृत्त पोलीस महासंचालक आहेत.)

पुस्तक – जलसंवाद, जल साक्षरतेकडून समृद्धिकडे .

 

मानवी संस्कृतींचा इतिहास पाहिला तर तो नद्यांच्या काठावर फुललेला दिसतो. सिंधू, गंगा, नाईल यांसारख्या नद्यांनी केवळ शेतीच नव्हे तर संपूर्ण सभ्यता घडवली. म्हणूनच “ पाणी म्हणजे जीवन ” असे म्हटले जाते. पाणी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. अपुऱ्या पाण्याचे संकट, पाण्याची बचत, याविषयी प्रत्तेकाने कार्य करणे आवश्यक आहे. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नाही तर पुढील पिढ्यांची आणि संपूर्ण जीव श्रुष्टीचा अनमोल ठेवा आहे. आपण आज केलेली पाण्याची बचत आणि नियोजन उद्याचे सुरक्षित भविष्य असेल. या पुस्तकातील माहिती हि जलसंकट आणि त्यावर आपल्याला काय उपाय करता येऊ शकतात या उद्देशाने दिलेली आहेत. हे साध्य करायचे असेल तर प्रत्तेक घरात ‘जल संवाद’ होणे गरजेचा आहे. ‘जलसाक्षर’ होण्यास हे पुस्तक आपल्याला मदत करेल. पाणी टंचाईच्या विरोधात आपण सगळ्यांनी मिळून एक पाउल पुढे कसे टाकावे हे या पुस्ताकातून आपल्याला कळेल.

 

पुस्तक – जलसंवाद, जल साक्षरतेकडून समृद्धिकडे .

लेखक – नितीन राजवैद्य.

प्रकाशन – काव्यगंध प्रकाशन .

पुस्तका करिता संपर्क – www.bookganga.com

https://www.bookganga.com/eBooks/B/99TZO

९८८१५६०१५५ (whatsaap only)