अतांत्रिक शाखा आणि तंत्रज्ञानातील संधी

अतांत्रिक शाखा आणि तंत्रज्ञानातील संधी

मी अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये तांत्रिक प्रयोगशाळा प्रस्थापित केलेल्या आहेत.मुख्यतः शाळांमध्ये पहिली पासून ते नववी पर्यंत रोबोटिक्स व तंत्रज्ञानावर आधारित मी पुस्तके लिहिली आहेत, तीच मी रोबोटिक्स च्या सेटअप बरोबर शिकविण्याकरिता देत असते.त्यात इलेक्ट्रॉनिक्स च्या करंट/वोल्टेज, सेन्सर्स, मायक्रोकंट्रोलर पासून ते मेकॅनिकल च्या गिअर्स,कायन्यामटीक्स, इलेक्ट्रिकल च्या विविध सप्लाय, विविध मोटर्स,  कम्प्युटर सायन्स च्ये अल्गोरिथम्स आणि विज्ञान आणि गणिताच्या विविध प्रमेयनपर्यंत सर्व सामावलेले असते.

हे करत असताना अनेक पालकांबरोबर आणि शिक्षकांबरोबर संपर्क आला आणि त्यांचे अनेक प्रश्नही आलेत, त्यापैकी सर्वात महत्वाचा प्रश्न हा होता कि आमच्या मुलांना जर इंजिनिअर बनायचे नसेल कला/वाणिज्य/वैद्यकीय किंवा कायद्याच्या क्षेत्रात जायचे असेल तर आमच्या मुलांनी तांत्रिक शिक्षण का घ्यावे?

तसेच महाविद्यालयातील याच क्षेत्रातील मुलांकडून देखील “हे आमचे क्षेत्र नाही तर आम्हाला काय आवश्यकता आहे तो विषय शिकण्याची” हे उत्तर ऐकावयास मिळाले. आणि म्हणूनच काळाची गरज ओळखून ह्या प्रश्नच उत्तर देणं मी गरजेचं समजते.

वाणिज्य/ कला/वैद्यकीय/कायद्याच्या पदवीधरांनी तंत्रज्ञानाविषयी जाणुन घेणे व शिकणे का आवश्यक आहे?

तर्कशास्त्र,  उत्पादनाचा व्यावसायिक पैलू,  त्याचे बाह्यस्वरूप तसेच तंत्र-व्यावसायिक सायबर ह्या सर्व क्षेत्रांमध्ये नेहमीच वरील क्षेत्रातील उत्तम पदवीधरांची गरज भासते. जेव्हा एखाद्या उत्पादनाच्या व्यवसायिकीकरणाची वेळ येते तेव्हा तिथे एखाद्या वाणिज्य पदवीधराची भूमिका गरजेची ठरते तिथे कोणताही अभियंता कामी पडू शकत नाही.

आजकाल तंत्रज्ञान व त्याचा वापर अत्यंत वाढला आहे, तांत्रिक उत्पादनांची संख्या वाढली आहे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही उत्पादन व्यवसायिकीकरण्यासाठी वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांची गरज असते पण त्यांना त्यांच्या शिक्षणाबरोबर तंत्रज्ञानाचे ज्ञान असणेही तेवढेच गरजेचे असते.

हा दुहेरी कार्यक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या वाणिज्य अभ्यासाला तंत्रज्ञानाच्या कुशलतेसोबत एकत्रित करतो. जेणेकरून ते इ-कॉमर्स च्या क्रांतीत सहभागी होऊ शकतील.

जर वाणिज्य किंवा कायद्याच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मूलभूत तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले तर त्यांना त्यांच्या ज्ञानाच्या शाखा विस्तारायला मदत होईल आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला उद्याच्या उज्वल भारताचे कौशल्यपूर्ण शिलेदार तसेच उद्योजक मिळतील.

सांगताना वाईट वाटते पण हि वास्तविकता आहे (ज्याला काही अपवाद हि आहेत) आपल्याला खालील वाक्ये ओळखीची असतील, 

“विज्ञान निवडण्यासाठी पुरेसे गुण मिळवण्यात असमर्थ असलेले विद्यार्थीच वाणिज्य/कला शाखा निवडतात.”

“वाणिज्य शाखेत, माझ्याजवळ सीए, सीएस आणि बी.कॉम सारख्या मर्यादित पर्याय आहेत”

“केवळ व्यावसायिक-श्रेणीतील कौटुंबिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांनीच विज्ञानाचा विचार केला पाहिजे”

वरील विधाने प्रत्येक वेळी खरी असतीलच असे नाही पण सत्यही नाकारता येत नाही. आताचI काळ तंत्रज्ञानाचा आहे , करिअर संधी वाढवायच्या असतील तर प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे ज्ञान घ्यायलाच हवे तेव्हाच कुठे ते येणाऱ्या काळात टिकून राहू शकतील. उदा. आयओटी, एम्बइडेड सिस्टिम, रोबोटिक्स चे प्रोडक्टच्या डिजिटल मार्केटिंग च्या जॉब ची संधी असेल आणि जर त्यांची त्यांना आधीपासून माहिती असेल तर नक्कीच ते काम त्यांना मिळेल.

कला शाखेतील ते विद्यार्थी ज्यांची कल्पना शक्ती अफाट आहे,ज्यांना वस्तूच बाह्यरूप  कस खुलवता येईल हे कळत, एखादी वस्तू पाहताच त्याला कस सुशोभित करायचं हा विचार त्यांच्या डोक्यात येतो, पण हे फक्त अतांत्रिक उत्पादांच्याच बाबतीत आहे. 

जर तुम्हाला एखाद्या छोट्या रोबोटिक कार ची डिसाईनिंग किंवा त्याचे स्वरूप कसे असायला हवे हे विचारले तर तुम्ही सांगू शकाल का?

सांगू शकाल जर तुमच्या कडे त्याबद्दल पुरेसे ज्ञान असेल.तंत्रज्ञानाचं मूलभूत ज्ञान हे सर्वांनाच असायला हवे.

वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मानवी शरीराचा अभ्यास करने जेवढे गरजेचे आहे तेवढेच वैद्यकीय उपकरणांचा अभ्यास करणे देखील तेवढेच गरजेचे आहे. जसे पल्स ऑक्सिमीटर, ईसीजी, स्केलर,डायलिसिस,सिटीस्कॅन, क्स-रे, डायथर्मी, रेडिओलॉजिकल इन्स्ट्रुमेंट, मल्टिपारा मॉनिटर आणि सर्वच. प्रत्येक उपकरणांचं निदान कार्य व नियंत्रण तरी समजायलाच हवं.

आज प्रत्येक क्षेत्र हे कुठे ना कुठे तंत्रज्ञानाशी जुळलेले आहे.

म्हणूनच, आपण जर 10 वी नंतर आपली शाखा निवडण्याचे विचार करीत असाल, किंवा आधीच वाणिज्य/कला/वैद्यकीय/कायदा यापैकी कुठलेही क्षेत्र निवडलेले असेल, आणि आपल्याला करिअर कुठे करावे याबद्दल खात्री नसेल, तर आम्ही आपल्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील वरील शाखेंशी संबंधित रोमांचक आणि आकर्षक करिअर संधी सादर करत आहोत. ज्यामध्ये टेक इकोनॉमिकस वाणिज्य आणि कायद्याच्या क्षेत्रासाठी, बायोमेडिकल इंस्ट्रुमेंटेशन वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि कला शाखेसाठी अस्थेटिक अँड कॉस्मॅटिक लूक डिसाईनिंग ऑफ मशीन यांचा समावेश आहे. 

“आम्ही KITS मध्ये तेच स्किल्स शिकवतो ज्यांची  तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेत किंमत असेल.”

  • काजल राजवैद्य 
    CEO & FOUNDER
    KITS Tech Learning Center.

    International Robotic Trainer. 

महामानवास अभिवादन !

महापरिनिर्वाण दिन 

होणे नाही पुन्हा जगी असा

प्रतिभासंपन्न असा घटनाकार

ज्याने जपले माणुसकीचे फूल

नि अन्यायावर केला प्रहार….

संविधानरुपी न्यायदीपिकेत

समता, बंधुत्वास दिला थारा

प्रतिष्ठाही जपली सामन्यांची

नि एकतेचा दुमदुमला नारा…||२||

एक नागरिकत्व नि मताधिकार

यांमध्ये गुंफले तुम्हा-आम्हाला

‘धर्मनिरपेक्षते’च्या शब्दप्रभावाने

माणूसपण आले या मनुजाला..||३||

जगतामध्ये महान अशी ही

एकमेवद्वितीय घटना आधार

लवचिकताही अजोड साधून

अपराधांवरही परखड वार….||४||

महापरिनिर्वाणदिनी करुया

अभिवादन महामानवाला

मानवंदना ही आमुची त्या

प्रदीप्तिमान दुधारी प्रज्ञेला…. ||५||

वादळातील दीपस्तंभ भीम

झगडला नि झटला अविरत

संविधानरुपे हृदयी आमच्या

युगे युगेच जो राहिल तेवत…||६||

 

– शिल्पा म.वाघमारे, सहशिक्षिका
जि.प.प्रा. शाळा मालेगाव खुर्द ता. गेवराई, जि. बीड.

का ?

Photo Google

का ?

माजलेल्या दानवांचा भुईला या भार झाला
अधमांच्या निर्लज्जपणाचा कळस आज पार झाला … धृ

जीवनाला रंग देऊन सजवते जी जग तुझे
त्याच मातेचा आज दुर्दैवी तू काळ झाला… १

पावित्र्य सिद्ध करण्यास स्वतःला निखाऱ्यांत घेते जाळूनी
त्या सीतेचा सांग ना तू का नाही राम झाला…२

निमित्त करुनी चिंधीचे शील राखी नारीचे
माधवा त्या विस्मरुनी तू कसा अश्लील झाला…३

मलिन कर्मसुतांवरी या श्वास जे आधारले
तयांस कापण्या स्वये तू तलवारीची धार झाला… ४

प्रेम संयम प्राशून बघ ना, एकदा विकारा सांडूनी
दुष्कृत्याचे बीज पेरण्या मायेवर का स्वार झाला…५

बाग कोमल जीव सारे, प्रितीनेच सिंचणार
का अंधाराचा भक्त नि तू वासनेचा आहार झाला… ६

अंतरीचा ठाव घे, थरार थांबव धाव घे
अल्पमतीवर भडीमार नि जीवाचा प्रभू खार झाला… ७

 

– शिल्पा म वाघमारे , स शिक्षिका
मालेगाव खुर्द, ता. गेवराई, जि. बीड

 

डोळ्यांनेही होतो बलात्कार

डोळ्यांनेही होतो बलात्कार

हैद्राबाद शहरातील एक कुटुंब आज अतिशय वाईट प्रसंगातून जात आहे. डॉ. प्रियंका रेड्डी सोबत घडलेल्या घटनेवर सर्व स्तरावरून निषेध होत आहे. समाजातील काही मंडळी जाहीर निषेध करत आहे, काही मंडळी हळहळ व्यक्त करत आहे. तर, काही महाभाग स्त्रियांनी कसं वागावे, कसे राहावे, यावर उपदेश देत आहेत. आज दर पंधरा मिनिटाला एका ‘स्त्री’वर बलात्कार होत असल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. मग ते माणसांनी गजबजलेले ठिकाण असो, वा निर्जन स्थळ, बळी तर ‘स्री’चाच जातो आहे.
हैद्राबाद मधील घटनेचा तपास व कारवाई पोलिसयंत्रणा करत आहे. खुद्द आरोपीची आई ‘मुलास फाशीवर द्या’ म्हणत आहे. असे अमानवीय कृत्य करणाऱ्या विकृत आरोपीना काय शिक्षा द्यावी? ही न्यायव्यवस्थेची जबाबदारी आहे. पण तुम्ही आम्ही यात काय महत्वाची भूमिका घ्यावी? कारण, फक्त वाॅट्स अॅप, फेसबुक स्टेटस ठेवून होणार नसून अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रदीर्घ प्रक्रीया करावी लागणार आहे.
आत्तापर्यत आपण फक्त जे घडल त्यावर बोलतो आहे. पुढे हे घडणार नाही याचे कारण व उपाय शोधणे गरजेचे आहे. आता हे सरकारचे व पोलिसांचे काम आहे, असं म्हणून आपली जबाबदारी दुसऱ्सांवर ढकलल्यासारखे होईल.
ही विकृती बळावण्याच सर्वात मोठं व महत्वाच कारण म्हणजे इंटरनेटवरील अश्लील व्हीडीओ, वेब सीरीज मधील बेलगाम अश्लीलता आणि आजच्या काळातील काही सिनेमांमध्ये सर्रास दाखवले जाणारे बोल्ड सीन. पूर्वी सिनेमात दोन गुलाब जवळ-जवळ आणून सीनचा मतितार्थ सांगायचे, आता मात्र सगळ उघडपणे दाखवल्या जाते. कशाला ओ! राहू द्या ना काही गोष्टी आतच. बाॅक्स आॅफीसवर यांचा गल्ला कोटीच्या घरात जातो. पण, हेच बघणाऱ्या विकृत लोकांमुळे स्रीयांचा बळी जातो. आपण सतत एखादी गोष्ट बघितली की तसचं करण्याची इच्छा मन करते. आपण काय बघाव? ते चांगल का वाईट, हे कळेपर्यत विकृती विकोपाला जावून नाबालीक मुले सुध्दा हा अपराध करतात. बरेचदा याची सुरुवात परिचीत मुलींना स्पर्श करून बघण्यापासून होते. हळूहळू यांची अनोळखी महिलांवर जबरदस्ती करण्यावर हिम्मत होते. तर, काही माणसांचा ‘स्री’कडे बघण्याचा दृष्टीकोणच पूर्ण चूकीचा असतो. कारण, डोळ्यांनी केलेला बलात्कार दिसत नाही. जो पर्यत दृष्टीकोण बदलत नाही तोवर हे थांबणे शक्य नाही.
उपायाच्या दृष्टीने विचार करता, प्रत्येक घरात आई-वडीलांनी आपल्या पाल्यांसोबत बिनधास्तपणे संवाद साधण्याची गरज आहे. मुलांसोबत प्रत्येक विषयावर संवाद साधल्यावर त्यांच्या विचारांचा मार्ग कुठे जात आहे, हे लक्षात येईल. संवाद साधला की प्रश्न निर्माण होतात आणि प्रश्नाना योग्य उत्तर मिळाले की चांगला मार्ग मिळतो. कुठल्याही परीस्थितीत अडकले असता पहीला काॅल घरी न करता १०० किंवा महिला हेल्पलाईन १०९१ ह्या क्रमांकाला लावल्यास नक्कीच मदत मिळते, असे प्रत्येकाने आपल्या घरातील लहान मुली व महिलांना सांगा.
मुलगा हा वंशाचा दिवा आणि तो ‘मुलगा’ आहे म्हणून शक्यतो घरची मंडळी मुलींच्या तुलनेत त्यांना प्रश्न किंवा जाब विचारत नाही. तो काय करतो, कुठे जातो हे विचारने सहसा पालक टाळतात. या सोबतच आपला मुलगा काय विचार करतो? हे तपासून बघणे महत्वाचे आहे. शाळा, काॅलेजमध्ये लैंगिक शिक्षण दिल्या जाते. तसेच, विकृतीला आळा बसावा व मन स्थिर राहण्यासाठी योगाभ्यास सक्तीचे करावे, त्याने मुलांमधील क्रोध, द्वेश, राग, विभत्स विचारांना सात्विक विचाराकडे वळवण्यास मदत होईल. आपल्या देशात ‘योगा’ला काहीच महत्व नाही, ही शोकांतीका आहे. पण ही काळाची गरज आहे. आणि यांची सुरूवात आत्ताच व आपल्यापासून केली तरच बदल घडेल. अन्यथा मुलींना घराबाहेर पडतांना हाती तलवार, चाकू घेवून निघायची ती वेळ दूर नाही….

– पल्लवी प्रकाश

सत्तेचे शिवधनुष्य आणि शिवसेना

0

यापेक्षा मैदान बरे…..!

मोठ्या राजकीय घडामोडी नंतर नुकतेच शिवसेना – रा.कोंग्रेस – कोंग्रेस आणि समर्थक एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेना पक्ष प्रमुख यांचे नेतृत्वात सरकार स्थापन केले. त्याबदल नवीन सरकार चे हार्दिक अभिनंदन !

 

भिन्न राजकीय विचारसरणीचे पक्ष एकत्र येत किमान समान कार्यक्रमावर एक मत करत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून हे सरकार स्थापन झाले. यासरकारने शपथविधी मोठ्या धूम धडाक्यात एखादी जाहीर सभा असावी अशा ऐटीत घेतला. मुख्यमंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारून कामाला सुरुवात केली आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक नवीन अध्ययला सुरुवात झाली. येण – केण प्रकारेण शिवसेनेचे उद्धव ठाकरे यावेळी  मुख्यमंत्री झालेच पाहिजे असा चंग बांधलेल्या अनेक नेत्यांना गंगेत घोडे न्हाले असेच वाटले असणार.

झालेला शपथविधी हा नियमांनुसार नाही असा विरोधी पक्षाने आरोप करत पहिलाच दणका विरोधी पक्षाने सरकारला देत विरोधीपक्ष  सुद्धा सज्ज असल्याचे जनतेच्या निदर्शनास आले.

विधानसभा निवडणुकी पूर्वी महायुती म्हणून आम्ही सत्ता स्थापन करून आणि  राज्यकारभार चालवू असे दिलेले वचन सोडून जाहीर नाम्यातील इतर वचनपूर्ती करण्याचे मोठे आव्हान या सरकार समोर आहे. एकूणच तीन पायांची शर्यत असणार्‍या या सरकारमध्ये एका एका मुद्यावर एकमत करत समन्वय साधताना नवख्या  मुख्यमंत्र्यांची चागलीच दमछाक होताना  येणार्‍या काळात आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून अनुभव नसणारे मुख्यमंत्री आणि दुसरीकडे अनुभवी आणि कायदा व सरकार मधील बारीक सारिक खाच खडगे माहिती असणारा विरोधीपक्ष नेता आणि एकसंघ विरोधी पक्ष, सरकरमधील सहकारी असणारे राष्ट्रवादी, कोंग्रेस , मधील मात्तबर आणि  सत्तेचा बराच अनुभव असणारे नेते आणि शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून वावरण्याची उद्धव ठाकरे यांची वावरण्याची असणारी सवय पाहता सरकार चालवणे आणि मातोश्रीवरून आदेश देणे यातील फरक नवीन मुख्यमंत्र्यांना अनुभवायला मिळेले हे मात्र नक्की.

परवा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्राकाराने विचारलेल्या  प्रश्नाला  उत्तर देताना जाप्रमाणे उद्धव ठाकरे चिडले आणि काल विधानसभे मध्ये विश्वासदर्शक ठरावावेळी विरोधीपक्षाने आरोप करत वाक – आऊट केले आणि त्यांनातर जाप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडत ” यापेक्षा मैदान बरे ” असे हताश उद्गार पहिल्याच दिवशी काढले त्यावरून सरकार चालवताना त्यांची दमछाक तर होणार नाही ना ? असा प्रश्न जनतेच्या मनात डोकावतो आहे.

मागील फडणवीस सरकारने सुरू केलेले  समृद्धि महामार्ग, मराठवाडा वाटर ग्रिड प्रोजेक्ट, मेट्रो, अमृत योजना, मेक इन महाराष्ट्र सारखे महत्वाचे प्रकल्प हे सरकार किती नेटाने पुढे नेते व पूर्ण करते हा प्रश्नच आहे. विविध देशांशी मुत्सद्देगिरी करून मोठमोठ्या कंपण्याकडून महाराष्ट्रात विकाससाठी पैसा उभा करणे आणि प्रकल्पाला चालना देणे, नवीन प्रकल्प उभारणे, उद्योग, शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य अशा विविध आघाड्या सामभाळणे , सरकार म्हणून विकासाचे धोरण ठरवणे अशा अनेक विषयात नवख्या  मुख्यमंत्री महोदयना खूप मेहनत घ्यावी लागेल असे एकूणच चित्र समोर दिसत आहे.

कोंग्रेस आणि रा.कोंग्रेस मधील मात्तबर नेते खरच अशा सर्व विषयात उद्धव ठाकरेंना मदत करतील का ? आपला अनुभव पणाला लावत अनेकानेक अडचनीमध्ये मार्ग काढत राज्य शासनाचा गाडा समोर नेत सर्व क्रेडिट शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना देतील का ? असे अनेक प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या निमित्ताने जनतेच्या मनात उपस्थित होताहेत.

पक्षबांधणी, संघटन चालवणे, पक्षप्रमुक म्हणून कार्यकर्त्यांशी वागणे, त्यांना सूचना करणे असा एकूणच स्वभाव असणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आपल्या सोबत असणार्‍या इतर पक्षातील  मातब्बर सहकारी नेत्यांना सन्मान देत समन्वय साधत किती पुढे जातता आणि आपला कार्यकाळ पूर्ण करतील का हे येणारा काळच सांगेल. 

  • नितिन राजवैद्य. 

हलबल पितामह

अचानक त्याला आठवण झाली… त्या भिष्माची. तोसुद्धा होता पितामहच. स्वकीयांमुळे शरपंजरी पडलेला. प्रचंड आदर मिळकतीला असलेला पण आदेशातील धार गमावून बसलेला. अशा वेळी पितामहाने काय करावे?  पुन्हा शस्त्रे हाती घेऊन उतरावे रणसंग्रामात की निवांत पडून राहावेे, शरपंजरी.

Bheeshm.

आता पुन्हा रणात उतरणार नाही, ही घोषणा त्याने गेल्यावेळी रणदुदुंभी वाजण्यापूर्वी नव्यानेे केली होती आणि काळे कभिन्न ढग दाटून आलेले, आजुबाजुच्या प्रचंड डोंगरांना धगधगत्या वणव्याने कवेत घेतले असल्याने आधीपासूनच खिन्न, उदासवाणे वाटणारे वातावरण अधिकच उदासवाणे झाले. कोणे एकेकाळी आपल्या भात्यातील एकसे एक शरांनी शत्रुपक्षाची गाळण उडविणारा, आपण म्हणजेच यश आणि आपण म्हणजेच विजयश्री हा रणभूमितील पामरांचा विश्‍वास सार्थ ठरविणारा पराक्रमी योद्धा… एकाच म्यानात दोन नव्हे तर अनेकानेक तलवारी ठेवण्याची आणि त्या समर्थपणे वेळ – काळ पाहून काढण्याची खास कला अवगत असलेला वीर… ज्याच्या तरवारींचीच नव्हे तर म्यानांचीही भीती प्रतिपक्षाने बाळगावी, म्यानातून कोणती तलवार केव्हा बाहेर येईल याचा अंदाज दस्तुरखुद्द बाहेर येईतो तरवारींंनाही नसावा इतका कुशल, वाक्बगार, चपळ लढवय्या… प्रतिपक्षाच्या सेनापतींनी ज्याला तेल लावलेला पैलवान म्हणून गौरवावे, मैद्याचं पोतं म्हणून हिणवावे… कशाचाच त्याच्या सत्तेची कवच कुंडलं असलेल्या मनावर कधीच परिणाम झाला नाही. तोच वीर, योद्धा, लवय्या… आज सह्याद्रीच्या कुशीत खिन्न मनाने एकेक पाऊल टाकत शतपावली करीत होता. आता पुन्हा रणात उतरणार नाही, ही घोषणा त्याने नुकतीच केली होती. थेट रणातून माघार घेतली तरीही रणांगण गाजवून सोडणारे त्याचे अनेक उत्तराधिकारी आहेत की. त्यातील कोण रण गाजवेल, याचही अंदाज त्याला आहे. त्यामुळे त्याची पावले ठामपणे पडत आहेत, आजही. पण त्या पावलांची दिशा कधीच कोणाला कळली नाही, तशीच ती आज अशा खिन्न वातावरणातही कळत नाहीये.
सत्ययुगात जेे झाले, त्रेता युगात जे घडले तेच आज घडतेय का? असा प्रश्‍न साक्षात इतिहासाला पडलाय. सत्तेच्या पाशांनी सगळे – सगळे संबंध खिळखिळे होताहेत की सत्तेचे पाश विजेत्याच्या प्रतिमेला आवळू पाहताहेत. या पाशांनी कायम सोबत केली, आपल्याला. अगदी ’वसंता’च्या बहरातसुद्धा. अचानक कोण्या एका पहाटे तो सूवर्ण खंजिर कामी आला होता, क्षणार्धात शत्रू आणि मित्र पक्षांमध्ये झुंबड उडाली, पळापळ करणारे भानावर आले त्यावेळी भल्या पहाटे हाच योद्धा होता स्थानापन्न त्या सिंहासनावर… झाली त्यालाही आता तब्बल चार दशकं. या महाराज्यावरील नजर कधीच हटली नाही, इतक्या वर्षात. ऐन रणभूमित आपण विरोधात ठाकलो असतानाही प्रतिपक्षातील एका विजेत्या योद्ध्याने आपणच त्याचे सारथ्य केल्याची जाहीर कबुली दिली होती, प्रजाजनांना तेव्हा आश्‍चर्य वाटले. पण आपण कधीच कुटुंब – कबिल्याचा विचार क्षणभरही दूर होऊ दिला नाही. अनेक सेनापती तयार झाले, प्राणपणाने लढणारे सैनिक तयार झाले पण कधीच आपल्या अढळस्थानाला धक्का लावण्याचे धारिष्ट्य कोेणाच्या ठायी निर्माण होणार नाही, याची आपण काळजी घेतली. धक्का लावण्याची शक्ती मिळवू पाहणार्‍या भल्याभल्यांना धक्क्याला लावले. अरेरे… पण आज हे अचानक असे का व्हावे??? त्याचे विचारचक्र क्षणभर थांबले.
आपल्याच जवळचे, अतिजवळचे सगळे तरुण नेतृत्वस्थानी बसवणे म्हणजेच नव्या नेतृत्वाला संधी देणे. सत्तेच्या पाशात गुंतून या महाराज्यातील अनेक कुटुंबांमध्ये उभी फूट पडली. अर्थात प्रजा म्हणते त्यात आपलाच हात असतो, असो. प्रजा काय काहीही म्हणते. परंतु, आज प्रथमच अर्धा शतकातील चौदा युद्धांतील यशानंतर एक पाऊल मागे घ्यावे लागलेय. नव्या सळसळत्या रक्ताने हट्टाने पेटून रणांगणात उतरण्याचा निर्णय खरा करून दाखवला. काही काळापूर्वी ’पार्थ’ आक्रमक झाला होता, आता या पिढीचा तोच बाणा, तोच विचार ’अजित’ ठरू पाहतोय. कर्मण्येवाधिकारस्ते… त्याला मान्यच नसल्याच्या आविर्भावात त्याने मिळवूनच घेतले, त्याला हवे होते ते. पार्थाच्याही नशिबी कायम स्वकियांविरुद्धची लढाईच असते का? पण स्वकीयांशी लढाईत पार्थ कायमच ’अजित’ ठरतो?, ठरेल? अशा प्रश्‍नांचे काहून माजलेय त्याच्या मनात. आपणच कर्ते आणि करविते, आपणच नेते आणि नेतृत्व, आपणच श्रेष्ठ आणि श्रेष्ठीही असेच आजवर वाटत होते. तेच तर सत्य होते, कारण आपल्याला ते मान्य होते. आज अचानक असे का व्हावे, सारीपटाच्या सगळ्याच घरांमध्ये ज्याच्यासाठी अनेक प्याद्यांची फौज कामी येते, भल्या – भल्यांना हत्ती गारद करतो, उंटाची तिरकी चाल अचंबित करते विरोधकांना फक्त आणि फक्त आपले राजेपण जपण्यासाठी. आपणच त्या पटावरील नायक हा आपला समज आणि प्याद्यांचा विश्‍वास दोलायमान व्हावा? प्यादे, उंट, हत्ती, वजिराच्या गर्दीतील आपण राजे नव्हे तर कोणीतरी दुसर्‍यानेच मांडलेल्या सारीपटावरील प्यादे आहोत? केवळ अशक्य… पण मग चार दशकांपूर्वीचा सगळाचा सगळा इतिहास का असा सूड उगवतोय? अशी खूप फोडाफोडी आपण पाहिली, हे आपण गर्वाने सांगतोय, ते समोरच्या प्याद्यांमध्ये बळ येण्यासाठी. अशा एखाद्या वाक्यानेच तर ते बिच्चारे एक – एक घर पुढे सरकत असतात. पण अशा खूप पाहिलेल्या फोडाफोडीमागे आपणच होतो, हे सांगून टाकावे का आता? असे अनेक विचार त्याच्या घायाळ झालेल्या मनात घोळत होते. आणि अचानक त्याला आठवण झाली… त्या भिष्माची. तोसुद्धा होता पितामहच. स्वकीयांमुळे शरपंजरी पडलेला. प्रचंड आदर मिळकतीला असलेला पण आदेशातील धार गमावून बसलेला. अशा वेळी पितामहाने काय करावे? काय करावे… पुन्हा शस्त्रे हाती घेऊन उतरावे रणसंग्रामात की निवांत पडून राहावेे, शरपंजरी.

  • विशाल राजे

हिवाळा,आहार व आरोग्य

हिवाळा व आपले आरोग्य

“ जो घेईल सकस आहार , त्याला न होई कधी आजार “

हिवाळा हा ऋतु तसा आबाळवृद्धनपासून सरावांच्याच आवडीचा असा हा ऋतु , कारण गुलाबी गुलाबी थंडी आणि वातावरणही तसं छान हिरवगार व थंड हवा. या ऋतु मध्ये आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने बघितल्यास तो तसा खूप हितकारक असा ऋतु आहे कारण थंडी मुले आपल्याला खूप भूक लागते व या ऋतु मध्ये आपल्याकडे छान हिरवागार भाजीपाला व मौसमी फळे चांगली उपलब्ध असतात फक्त जरूरी  आहे  आपल्या आहारला चौरस बनवण्याची.

खूप थंडी पडायला लागली की आपल्याला काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते व आपण खूपदा चहा घ्यायला लागतो जे आपल्या आहारासाठी चांगलं नसत त्या एवजी आपण आपल्या रोजच्या चहात आल  घालून एकदा चहा व फळांचे सूप , काढा , हर्बल टी, ग्रीन टी , कढी यांचा आपल्या आहारात उपयोग केल्यास ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायचे ठरेल .

आपल्या आहारात हिरवा व नारंगी भाजीपाला , कच्या भाज्या, गाजर ,मुळा , मेथी , बीट यांचा मुबलक प्रमाणात  व  फळे पेरु , आवळा , संत्री , मोसंबी, डाळिंब ,केली किमान रोज 1 असा वापर करावा जेणे करून आपल्याला आवश्यक असणारे विटामीन ए, सी व चौथा युक्त पदार्थ मिळून आपणास उत्तम आरोग्य लाभेल .

“रोज एक फळ खाऊया

आरोग्याचे सवर्धन करूया “     

हिवाळ्यामध्ये आपल्याला खूप भूक लागते  अश्या वेळी सकाळच्या वेळी सकस नाश्ता कडधान्ये हिरव्या भाज्यांचे पराठे व सुकामेव्या पासून बनवलेला लाडू ,फळे,  भाज्या घालून उपमा , यापैकी काही तरी  अवश्य खावे कारण आपल्या शरीराला सकाळी उष्मकांची खूप गरज असते.

आपल्या कडे हिवाळ्यामद्धे सुकामेव्याचे लाडू बनवण्याची पद्धत आहे या लाडू मुले आपल्याला आवश्यक असणारे प्रथिने , कॅल्शियम, लोह व भरपूर उष्मांक आपणास मिळतात जे आपल्या आरोग्यासाठि खूप फायद्याचे असते. पण ज्यांचं वजन खूप आहे अश्या व्यक्तीने त्याचे सेवन प्रमाणातच करावे , मधुमेह असणार्‍या व्यक्तीने लाडू एवजी सुकामेवा खाणे चांगले.

ज्यांना हिवाळ्यामध्ये सर्दी , ताप यासारखे आजार वारंवार होतात त्यांनी आपल्या आहाराची योजना वरील प्रमाणे केल्यास व नियमित व्यायाम केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ति वडविण्यास नक्की मदत होईल.

 

  • जया अहेरकर – गावंडे, आहारतज्ञ

काळे क्लिनिक / कठाळे इन्फेर्टिलीटी सेंटर

औरंगाबाद.

मतदारांचे काय चुकले ?

0

महाराष्ट्र विधानसभेच्या लागलेल्या निकालाने जनतेने भाजप, सेना महायुतीला सत्ता स्थापनेचा स्पष्ट कौल दिला तर  कॉंग्रेस-रा.कॉ. आघाडीला विरोधात बसून शासनावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील जनतेनी दिली. परंतु वेळेवर भाजप-सेनेत अनपेक्षित  दुरावा  निर्माण होऊन झालेल्या पेच प्रसंगाने ते सरकार स्थापन करू शकले नाहीत तर दिलेल्या कालावधीत इतर कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्याने महाराष्ट्रात महामाहीम राज्यपालांच्या शिफारशीने राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली हे सर्वांनी पहिले.

निवडणुकीत आपापला विचार आणि वचननामा पुढे करत सर्वच राजकीय  पक्षांनी मतदार राजाला स्वतःकडे आकर्षित करून आमचाच पक्ष कशा प्रकारे योग्य आहे व महाराष्ट्राला प्रगती पथावर आम्हीच कसे नेऊ शकतो हे पटवून देण्याचा जोरदार प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी केला.

लोकसभा निवडणुकी नंतर लागलेल्या निकालात भारतीय जनता पक्षाला बहुमत देत पुन्हा एकदा सत्तेची संधी मतदार राजाने भाजप प्रणीत एन.डी.ए. ला दिली. महाराष्ट्रात त्यावेळी भाजप – सेना महायुती म्हणून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात जनतेनी त्यांना निवडून दिले. लोकसभा हि महाराष्ट्रात विधानसभेची ट्रायल म्याच आहे अशा पद्धतीने सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक पातळी ते राज्य पातळीवरील  नेते कामाला लागले व त्यांनी या रणांगणात उडी घेतली.

महाराष्ट्र विधानसभेच्या वेळी कॉंग्रेस – रा.कॉ आघाडी, भाजपा-सेना महायुती, वंचित बहुजन, इतर राजकीय पक्ष,  अपक्ष, अशा विविध राजकीय पक्षांनी मतदारांना आपापल्या अधिकृत वचन नाम्यात म्हणा किंवा पक्षाच्या जाहीर नाम्यात म्हणा अनेक आश्वासन जनतेला दिली.

प्रामुख्याने या निवडणुकीत महायुती, आघाडी व इतर पक्ष निवडणुकीत जनतेला सामोरे गेली व मतदारांनी आपल्या पवित्र मताचा वापर करत आपापल्या मतदार संघातून मतदारांच्या दृष्टीने योग्य उमेदवाराला मत देऊन निवडून आणले. झालेल्या मतदानाचा अभ्यास जर केला तर अनेक ठिकाणी मतदारांनी अनपेक्षित निकाल दिलेत. याचा अर्थ असा कि या वेळी मतदारांनी आपल्या विवेक बुद्धीचा वापर करत कोण्याही आमिषाला बळी न पडता मतदान केले.

 विधानसभेच्या  २८८ जागांसाठी लागलेल्या निकाला मध्ये भाजप – सेना महायुतीला १६२ सीट, कॉंग्रेस – रा.कॉ. आघाडीला १०४ सीट, वंचित बहुजन आघाडीला १ सीट आणि इतर २१ सीट जनतेनी जीवाडून दिल्यात. त्यानुसार महायुतीने जनतेने दिलेल्या निर्णया नुसार सरकार स्थापन करून काम करणे अपेक्षित आहे. परंतु अनपेक्षित पणे घडामोडी घडत गेल्या व महायुतीमध्ये दुरावा निर्माण होऊन त्यांनी सरकार स्थापन केले नाही.

निवडणुकीच्या आधी आम्ही निकाला नंतर  शिवसेनेचा मुख्यमंत्री करू असे विधान शिवसेनेने केले नाही व निकाला नंतर मात्र अचानक सेनेला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले. तुमच्यात आपापसात सत्तेतील वाटा घाटीवरून काय ठरले असेल ते असेल पण मतदारांच्या निर्णयाचा अनादर हा होता कामा नये. मतदारांनी मतदान केले यात मतदारांचे काय चुकले ?   

आता भाजप आपल्या भूमिकेवर ठाम असून शिवसेना मात्र आपला मुख्यमंत्री व्हावा यासाठी जा कॉंग्रेस – रा.कॉ. आघाडीच्या  विरोधात निवडणूक लढली त्यांच्याच सोबत जाण्यासाठी आतुर आहे. काहीही करू पण शिवसेनेचा मुख्यमंत्री करू, यासाठी आतुर असलेली शिवसेना जनतेनी सत्ता स्थापनेसाठी नाकारलेल्या राजकीय पक्षाकडे जाऊन सत्तेची गणित मांडताना दिसत आहे. हे जनतेच्या भावनेच्या आणि निर्णयाच्या विरुद्ध आहे असे म्हटले तरी गैर होणार नाही.

निवडणुकीआधि जनतेला  दिलेल्या शब्दाला जागात महायुतीने सरकार स्थापन करून कामाला लागणे हिताचे आहे. अन्यथा  येणाऱ्या काळात जनता याचे प्रतिउत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.

 

  • नितीन राजवैद्य

ही स्क्रिप्ट लिहिलीये कोणी ?

गेल्या वीस – बावीस दिवसांपासून राज्यातील सगळ्या राजकीय घडामोडी अगदी स्क्रीप्टनुसार घडताहेत. ठरवून शिवसेनेला काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीत लोटलं गेलंय, की राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांना आपल्याकडे ओढलंय? राष्ट्रपती राजवट लागेल, असा इशारा मुनगंटीवारांनी पंधरा दिवसांपूर्वीच दिला होता, तसंच झालंय. मग विरोधात बसण्याचा जनादेश असल्याचे सांगणारे सत्ता स्थापनेच्या हालचाली खरोखरच कराताहेत की तसा भास निर्माण केला जातोय? आत्ताच अचानक एमआयएमे आवेसी आणि नारायण राणेंना कंठ कसा फुटला? या प्रश्‍नांचा पाठपुरावा केल्यास गुंता अधिकाधिक वाढत जातो… कधी – कधी सुटताना दिसतो, पण दुसरे टोक पुन्हा गुुंतलेले असते. हा गुंता मुद्दाम तयार झाला आहे, करण्यात आला आहे. या राजकीय महानाट्याची स्क्रीप्ट तयर आहे हे निश्‍चित, पण ती लिहिली कोणी? हा प्रश्‍न शेवटपर्यंत कायम राहणार आहे.

(photo – google )

देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानुसार राज्य सरकारची मुदत संपण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत महायुती सरकार स्थापन करेल. सरकारची मुदत संपल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत तसा दावा केला, पण शिवसेनेच्या नेत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद नाही आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी काहीही ठरलेलं नाही, हे ठासून सांगीतलं. कितीवेळी आणि कधी उद्धव ठाकरेंशी संपर्क केला हे फडणवीसांनी सविस्तर सांगीतले. शिवसेनेमुळेच सत्ता स्थापनेला विलंब होत असल्याचे त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगीतले. तरीही युती कायम आहे, असे सांगतानाच शिवसेनेला या सगळ्या विलंबाचा आणि जनादेशाचा अपमान करण्याचा दोष जावा, ही काळजी फडणवीसांनी घेतली. दुसर्‍याच दिवशी सत्ता स्थापन करण्यास आपण शिवसेनेशिवाय असमर्थ आहोत, हे मुदत संपण्याच्या बारा तास अगोदरच सुधीर मुनगंटीवारांनी जाहीर केलं. यावेळी राजभवनात उपस्थित असतानाही फडणवीस पत्रकारांना सामोरे न जाता निघून गेले.
उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या आरोपांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. जे ठरलंय ते द्या, हा त्यांचा होरा कायम होता. खरे – खोटेपणा सिद्ध करण्यासाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि त्यांचा परिवार हा निकष त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी त्यांनी त्यांच्या आमदारांना अज्ञातस्थळी (?) हलविले. इतर पर्याय खुले आहेत, हे सांगतानाच त्यांनी नवे समिकरण उदयास येईल, असे सांगीतले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपने सत्ता स्थापनेत असमर्थता दर्शविताच शिवसेनेला निमंत्रण दिले. त्यांची मुदत 11 नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसातला संपणार होती.
शरद पवार यांच्याशी शिवसेनेची पंधरा दिवसांपासून संजय राऊतांच्या माध्यमातून चर्चा सुरु होती, निदान तसे भासविले जात होते. फडणवीसांची पत्रकार परिषद राऊतांनी पवारांच्या घरी पाहिली. पण सत्ता स्थापनेसाठी केवळ काही तास राहिले असताना पवारांनी काँग्रेसच्या सहमतीशिवाय निर्णय घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यापूर्वीही भाजप – शिवसेनेने सत्ता स्थापन करावी, असा सल्ला पवारांनी तीनवेळा दिला होता. अर्थात तो भाजपपेक्षा शिवसेनेसाठीच अधिक होता.
सोनिया गांधी यांच्या दरबारात राज्यातील दिग्गज काँग्रेस नेते दिल्लीत पोहचले. दिवसभरात दोन बैठकी घेतल्यानंतर पुन्हा पवारांशी याविषयी चर्चा करण्याच्या निर्णयापलिकडे काहीही त्यातून निघाले नाही.
राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे साडेसातपर्यंत शिवसेनेचे नेते जाऊन बसले होते. पाऊण तासानंतरही या नेत्यांनी दोन्ही काँग्रेसचा तत्वतः पाठिंबा असल्याचे सांगीतले, आणि मुदत वाढविण्याची मागणी केली. पण राज्यपालांनी ती फेटाळली. हात हलवित राजभवनाच्या बाहेर शिवसेनेचे नेते निघत नाहीत तोच राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी निमंत्रण दिले. पण राष्ट्रवादीने पुन्हा मुदत मागितली, आणि राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केंद्र सरकारला केली.
केंद्र सरकारकडे राज्यपालांची शिफारस पोहचताच त्याला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदी परदेश दौर्‍यावर निघून गेले आणि अमित शहांचे गेल्या तीन आठवड्यांचे मौन अधिक घट्ट झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या बैठकी सुरुच आहेत, पुढील काही दिवसांत त्या सुरुच राहतील. संजय राऊतांशी वेळोवेळी चर्चा करणार्‍या पवारांनी एकट्याने निर्णय घेण्यास नकार दिला, त्यावेळी शिवसेनेचे अवसान गळाले. मुळात रितसर प्रस्तावच शिवसेनेने दिलेला नाही, हे सांगून त्यांनी आपण अद्यप अलिप्त असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएम या पक्षावर भाजपची बी टीम म्हणून आरोप होतो. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेसाठी अनुकुलता होत असल्याचे चित्र माध्यमातून रंगविण्यात येत होते. त्यामुळे काँग्रेस कदाचित या नव्या आघाडीत सहभागी होईल का, असा अंदाज घेणे सुरु असतानाच ओवेसींनी लगेच मुस्लिम राजकारणाचा मुद्दा उपस्थित केला. गत वीस दिवसात ओवेसींचे एकही वक्तव्य नव्हते. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आणि बैठक – बैठक खेळण्यास सुरुवात केलीय.
या सगळ्या घडामोडी अशा क्रमाने मांडल्यास सत्ता स्थापनेच्या या संपूर्ण नाट्याची स्क्रीप्ट तयार आहे, हे स्पष्ट होते. कोणी केव्हा रंगमंचावर प्रवेश करायचा हे ठरलंय. या स्क्रीप्टमध्ये उत्स्फूर्ततेवर, भावनिक आधारावर राजकारण करणार्‍या शिवसेनेची गोची होणार हेसुद्धा ठरलंय.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीत कलगीतुरा रंगला होता. समोर कोणी पेहलवानच नाही, असं फडणवीस म्हणाले होते. सातार्‍यात उदयनराजेंसाठी मोदींनी सभा घेऊनही ते पराभूत झाले. राष्ट्रवादी राज्यात गेल्यावेळेच्या तुलनेत वाढली. तरीही सध्या सुरु असलेल्या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपकडून एका वाक्यानेही पवारांवर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका झालेली नाही. तेच पथ्य राष्ट्रवादीकडूनही पाळले जात आहे. भाजपला पवारांनी एका शब्दानेही दुखावलेले नाही. उलट आता नवी आघाडी तयार करायची तर राष्ट्रवादीला अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद हवे, अशी मागणी राष्ट्रवादीकडून पुढे येत आहे. हा मोठा खोडा नव्या आघाडीत निर्माण होणार आहे.

महाराष्ट्रातील स्थीर सरकारसाठी आणि राष्ट्रपती राजवटीचा पेच सोडविण्यासाठी आणि अखेर काय तर जनतेच्या हितासाठी, शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी काय होईल, हा सस्पेंस उघड होईल… आणि बाहुबलीला कटाप्पाने का मारलं? असा प्रश्‍न शिवसेनेला पडेल (?)

  • विशाल राजे, पत्रकार, स्तंभ लेखक,
  • रायगड.
  • www.vishalraje.com

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू.

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय ?

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना अनपेक्षित वळण येऊन कोणत्याही पक्षाने दिलेल्या मुदतीत  सत्ता स्थापन करू न शकल्याने अखेर राज्यपालांच्या शिफारसीने केंद्रिय मंत्री मंडळाच्या निर्णयाने महामहीम राष्ट्रपतीनी राज्यात राष्ट्रपती राजवटी वर शिक्का मोर्तब केले आहे. महाराष्ट्रात या आधी दोन वेळा राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले असून राष्ट्रपती राजवटीची  ही तिसरी वेळ आहे.

  • जाणून घेऊ या राष्ट्रपती राजवट म्हणजे काय ?

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३५६ नुसार जर एखाद्या राज्याचे शासन साविधांच्या तरतुदींना अनुसरून चालवणे शक्य होत नसेल तर अशा परीस्तीतीत राज्यातील संविधनिक यंत्रणा बंद पडल्यास राष्ट्रपती घोषणा करून अथवा राज्यपालांच्या शिफारशीं नुसार राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. राष्ट्रपती राजवट हि घटनात्मक आणिबाणी म्हणून ओळखली जाते.
बिकट परीस्तीतीच्या वेळी महामहीम राष्ट्रपती हे स्वतः खात्री करून अथवा महामहीम राज्यपालांच्या शिफारसीवरून राष्ट्रपती राजवटीची घोषणा करू शकतात.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्या नंतर राज्यातील सर्व कारभार हा महामहीम राष्ट्रपती अगर त्यांचे प्रतिनिधी म्हणून  महामहीम राज्यपालांच्या हाती येतो,राज्य मंत्री मंडळ बरखास्त होऊन सर्व अधिकार केंद्रीय मंत्रीमंदाला कडे जातात. कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतल्या जात नाहीत. तसेच फारच बिकट परिस्थितीत नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा सुद्धा येऊ शकते.
भारतीय राज्य घटनेत राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी व घटनात्मक आणीबाणी या तीन प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आहे. राष्ट्रपती राजवट हि पहिले दोन महिने राहील मग संसदेच्या मान्यतेने त्याचा कालावधी सहा महिने होऊ शकतो व राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत वाढविता येऊ शकते. तीन वर्षानंतर निवडणूक आयोगाला राज्यात पुन्हा निवडणूक घेणे बंधन कारक होते. दरम्यानच्या काळात निवडून आलेल्या पक्षाला अथवा आघाडीला असे वाटले की आम्ही सरकार स्थापन करू शकतो तर ते तसा दावा महामहीम राज्यपालांकडे करून सरकार स्थापन करू शकतात मग नंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात येऊन  सवैधानिक सरकार राज्यकारभार चालवते.
दरम्यानच्या काळात राष्ट्रपतींच्या वतीने राज्यात राज्यपाल हे कामकाज चालवतात.
याआधी महाराष्ट्र राज्यात इंदिरागान्धींच्या काळात आणीबाणी व शरद पवार चे पुलोद सरकार पाडून  राष्ट्रपती शासन लागू झाले होते.
राष्ट्रपती राजवटीचा उच्य न्यायालयाच्या कामकाजावर कुठलाही परिणाम होत नाही.
सध्या जम्मू आणि काश्मीर राज्यात सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू असून देशात सर्वात प्रथम 1954 मध्ये पंजाब मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

 

  • ऍड. विजय भांबरे,
  • संपादक लोकसंवाद.कॉम 
    कायदे तज्ञ तथा राज्यशास्त्राचे अभ्यासक.